लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   देवाचा ज्ञान
WFTW Body: 

“जे पवित्र आहे ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका, टाकाल तर ती त्यांना पायाखाली तुडवतील व उलटून तुम्हांस फाडितील” (मत्तय ७:६). याचा अर्थ काय? जेव्हा येशू सिरोफोनिशियातील सोर देशात गेला होता, तेव्हा तेथे अशाच एका विधानाचा उल्लेख आढळतो (मत्तय १५:२१-२८). जेव्हा येशू सोरला पोहोचला, तेव्हा एक स्त्री आपल्या भूतग्रस्त मुलीसाठी मदत मागायला आली. येशू मागे वळून म्हणाला, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!” (मत्तय १५:२६). काही लोकांनी या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

येशू तिला कुत्रा म्हणत होता का ? तुम्ही तिरस्कार करत असलेल्या एका व्यक्तीला मदत करण्यासाठी १५० किलोमीटर चालत जाल का? १५० किलोमीटर चालायला किती वेळ लागेल? बरेच दिवस तरी लागतील. तिथे आपल्याला ख्रिस्ताच्या तिच्याबद्दलच्या प्रेमाची तीव्रता दिसते. तो तिच्यावर किती खोलवर प्रेम करत होता हे माहीत असून, इथे आपल्याला दिसते की प्रभू तिची परीक्षा घेत होता, हे पाहण्यासाठी की, देवाकडून आपल्याला काहीही मिळण्यासाठी ती योग्य नाही आहे हे ओळखून ती कोणतेही हीन स्थान स्वीकारण्यास तयार आहे की नाही. जेव्हा ती म्हणाली, “ठीक आहे. मी एक कुत्री आहे, पण मेजावरून पडणारे तुकडे मला मिळतील का?” तेव्हा येशू म्हणाला, “हे स्त्री, तुझा विश्वास मोठा आहे!” येशूने आयुष्यात फक्त दोनदाच कोणालातरी असे म्हटले होते, आणि दोन्ही वेळा ते गैर-यहूदी लोकांना म्हंटले आहे. एक रोमन शताधिपतीला आणि दुसरे या सिरोफोनेशियन स्त्रीला. पाहा, त्याने तिचे किती कौतुक केले!

आपण हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा येशू पवित्र शास्त्रामध्ये कुत्रे आणि डुकरे यांच्याविषयी बोलतो, तेव्हा तो लोकांचा तिरस्कार करत नाही. त्याला हे आपल्याला समजून द्यायचे आहे की, देवाकडून आपल्याला काहीही मिळण्यास आपण योग्य नाही आहोत. जो कोणी असा विचार करतो की, “देवाने माझ्यासाठी काहीतरी करावे, ते मला मिळायलाच हवे,” त्याने देवापुढे मनुष्याचे स्थान समजून घेतलेले नाही. तुम्ही आणि मी फक्त नरकास पात्र आहोत. जर आपण देवाकडे जाऊन म्हणालो, “प्रभू, आम्हाला जे मिळायला हवं ते दे,” तर त्याने आपल्याला नरकच द्यायला हवा. त्यापेक्षा उत्तम काहीही मिळालं, तर ती देवाची कृपा आहे. जेव्हा आपल्याला हे समजते, तेव्हा आपल्या लक्षात येईल की देवाकडून आपल्याला अशा अनेक गोष्टी मिळतात ज्यासाठी आपण पात्र नसतो. पण बहुतेक लोकांना हे स्थान समजत नाही.

म्हणून, जेव्हा आपण असे विधान पाहतो, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की आपण कोणालाही कुत्र्यासारखी किंवा डुकरासारखी वागणूक द्यावी. आपण सर्व पापी आहोत. प्रत्येक व्यक्ती पापी आहे. आपण सर्व पापी आहोत. आपल्यापैकी काही जण देवाच्या कृपेने वाचले आहेत आणि त्यांची पापे क्षमा झाली आहेत, तर काही जण अजूनही त्यांच्या पापांमध्ये आहेत, पण मुळात आपण सर्वच पापी आहोत कारण आपल्याला हे आदामकडून वारसा म्हणून मिळाले आहे. त्यामुळे एका व्यक्तीने स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजण्याचे किंवा दुसऱ्याला कुत्रा किंवा डुकरासारखे तुच्छ लेखण्याचे काही कारण नाही.

