WFTW Body: 

“तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही, लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाहीत, तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे ” (मत्तय ५:१४-१६).

प्रकाश हे येशूने वापरलेला आणखी एक उदाहरण किंवा शब्दचित्र आहे. येशूच्या काळात, ते दिवे वापरत असत. दिव्याची वात ही खूप लहान गोष्ट आहे (आज बल्ब ही खूप लहान गोष्ट आहे). पण तो संपूर्ण खोली प्रकाशाने उजळवतो! वातीचा आकार किंवा बल्बचा आकार नाही तर त्यातून येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता महत्त्वाची आहे. पुन्हा भर प्रमाणावर नाही तर गुणवत्तेवर आहे. शून्य वॅटचे बल्ब इतके मंद प्रकाश देतात की तुम्हाला त्या बल्बच्या प्रकाशात काहीही दिसत नाही, पण त्याच आकाराचे शक्तिशाली बल्ब असतात, जसे की हॅलोजन बल्ब, जे संपूर्ण रस्ता प्रकाशाने उजळवतात. एक बल्ब खूप कमी वॅटेजचा किंवा खूप जास्त वॅटेजचा असू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट त्याचा आकार नाही, तर त्याची शक्ती आहे - त्याची तीव्रता ज्यामुळे तो काहीतरी प्रकाशित करू शकतो. आणि येशू म्हणतो, "तुम्ही जगाचा प्रकाश आहात."

जग अंधारात आहे आणि माझ्यामध्ये त्या अंधाराचे काहीही नसावे. जर मी बल्ब आहे आणि जगाचा अंधार माझ्यामध्ये असेल, तर मी तुटलेल्या बल्बसारखा आहे. बऱ्याच मंडळींमध्ये तुटलेल्या बल्बसारखे ख्रिस्ती आहेत. एकेकाळी ते जळत होते, पण आता ते तुटले आहेत: ते मागे घसरले आहेत आणि आता त्यांचा प्रकाश पडत नाही. तो प्रकाश काय आहे? येथे म्हटले आहे, " तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की त्यानी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे ”. त्या काळात, सतत तेलाने जळत असलेल्या वातीमुळे दिव्यातून प्रकाश येत असे आणि ते तेल पवित्र आत्म्याचे चित्र आहे.
पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेल्या व्यक्तीचे एक चिन्ह म्हणजे तो सत्कर्मे करतो. प्रेषितांची कृत्ये १०:३८ मध्ये म्हटले आहे की जेव्हा येशूला पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने अभिषिक्त करण्यात आले तेव्हा तो सत्कर्मे करत फिरला. आजकालच्या अनेक तथाकथित "अभिषिक्त" प्रचारकांप्रमाणे तो लोकांकडून त्यांच्या सेवेसाठी पैसे गोळा करत फिरला नाही. तो त्यांच्या अगदी उलट होता. तो सत्कर्मे करत फिरला आणि त्याने कधीही त्यासाठी पैसे घेतले नाहीत. त्याने न मागता लोकांनी स्वेच्छेने त्याला भेटवस्तू दिल्या आणि त्याने त्या स्वीकारल्या, परंतु तो कधीही त्याच्या गरजा कोणालाही सांगत नव्हता. तो कुठल्याही शुल्काशिवाय सत्कर्मे करत फिरला.

तो म्हणतो, “तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून ते तुमचे नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतील!” जर तुम्ही स्वतःसाठी आदर मिळवण्यासाठी, गौरव मिळवण्यासाठी चांगली कामे करता, तर तो प्रत्यक्षात अंधार आहे. बरेच ख्रिस्ती जे सत्कर्मे करतात ते प्रत्यक्षात स्वतःची जाहिरात करण्यासाठी, सन्मान मिळवण्यासाठी करतात. त्यांची संघटना किंवा त्यांची सेवा प्रत्यक्षात अंधारात आहे कारण स्वर्गातील पित्याला त्याचे कोणतेही गौरव मिळत नाही. त्याऐवजी, त्या विशिष्ट संघटनेला किंवा त्या विशिष्ट माणसाला गौरव मिळतो. पण येशू म्हणाला, “लोकांना तुमची चांगली कामे पाहू द्या आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करु द्या .” जेव्हा एखादी व्यक्ती सत्कर्मे करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे नाही तर ख्रिस्ताचे गौरव होते, तो खरा प्रकाश आहे .

प्रकाश प्रकट करण्याचा अर्थ असा आहे. योहान १:४ मध्ये, या प्रकाशाचे वर्णन असे केले आहे: “येशू ख्रिस्ताच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.” म्हणून प्रकाश हा एक सिद्धांत, शिकवण किंवा विशिष्ट संदेश नाही - तो एक जीवन आहे. पवित्र आत्म्याद्वारे आपल्यातून बाहेर पडणारे येशूचे जीवन आहे. आपल्यातून बाहेर येणारे येशूचे जीवन हे एका जुन्या दिव्यासारखे आहे जे तेलाने पेटवले जात असत आणि प्रकाश देत असत.

