WFTW Body: 

“समजा, तुमच्यापैकी एखाद्याचा मित्र मध्यरात्री तुमच्या घरी आला आणि त्याच्यावरील प्रेमापोटी व सौजन्यापोटी तुम्ही त्याला विचारता की त्याने जेवण केले आहे का. जर तो म्हणाला की त्याने जेवण केले नाही, आणि तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये पाहता आणि तिथे किंवा घरात इतरत्र कुठेही अन्न नाही हे बघता, तर तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे जाता.”(लूक ११:५)

आता, हे खूप दुर्मिळ आहे. क्वचितच कोणी मध्यरात्री आपल्या शेजाऱ्याकडे जाऊन त्याला उठवून आपल्या मित्रासाठी अन्न मागेल, पण ही व्यक्ती तसे करते. तो जातो, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो, “कृपया मला तीन भाकरी उधार द्या. मी त्या उद्या परत करीन, पण त्या मला आता उधार द्या. माझ्या घरी एक पाहुणा आला आहे, तो माझा एक खूप चांगला मित्र आहे, आणि माझ्याकडे त्याला देण्यासाठी काहीच अन्न नाही.” तेव्हा, त्या घरातील माणूस त्याला आतून सांगतो की त्याला किंवा त्याच्या मुलांना त्रास देऊ नकोस, कारण ते सर्व झोपलेले आहेत,“तू आम्हाला मध्यरात्री त्रास देत आहेस, आम्हा सर्वांना जागे करत आहेस आणि सतत दारावर ठोठावत आहेस.” पण ही व्यक्ती दार ठोठावतच राहील आणि जोपर्यंत त्याला जे हवे आहे ते मिळत नाही तोपर्यंत आपल्या शेजाऱ्याला झोपू देणार नाही.

प्रभू म्हणतो,“जरी हा शेजारी, तुम्हाला काही देत नसला तरीही, तूम्ही त्याचे मित्र असल्यामुळे, तुमच्या चिकाटीमुळे आणि तुमच्या निर्लज्जपणे दार ठोठावण्यामुळे, तो उठून तुम्हाला पाहिजे तेवढे देईल.” हा किती सुंदर शब्दप्रयोग आहे “तुला पाहिजे तेवढे,”.

मला आठवतं, जेव्हा मी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी - देवाच्या वचनाचा प्रभावी शिक्षक होण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी - बोलण्याची शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. जेव्हा मी ख्रिस्ती झालो आणि देवाचे वचन इतरांना सांगू लागलो, तेव्हा मी खूप लाजाळू होतो. मला माहित होतं की मला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे, आणि जर मला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मिळाले, तर माझे एका वेगळ्याच व्यक्तीमध्ये रूपांतर होईल. आणि अगदी तसेच घडले. जर तुम्ही स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यशाली अलौकिक अभिषेकासाठी देवाचा शोध घेतला आणि “प्रभू, ह्यांना खाऊ घालण्यासाठी मला भाकर दे,” असे म्हणत सतत दार ठोठावत राहिलात (हाच उल्लेख आपण लूक ११:८ मध्ये पाहिला आहे), तर देव तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सर्व काही देईल (लूक ११:१३). येथे मी पवित्र आत्म्याबद्दल बोलत आहे. आपण देवाकडे काय मागायला हवे, हे येशूने स्पष्ट केले आहे. “इतरांची सेवा करण्यासाठी मला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य दे. माझ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत, आपण लूक १८ च्या पुढे गेलो आहोत, आता मी इतरांच्या गरजांचा विचार करत आहे.” हाच खरा ख्रिस्ती आहे.

बऱ्याचदा, लोकांना त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहावेसे वाटावे यासाठी, विजेचा धक्का किंवा त्यासारखा अनुभव येण्यासाठी, परकीय भाषांमध्ये बोलण्यासाठी, किंवा स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा ते शोध घेतात. आपण इतर लोकांना आशीर्वाद देऊ शकण्यासाठी पवित्र आत्म्याच्या दानांचा शोध घेतला पाहिजे. मला आठवते, जेव्हा मी पवित्र आत्म्याच्या दानांसाठी देवाचा शोध घेतला होता. ते इतरांची सेवा करण्यासाठी होते, आणि जरी देवाने मला परकीय भाषा बोलण्याचे वरदान दिले असले, तरी ते स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी होते, कारण पवित्र शास्त्र म्हणते की जो परकीय भाषेत बोलतो तो स्वतःलाच उन्नत करतो. मला स्वतःला उन्नत करायचे होते, जेणेकरून मी इतरांची सेवा करत असताना नेहमी ताजेतवाने राहीन. म्हणून, परकीय भाषा बोलण्याचे वरदानसुद्धा इतरांच्या फायद्यासाठी होते, स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी होते. आत्म्याचे कोणतेही वरदान माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हते, तर अशा वैयक्तिक उन्नतीसाठी होते ज्यामुळे इतर लोकांना आशीर्वाद मिळेल.