जेव्हा येशू म्हणाला, “जे पवित्र आहे ते कुत्र्यांना देऊ नका,” तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, “ज्या गोष्टीची लोक कदर करत नाहीत, ती त्यांना देऊ नका.” कुत्र्याला फक्त हाड हवं असतं. त्याला पवित्र असं काही नको असतं. जेव्हा एखादा माणूस देवापेक्षा पृथ्वीवरील भौतिक गोष्टींमध्ये जास्त रस घेतो, तेव्हा तो एका अर्थाने प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नसतो. तुम्ही कशासाठी जगता? तुम्ही फक्त मुलं वाढवण्यासाठी, लैंगिक सुखासाठी, झोपण्यासाठी आणि चांगलं अन्न खाण्यासाठी जगता का? बरं, सर्व प्राण्यांनाही याच गोष्टींमध्ये रस असतो ! प्राण्यांना नेहमीच जगिक गोष्टींमध्ये रस असतो. कुत्रे नेहमी जमिनीकडे खाली बघत असतात. डुकरेही तसेच असतात. तुम्हाला कधीही कुत्रा किंवा डुक्कर स्वर्गाकडे वर बघताना दिसणार नाही. प्राणी नेहमी पृथ्वीवरील गोष्टींकडे खाली बघत असतात, आणि इथे ‘कुत्रे’ या शब्दाचा तोच अर्थ आहे - याचा अर्थ आहे “ज्यांची मनं जगिक गोष्टींवर केंद्रित आहेत असे लोक.”

खरा ख्रिस्ती आपले मस्तक उंच ठेवतो . तो वरच्या गोष्टींकडे पाहत असतो. ज्या लोकांना वरच्या गोष्टींमध्ये रस नाही, त्यांना पवित्र गोष्टी देण्यात काहीच अर्थ नाही. हे डुकरांपुढे मोती टाकण्यासारखं आहे. डुकरांना खूप कचऱ्याची (घाणीची) गरज असते. त्यांना तेच खायला आवडते, म्हणून त्यांना पवित्र गोष्टी देण्यात काही अर्थ नाही. येशू डोंगरावरील प्रवचनाविषयी बोलत आहे - डोंगरावरील प्रवचनातील शिकवण अविश्वासणाऱ्यांसाठी नाही. मत्तय ७:६ चा हाच मुद्दा आहे: जे पुन्हा जन्मलेले नाहीत त्यांना हा संदेश देऊ नका, कारण ते त्याचे महत्त्व जाणू शकत नाहीत. आपण एखाद्या व्यक्तीला कोणते सत्य देऊ शकतो हे समजणे आवश्यक आहे. या वचनात ख्रिस्त हेच सांगत आहे.

ज्यांचा नव्याने जन्म झालेला नाही, त्यांना पश्चात्तापाचा संदेश ऐकण्याची गरज आहे. ते पापी आहोत, हे त्यांना समजणे आवश्यक आहे. आपण नरकाच्या शिक्षेस पात्र आहोत, हे त्यांना समजणे आवश्यक आहे. आपण हरवलेले आहोत, देवापासून तुटलेले आहोत आणि नरकातील अनंत विनाशाकडे चाललो आहोत, हे त्यांना समजणे गरजेचे आहे. ख्रिस्ती नसलेल्यांना आणि अगदी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्यांनाही (ज्यांचा नव्याने जन्म झालेला नाही किंवा ज्यांचा ख्रिस्ताशी जिवंत संबंध जोडला गेलेला नाही) हाच संदेश ऐकण्याची गरज आहे.

प्रत्येक मनुष्य, जर तो आपल्या जीवनात देवाला प्रथम स्थान देत नसेल , तर तो खरोखरच एखाद्या प्राण्यासारखा आहे. प्राण्याला देवात, प्रार्थनेत किंवा देवाला काय म्हणायचे आहे हे ऐकण्यात काहीही रस नसतो. जेव्हा एखादा मनुष्य पृथ्वीवर राहतो आणि त्याला प्रार्थना, देव किंवा देवाला त्याला काय सांगायचे आहे हे ऐकण्यात काहीच रस नसतो, तेव्हा तो प्राण्यापेक्षा वेगळा नसतो. प्राण्याला लैंगिक संबंधांमध्ये रस असतो. जेव्हा माणसाला प्रामुख्याने लैंगिक संबंधांमध्येच रस असतो, तेव्हा तो प्राण्यासारखाच असतो. प्रत्येक प्राण्याला लैंगिक संबंध आणि अन्नामध्ये रस असतो; आणि जेव्हा माणसे केवळ अन्न, लैंगिक संबंध, झोप आणि संतती निर्माण करणे यातच रस घेतात, तेव्हा ते अगदी प्राण्यांसारखीच असतात. पण देवाने जेव्हा आदामला निर्माण केले, तेव्हा त्यात एक फरक होता. देवाने आदामाला त्याच मातीपासून बनवले ज्या मातीपासून त्याने डुकरे, कुत्रे आणि इतर सर्व प्राणी बनवले होते. ती अगदी तीच माती होती.