योहान ८:१२ मध्ये येशूने अगदी स्पष्टपणे म्हटले आहे, “मीच जगाचा प्रकाश आहे ; जो माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही.” योहान ८:१२ नुसार जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती अंधारात चालत असते तेव्हा आपण निःसंशयपणे म्हणू शकतो की ती व्यक्ती येशूचे अनुसरण करत नाही. जर तुम्ही म्हणाल, "ठीक आहे, मी सध्या थोडा अंधारात आहे," तर त्याचे कारण असे आहे की तुम्ही येशूचे अनुसरण करत नसाल. कृपया अंधारात चालणे आणि देवाच्या इच्छेबद्दल अनिश्चितता यात गोंधळ करू नका. येशू देखील गेथशेमानेच्या बागेत द्विधा मनस्थितीत असल्यामुळे पित्याच्या इच्छेबद्दल संभ्रमित होता. म्हणूनच त्याने एक तास प्रार्थना केली," पित्या, तुझी इच्छा काय आहे, मी हा प्याला पिऊ की नाही?" तो अंधार नाही. मनाची गोंधळलेली अवस्था विश्वासाच्या जीवनाचा एक भाग आहे, परंतु अंधार काहीतरी वेगळे आहे, येशूच्या जीवनाच्या विरुद्ध आहे. येशू म्हणाला, "जो माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील, कारण मीच जगाचा प्रकाश आहे."

मग तो पुढे म्हणाला की तो काही विशिष्ट काळासाठीच जगाचा प्रकाश होता. "मी जगात असेपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे" (योहान ९:५). तो जगात किती काळ होता? तो केवळ साडेतेहेतीस वर्षे या जगात होता. फक्त एवढेच.

अति-आध्यात्मिक लोक असे म्हणतील, "ख्रिस्त सध्या जगात नाही का?" बरं, जर तुम्ही योहान १७:११ वाचले तर तिथे तो म्हणतो, "मी आता या जगात नाही."

आपल्याला आपल्या अति-आध्यात्मिकतेपासून मुक्त व्हावे लागेल. येशूने ही पृथ्वी सोडून स्वर्गात जाण्यापूर्वी, वधस्तंभाच्या पूर्वसंध्येला, तो म्हणाला, "मी आता जगात नाही. पण हे शिष्य येथे जगात आहेत. ते जगात आहेत, पण मी आता येथे नाही. पवित्र पित्या, मी तुझ्याकडे येत आहे, म्हणून मी आता या जगात नाही." म्हणून जेव्हा त्याने योहानाच्या ९ व्या अध्यायात म्हटले, "जोपर्यंत मी या जगात आहे," तो ३३ ½ वर्षांच्या कालावधीबद्दल बोलत होता जेव्हा त्याने त्याचे जीवन प्रकट केले. तो स्वर्गात गेल्यानंतर, आज जगाचा प्रकाश कोण आहे?

मत्तय ५:१४ म्हणते, "तू जगाचा प्रकाश आहेस." जर कोणी मला विचारले, "जगाचा प्रकाश कोण आहे?", तर शास्त्रवचनातील उत्तर असे असेल की, " येशूचे अनुसरण करणाऱ्या इतरांसह मी जगाचा प्रकाश आहे." तुम्ही कधी अशा प्रकारे विचार केला आहे का? "जगाचा प्रकाश कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर "मी आणि येशूचे इतर अनुयायी” असे उत्तर देण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे बरोबर उत्तर आहे.

"अरे, माझ्याकडे पाहू नका. फक्त येशूकडे पहा." असे म्हणणे खूप सोपे आहे. पण तो पृथ्वीवर नाही! तो म्हणाला, "मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” अनेक ख्रिस्ती लोकानी शास्त्रवचनांचे योग्य वाचन केलेले नाही आणि त्यांच्या डोक्यात अनेक प्रकारचे चुकीचे विचार येतात जे त्यांच्या स्वतःच्या समजुतीतून आलेले आहेत आणि ते पूर्णपणे चुकीचे आहेत. ज्याप्रमाणे देव त्या ३३ ½ वर्षात त्याचे जीवन परिपूर्णपणे प्रकट करण्यासाठी येशू ख्रिस्तावर १००% अवलंबून होता, त्याचप्रमाणे तो आता तोच प्रकाश परिपूर्णपणे प्रकट करण्यासाठी त्याच्या मंडळीवर - पृथ्वीवरील त्याच्या शिष्यांवर - अवलंबून आहे.

"लोकांना तुमची सत्कर्मे पाहू द्या आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करू द्या ”