WFTW Body: 

उत्पत्ती 37:18 मध्ये आपण वाचतो की योसेफाच्या मोठ्या भावांनी त्याला जिवे मारण्याची योजना आखली. ह्याठिकाणी आपल्याला देवाचे सार्वभौमत्व दिसते की देवाने एका भावाच्या मनात विचार आणला की त्यांनी योसेफाला गुलाम म्हणून व्यापार्‍यांना विकावे. त्यावेळी त्याठिकाणी त्या व्यापार्‍यांना कोणी पाठविले असावे? देवाने. देवाने त्या व्यापार्‍यांचे वेळापत्रक असे योजिले की जेव्हा त्याचे भाऊ योसेफाला मारणार त्याचवेळेस या व्यापार्‍यांनी तिथून जावे. गुलामांचा व्यापार करणारे हे व्यापारी मिसराला जात होते. देवाची देखील इच्छा होती की योसेफाने मिसरात जावे. योसेफाच्या जीवनामध्ये परमेश्वराचे वारंवार सार्वभौमत्व पाहून आश्चर्य वाटते. तुमच्या जीवनासाठी देखील देवाची योजना व उद्देश आहे. कोणीही त्यात अडखळण आणू शकत नाही, तुमचे हेवा करणारे भाऊ किंवा मुर्ख बाप किंवा बेशिस्त पत्नी सुद्धा. हीच गोष्ट आपल्याला याठिकाणी दिसते.

योसेफ 17 वर्षाचा झाला तेव्हा देवाने योसेफाला स्वप्नातून त्याच्या जीवनाकरिता देवाचा उद्देश सांगितला. या वयामध्ये मुलांना घाणेरडी स्वप्न पडतात परंतु, योसेफाला देवाविषयी स्वप्न पडले व त्या स्वप्नाविषयी तो संवेदनशील होता हे बघून अद्भुत वाटते. आपले मोठे भाऊ आपल्याला देवाची सेवा करण्याची संधी देत नाही अशी तक्रार करतांना आपण किशोरवयीन मुलांना पाहत नाही. जर तुम्ही देवाला समर्पित झाला तर देव तुमच्या जीवनाकरिता त्याची योजना तुम्हाला कळवील. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा माझ्यापेक्षा मोठ्या भावांना माझ्या सेवेविषयी हेवा वाटत असे. ते मला अनेक प्रकारे दाबत असत. मी हजर असलेल्या सभेमध्ये ते मला बोलू देत नसत. म्हणून मी रस्त्यांवर सुवार्ता सांगत असे ज्याठिकाणी मला कोणाच्या परवानगीची गरज नसे आणि या रस्त्यावरच देवाने मला संदेश देण्याचे शिकविले. ख्रिस्ती सभेंमध्ये देवाने मला मोठ्यांच्या अधीन होण्यास व नम्र होण्यास शिकविले जरी त्यांना माझा मत्सर वाटत अस . देवाने मला शिकविले की मी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारू नये. त्या दिवसांमध्ये देवाने मला योसेफासारखे भग्न केले. परंतु माझ्या जीवनाकरिता असलेल्या देवाच्या योजनेमध्ये हे मोठे लोक बाधा आणू शकले नाही. जेव्हा वेळ आली तेव्हा देवाने माझ्यासाठी दारे उघडली आणि माझ्या जीवनाकरिता त्याची योजना पूर्ण झाली. ते मी तुमच्या प्रोत्साहानासाठी सांगत आहे. म्हणून कधीही लोकांविरुद्ध कुरकुर करू नका. तुमच्याकरिता असलेल्या देवाच्या योजनेत एकच व्यक्ती बाधा आणू शकते आणि ती व्यक्ती तुम्हीच आहात. ही गोष्ट लक्षात ठेवा.

देवाने योसेफाच्या भावांचा मत्सर उपयोगात आणून योसेफाच्या जीवनाकरिता त्याची योजना पूर्ण केली. देवाने त्यांच्या हातून योसेफाला मिसरात पाठविले. इतर लोकांच्या दुष्ट योजनेचा देव उपयोग करून आपले हीत करितो व त्याचा उद्देश पूर्ण करितो. हालेलुयाह! इतर लोक आपले नुकसान करीत असता जेव्हा देव आपल्याला त्यातून सुरक्षीत ठेवतो तेव्हा तो किती महान चमत्कार असतो. देव त्यातून अधिक उत्तम ते करितो! लोकांच्या दुष्टाईचा उपयोग करून देव आपल्याकरिता असलेल्या त्याच्या योजना पूर्ण करितो. हे किती चांगले आहे! जर योसेफाच्या भावांनी योसेफाचा हेवा केला नसता परंतु त्याचे चांगले केले असते तर योसेफ मिसरात जाऊ शकला नसता. योसेफ मिसरात कसा गेला? पहिली पायरी : त्याचे भाऊ त्याचा हेवा करीत असत. दुसरी पायरी : त्यांनी त्याला गुलाम म्हणून व्यापार्‍यांना विकले. तिसरी पायरी : गुलामांनी त्याला मिसरात नेले व तिथे विकले. अशाप्रकारे योसेफाला मिसरात नेण्याची देवाची योजना पूर्ण झाली. म्हणून जेव्हा इतर लोक तुमचे वाईट करू पाहतात तेव्हा देव त्यांचा उपयोग करून तुमच्या जीवनाकरिता असलेली त्याची योजना पूर्ण करितो - परंतु, तुम्ही देवावर प्रीती करावी (रोम 8:28). तुम्हाला काही समस्येंना तोंड द्यावे लागेल. गुलाम असतांना योसेफाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. परंतु, त्यामुळे त्याच्याकरिता देवाची योजना पूर्ण झाली. देवाची स्तुती असो!

विश्वास असलेला मनुष्य म्हणेल, ‘‘योसेफाचा देव माझासुद्धा देव आहे. जर मी देवावर मनापासून प्रिती करतो तर कितीही लोकांना माझा मत्सर वाटला तरी, कितीही लोकांनी माझे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकरिता असलेल्या देवाच्या योजनेत ते बाधा आणू शकत नाहीत.’’ अद्भुतप्रकारे कार्य करणार्‍या देवावर आपला असा विश्वास असावा.