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पवित्र आत्म्याची सर्व वरदाने इतरांसाठी आहेत. आत्म्याच्या फळांचा मला फायदा होतो. जर मला आनंद किंवा शांती मिळाली, तर त्याचा फायदा मला होतो, तुम्हाला नाही. पण, जर माझ्याकडे पवित्र आत्म्याची वरदाने असतील, मग ती भविष्यवाणी सांगणे असो, रोग बरे करण्याची शक्ती असो किंवा इतर कोणतेही वरदान असो, त्या वरदानांचा इतरांना फायदा होतो. आपल्याला या दोन्हींची गरज आहे. तुम्हाला देवाला मागण्याची गरज आहे आणि तुम्हाला विश्वासाची गरज आहे.

तुम्ही वाईट असतानाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून देईन (विशेषतः पवित्र आत्मा आणि त्याच्या सर्व चांगल्या देणग्या) (लूक ११:१३) आपण आपल्या पित्याकडे येत आहोत, असा विश्वास आपल्याला ठेवण्याची गरज आहे. आपण एखाद्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे (CEO) येत नाही, ज्याला आपण भेटू शकत नाही आणि आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सचिवाच्या माध्यमातून जावे लागते. आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे येत आहोत, आणि तो आपल्याला काय नाकारेल? अशी कोणतीही चांगली गोष्ट नाही जी तो आपल्याला कधीही नाकारू शकेल. जर देवाला आपल्याला एखादी गोष्ट देणे योग्य वाटत नसेल, तर आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो की ती आपल्यासाठी चांगली नाही.

प्रेषित पौलाला एकदा त्याच्या शरीरात एक आजार झाला होता, ज्याला तो 'शरीरातील काटा' म्हणत असे. तो काढून टाकावा म्हणून त्याने तीन वेळा प्रार्थना केली (करिंथकरांस दुसरे पत्र १२). देवाने तो काढला नाही, आणि त्याला जाणीव झाली की ते त्याच्या हिताचेच होते, कारण त्यामुळे तो नम्र आणि लीन राहिला. देव आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टीच देतो, आणि जेव्हा देव आपल्यावर अशा प्रकारे, प्रचंड कृपा करतो, तेव्हा आपण काय केले पाहिजे? आपण इतर लोकांशी चांगले वागले पाहिजे.

“प्रभू, ज्या लोकांची मला सेवा करायची आहे, त्यांची गरज भागवण्यासाठी जे मला साहाय्य करेल ते तू मला द्यावेस अशी माझी इच्छा आहे.” जेव्हा तुमच्या मंडळीतील लोकांसाठी तुमच्या मनात तळमळ असते, त्यांना ईश्वरी जीवनाकडे नेण्याची, येशूने आज्ञा केलेल्या सर्व गोष्टी करण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची, डोंगरावरील प्रवचनाच्या मानकांनुसार जगण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी प्रार्थना कराल, तुम्ही स्वर्गातून एका भविष्यसूचक वचनासाठी प्रार्थना कराल, जे त्या लोकांची गरज भागवेल आणि त्यांना सैतानाच्या तावडीतून सोडवून ईश्वरी जीवनाकडे आणेल. आणि जर तुम्ही त्यांच्यावर पुरेसे प्रेम करत असाल, तर तुम्ही चिकाटी दाखवाल.

तुम्हाला नाही वाटत का की, जो माणूस मध्यरात्री आपल्या शेजाऱ्याच्या घरी गेला, त्याचे त्या पाहुण्यावर प्रेम होते? त्याचे त्याच्यावर इतके प्रेम असले पाहिजे की, त्याने त्या रात्री त्याला अन्न देण्याचा निश्चय केला होता. आपल्यापैकी बहुतेक जण, जर पाहुणा आल्याच्या रात्री आपल्याकडे खायला काही नसेल, तर आपण त्याला म्हणू, "मला माफ करा, पण आमच्याकडे आता खायला काही नाही, म्हणून आपण आता झोपूया, मी सकाळी तुझ्यासाठी काहीतरी आणीन." पण या माणसाचे आपल्या भुकेल्या पाहुण्यावर इतके प्रेम होते की तो म्हणाला, "जरी मला माझ्या शेजाऱ्यासमोर निर्लज्ज व्हावे लागले तरी चालेल पण मी आज रात्री तुझ्यासाठी काहीतरी आणणारच." चिकाटीने देवाकडे जाण्याचे आणि 'प्रभू, या लोकांची सेवा करण्यासाठी मला पवित्र आत्म्याचे दाने दे' असे म्हणण्याचे हे एक अद्भुत चित्र आहे.