जर तुम्ही कुत्रे आणि डुकरे यांच्या अंतर्गत अवयवांकडे पाहिले, तर माणसाचे अंतर्गत अवयव आणि या प्राण्यांचे अंतर्गत अवयव यांच्यात खूप साम्य आढळते. म्हणून प्रभूला हेच सांगायचे होते की, शारीरिकदृष्ट्या तुम्ही दोघेही एकाच मातीने बनलेले आहात. आणि म्हणूनच देवाने सहाव्या दिवशी प्राणी आणि मनुष्य या दोघांचीही निर्मिती केली. सहाव्या दिवसाच्या पहिल्या भागात त्याने प्राणी निर्माण केले आणि दुसऱ्या भागात त्याने मनुष्य निर्माण केला. पण प्राण्यांच्या बाबतीत एक मोठा फरक होता: देवाने त्यांच्यात श्वास फुंकला नाही. मातीपासून निर्माण होताना त्यांना आपोआपच श्वास मिळाला होता, परंतु मनुष्य निर्माण होताच देवाने त्याच्यात श्वास फुंकला आणि तो एक जिवंत आत्मा बनला (उत्पत्ति २:७); आणि हीच गोष्ट होती जिने त्याला प्राण्यांपासून त्वरित वेगळे केले – तो म्हणजे देवाचा श्वास.

जर देवाने आदाममध्ये श्वास फुंकला नसता, तर तो दिसायला कदाचित माणसासारखा दिसला असता, पण तो एखाद्या प्राण्यासारखाच राहिला असता. परंतु ज्या क्षणी देवाने त्याच्यात श्वास फुंकला, त्या क्षणी तो एक 'जिवंत आत्मा' बनला. तो एक 'सार्वकालिक अस्तित्व' बनला; याउलट प्राणी हे सार्वकालिक नसतात. जेव्हा एखादा प्राणी मरतो, तेव्हा त्याचे केवळ मातीत रूपांतर होते. पण जेव्हा देवाने माणसात श्वास फुंकला आणि माणूस जिवंत आत्मा बनला, तेव्हा तो त्याच क्षणी एक सार्वकालिक अस्तित्व बनला—असे अस्तित्व ज्याला देवाला जाब द्यावा लागणार आहे. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन' नव्हते, कारण सार्वकालिक जीवन म्हणजे असे जीवन ज्याला कोणतीही सुरुवात नाही, आणि ते केवळ देवाचेच आहे . परंतु जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करतो, ख्रिस्ताकडे येतो आणि त्याला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपण ते सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. अन्यथा, आपण केवळ अशी सार्वकालिक अस्तित्त्वे राहू जी नरकात जातील आणि देवापासून वेगळे होऊन तिथे अनंतकाळ वास्तव्य करतील.

प्रभू हेच सांगत आहे की, या पृथ्वीवर लोकांचे दोन स्पष्ट गट आहेत. एक गट असा आहे जो अगदी प्राण्यांसारखा (उदा. कुत्रे आणि डुकरे) जगतो, आणि दुसरा गट असा आहे जो हे ओळखतो की आपण देवाची मुले असलो पाहिजे आणि देवाने त्यांना असे सार्वकालिक अस्तित्व दिले आहे ज्याचा त्यांना जाब द्यावा लागणार आहे . जेव्हा देवाने माणसात श्वास फुंकला, तेव्हा तो जरी मातीपासून बनलेला असला तरी त्याला एक 'विवेकबुद्धी' देण्यात आली होती; या विवेकबुद्धीमुळेच त्याला जाणीव होते की आपल्या कृती आणि शब्दांसाठी आपण देवाला जबाबदार आहोत. प्राण्यांना विवेकबुद्धी नसते. काही चुकीचे कृत्य केल्यावर त्यांना अपराधीपणाची भावना वाटत नाही; याउलट माणसाला (मग तो जंगलातील पूर्णपणे अशिक्षित आणि रानटी माणूस का असेना) अपराधीपणाची जाणीव होते, कारण त्याच्याकडे विवेकबुद्धी असते.

जंगलातील रानटी लोकसुद्धा नतमस्तक होऊन पूजा करतात - उदाहरणार्थ, एखाद्या खडकाची, दगडाची किंवा सूर्याची. त्यांच्यात एक प्रकारची जाणीव असते की कोणीतरी निर्माता आहे, एक सार्वकालिक अस्तित्व आहे, ज्याला ते उत्तरदायी आहेत. तुम्हाला कुठेही धार्मिक कुत्रा, धार्मिक माकड किंवा डुक्कर सापडणार नाही. असे का आहे की रानटी लोकांमध्येसुद्धा, आपण उत्तरदायी असलेल्या एका सार्वकालिक अस्तित्वाची जाणीव असते? कारण त्यांच्यात सद्सद्विवेकबुद्धी असते. प्रत्येक माणसाला सद्सद्विवेकबुद्धी असते, आणि हेच माणसाला डुक्कर, कुत्रे आणि इतर प्राण्यांपासून वेगळे करते.