परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय; पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. (नीतिसूत्रे१:७)
हे पहिले नीतिसूत्र आहे. हे खूप महत्वाचे आहे की हे पहिलेच नीतिसूत्र आहे. येथे ज्ञानाचा प्रारंभ असे म्हंटले आहे म्हणजे आपण असे म्हणू शकतो की हे पायाचा संदर्भ देत आहे. पुढे नीतिसूत्रे ९:१० मध्ये म्हंटले आहे, "परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा(बुद्धीचा) आरंभ होय." ज्ञान आणि बुद्धी खरोखर एकमेकांशी जोडलेले आहेत, कारण ज्ञान म्हणजे पवित्र शास्त्रा बद्दलचे ज्ञान नाही. याचा अर्थ देवाबद्दलचे ज्ञान आहे. जेव्हा आपण ज्ञानाबद्दल वाचतो तेव्हा त्याचा अर्थ पवित्र शास्त्राचे शैक्षणिक ज्ञान नाही. कारण सैतानाकडे ते आहे पण त्याला परमेश्वराचे भय नाही. म्हणून हे स्पष्ट आहे की नीतिसूत्रे १:७ पवित्र शास्त्राच्या ज्ञानाचा संदर्भ देत नाही. येथे सांगितलेले ज्ञान हे देवाबद्दलचे ज्ञान आहे ! ते पवित्र शास्त्राच्या ज्ञानापेक्षा बरेच वेगळे आहे.
पवित्र शास्त्राचे ज्ञान असलेल्या अनेक लोकांना देवाबद्दलचे ज्ञान नसते. परमेश्वराचे भय ही ज्ञानाची सुरुवात आहे. "हे सार्वकालिक जीवन आहे, यासाठी की त्यांनी तुला, एकमेव खऱ्या देवाला आणि ज्याला तू पाठवले आहेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे" (योहान १७:३). देव कसा आहे हे अधिकाधिक जाणून घेणे. पौलाने म्हटले की त्याच्या जीवनाची सर्वात मोठी तळमळ म्हणजे : "...मी त्याला ओळखावे..."(फिलिप्पैकरास पत्र ३:१०). म्हणजेच, त्याला देवाला अधिकाधिक जाणून घ्यायचे होते. देव कसा आहे हे अधिकाधिक जाणून घेणे म्हणजे, देव लोकांकडे कसा पाहतो, देव परिस्थितीकडे कसा पाहतो, देव प्रत्येक गोष्टींकडे कसा पाहतो हे अधिकाधिक जाणून घेणे - मग पौल स्वतःचे मत बदलून त्या विचारसरणीकडे वळू शकला. ह्या ज्ञानाबद्दल येथे सांगितले आहे .
पहिलेच नीतिसूत्र आपल्याला शिकवते की देवाला जाणून घेण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे भय बाळगणे; त्याच्याबद्दल आदर बाळगणे. पापाचा द्वेष करणे आणि नीतिमत्तेवर प्रेम करणे. हे देवाचे भय धरणे आहे. आणि मग आपण त्याला अधिकाधिक चांगले ओळखू शकतो. म्हणूनच आपल्याकडे किती बुद्धिमत्ता आहे हा प्रश्न नाही, तर आपल्याकडे देवाचे किती भय आहे हे ठरवते की आपण अध्यात्मिक ज्ञान आणि अध्यात्मिक बुद्धीत किती वाढतो.
तर अगदी सुरुवात - त्याला तुम्ही पाया, कोनशिला काहीही म्हणा – परमेश्वराचे भय धरणे आहे. ही शर्यतीची सुरुवातीची रेषा आहे. जर तुम्ही तिथे नसाल तर तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. आपण असेही म्हणू शकतो की ते सर्व ज्ञानाचे सार आहे. सर्व ज्ञानाचा मुख्य भाग म्हणजे देवाचे भय आहे, आणि ज्या दिवशी मी देवाचे भय गमावतो, तेव्हा मला देवाची समज किंवा शहाणपण मिळू शकत नाही. ज्ञान (बुद्धी/ शहाणपण) वाढवण्याचा मार्ग म्हणजे देवाचे भय वाढवणे. देवाचे ज्ञान वाढवण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वराचे भय वाढवणे.
या वचनावरून आपल्याला हे देखील समजते की मूर्ख कोण आहे. जेव्हा पवित्र शास्त्र मूर्खाबद्दल बोलते तेव्हा ते गणितात पंधरा टक्के आणि विज्ञानात दहा टक्के मिळालेल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही. ज्या व्यक्तीला असे गुण मिळाले आहेत त्यांना जर देवाचे भय असेल तर शास्त्रानुसार ते ज्ञानी असू शकतात. जेव्हा पवित्र शास्त्र मूर्खाबद्दल बोलते तेव्हा ते अश्या व्यक्तीबद्दल बोलत नाही जो अभ्यासात वाईट आहे. हे अश्या व्यक्तीबद्दल बोलते ज्याला परमेश्वराचे भय नाही - एक अशी व्यक्ती जी स्त्रियां बद्दल लालसा बाळगते आणि त्याबद्दल शोक करत नाही, रडत नाही. तो मूर्ख आहे जरी त्याने गणित आणि विज्ञानात नव्वद टक्के मिळवले असले तरीही ! तो पूर्णपणे मूर्ख आहे, आणि हा तोच व्यक्ती आहे ज्याबद्दल शलमोनाने नीतिसूत्राच्या पुस्तकात सहासष्ट गोष्टी लिहिल्या आहेत. हा अश्या प्रकारचा माणूस आहे ज्याला पाप करण्याच्या बाबतीत देवाचे भय नाही – मग ते खोटे बोलणे असो किवा खोट्या कागदपत्रांवर सही करणे किंवा इतर सर्व प्रकारची पापे करणे असो. त्याच्या मनात अशा गोष्टींबद्दल अस्वस्थता नाही. शलमोनाने अशा मूर्खांबद्दल सहासष्ट गोष्टी लिहिल्या आहेत.
मूर्ख ते आहेत जे ज्ञान आणि सूचनांचा तिरस्कार करतात. देवाच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहण्याची त्यांना समज नाही. आपण असे म्हणू शकतो की ज्ञान म्हणजे लोकांकडे, गोष्टींकडे आणि संपूर्ण जगाकडे देव ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने पाहणे. माझ्याकडे जितके जास्त ज्ञान असेल तितके जास्त मी लोकांकडे देव ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने - कोमलतेने, करुणेने, प्रेमाने आणि शुद्धतेने पाहिले पाहिजे. जर मी लोकांकडे कोमलतेने, करुणेने, प्रेमाने आणि शुद्धतेने पाहू शकत नसेल , तर मला पवित्र शास्त्राचे ज्ञान कितीही असले तरी (जे सैतानाकडे माझ्यापेक्षा जास्त आहे) माझ्याकडे शहाणपण नाही. येथे आपल्याला हे पाहण्याची गरज आहे की पवित्र शास्त्र ज्या मूर्खाबद्दल बोलते तो मूर्ख तो आहे जो देवाला घाबरत नाही, ज्याला त्याच्या जीवनात देवाबद्दल आदर नाही, ज्याला पापाबद्दल घृणा नाही आणि जो नीतिमत्त्वावर प्रेम करत नाही.
ज्ञानाचे पुस्तक ज्या गोष्टीवर सर्वात आधी भर देते ते म्हणजे देवाचे भय बाळगणे. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने आत्मा काय म्हणत आहे ते ऐकावे.