प्रेषित पौलाने एकदा म्हटले होते, “नियमशास्त्राच्या नीतिमत्तेनुसार मी निर्दोष आढळलो.” प्रेषितांची कृत्ये २३:१ मध्ये जेव्हा त्याने महायाजकासमोर साक्ष दिली की, “मी आजपर्यंत देवासमोर पूर्णपणे सद्भावाने वागत आलो आहे,” तेव्हा त्याचा काय अर्थ होता? त्याचा अर्थ असा होता की तो सर्व आज्ञा पाळत होता. तो कोणत्या आज्ञा पाळत होता? फक्त पहिल्या नऊ, कारण तो रोमकरास पत्र ७:७-८ मध्ये सांगण्याइतका प्रामाणिक आहे की जेव्हा त्याने दहावी आज्ञा वाचली , ज्यामध्ये म्हटले होते की, “लोभ करू नको, वासना करू नको,” तेव्हा त्याला “सर्व प्रकारची वासना आढळली.” त्याने प्रत्येक प्रकारची वासना - पैशाची वासना, इतरांच्या बायका आणि मुलींची वासना, सन्मानाची वासना आणि इतर अनेक वासना – त्याला स्वतःमध्ये आढळल्या आणि त्याला जाणीव झाली की तो ही आज्ञा पाळू शकत नाही.
जेव्हा प्रेषित पौल त्याच्या हृदयात पवित्र आत्म्याने भरला होता (जसे पेन्टेकॉस्टच्या दिवशी लोक पवित्र आत्म्याने भरले होते ), तेव्हा तो रोमकरास पत्र ८:२ मध्ये म्हणतो की, "पवित्र आत्म्याचे नियम - दहा आज्ञा नाहीत तर - ख्रिस्त येशूमधील जीवनाचा नियम आहे, जो मला पापाच्या नियमापासून मुक्त करतो ज्यामुळे मी सतत क्रोध, वासना आणि इतर सर्व गोष्टींमध्ये पडत असतों ," आणि तो वचन ४ मध्ये पुढे म्हणतो, "नियमशास्त्राची नीतिमान आवश्यकता - जी "वासना करू नको" - आता आपल्या आत पूर्ण झाली आहे कारण आपण देहस्वभावाप्रमाणे नाही , तर आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतो." जुन्या कराराखाली हे अशक्य होते.
मत्तय ५ मध्ये येशूने या पापांवर मात करण्याबद्दल सांगितले तेव्हा तो अश्या गोष्टीबद्दल बोलत होता जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय माणसाला करणे अशक्य आहे. जर तुम्ही मत्तय ५, ६ आणि ७ वाचले तर तुम्हाला आढळेल की, त्या तीन अध्यायांच्या शेवटी, सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. ते काय आहे? "प्रभु, मी हे जीवन कसे जगू?" मत्तय ५, ६ आणि ७ मध्येही याचा उल्लेख नाही! डोंगरावरील प्रवचन आपल्याला नवीन कराराच्या ख्रिस्ती लोकांकडून, म्हणजेच नव्याने जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांकडून देवाला अपेक्षित असलेल्या जीवनाचा दर्जा दाखवते, पण त्या पर्यंत कसे पोहोचायचे हे संपूर्ण प्रवचनात सांगितलेले नाही.
मग हे कसे करायचे हे कसे कळेल? माझा असा विश्वास आहे की ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनाची घोषणा केवळ आपल्या हृदयात या जीवनाची इच्छा निर्माण करण्यासाठी केली होती आणि जर एखाद्या व्यक्तीला या जीवनाची तळमळ असेल तर तो देवाकडे जाईल आणि म्हणेल, "प्रभु, यावर उपाय काय आहे?" आणि प्रभु म्हणेल, "तुम्हाला पवित्र आत्म्याने भरले गेले पाहिजे. तुम्हाला आतील मनुष्यात बळकटी आणली पाहिजे."
महान प्रेषित पौल नियमशास्त्रानुसार खूप सरळ मनुष्य होता, परंतु तो पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय आणि नंतर देवाच्या आत्म्याने त्याला मुक्त केल्याशिवाय तो देखील या इच्छेवर मात करू शकला नाही. हे येशूने आंधळ्याचे डोळे उघडल्यासारखे आहे: आंधळा माणूस स्वतःहून डोळे उघडू शकत नव्हता.
हे केवळ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेच शक्य आहे. खरं तर, जर आपण पवित्र आत्म्याने भरलेले असू तरच आपण डोंगरावरील प्रवचनात येशूने सांगितलेल्या सर्व गोष्टींनुसार जगू शकतो.
मी आज "आत्म्याच्या परिपूर्णते" या नावाखाली चालत असलेल्या बनावट गोष्टींबद्दल बोलत नाही आहे . जर तुम्ही आत्म्याची परिपूर्णता अनुभवल्याचा दावा करत असाल आणी त्यामुळे तुम्ही थरथर कापत असाल, जमिनीवर लोळत असाल, हसत असाल आणि अन्य भाषांमध्ये बोलत असाल, परंतु जर तुम्ही राग आणि लैंगिक वासना यासारख्या पापांनी पराभूत झाला असाल, तर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही आहात. कोणीही तुम्हाला फसवू देऊ नका. बरेच लोक फसवले जातात. पवित्र आत्मा आपल्याला एक नवीन भाषा देतो, केवळ अन्य भाषेत बोलण्याची क्षमताच नाही तर आपल्या मातृभाषेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता देखील देतो . रविवारी सकाळी मंडळीमध्ये अन्य भाषेत बोलणे आणि रविवारी दुपारी आपल्या पत्नीवर आपल्या मातृभाषेत ओरडणे याचा काही उपयोग नाही. ती पवित्र आत्म्याची परिपूर्णता नाही.
पवित्र आत्म्याची परिपूर्णता आपल्याला आपल्या जिभेवर नियंत्रण देते. आत्म्याचे फळ म्हणजे आत्म-नियंत्रण, आणि ते आपल्याला आपल्या जिभेवर दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस नियंत्रण देते. जर असे नसेल, तर तुम्ही देवाला पवित्र आत्म्याची खरी परिपूर्णता देण्याची विनंती करावी. आत्म्याच्या देणग्यांसाठी देवाचे आभार माना, परंतु देवाला आत्म्याच्या खऱ्या परिपूर्णतेची विनंती करा, जी केवळ पवित्र आत्म्याच्या देणग्या असण्यापलीकडे आहे. त्यावर मात करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही.
याकोब म्हणतो की प्रत्येक प्राण्याला माणसाने वश केले आहे, परंतु कोणीही माणूस जीभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही (याकोब ३:७-८). ते फक्त पवित्र आत्माच करू शकतो. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल, तर तो तुम्हाला तुमच्या जिभेवर आणि तुमच्या डोळ्यांवर नियंत्रण देईल. मानवी शरीराचे हे दोन भाग आहेत ज्यांचा उल्लेख येशूने पापाच्या संबंधात मत्तय ५:२१-३२ केलेला आहे . जिभेने पाप करणे आणि डोळ्यांनी पाप करणे. दोन्ही खूप महत्वाचे आहेत.
पवित्र आत्म्याची परिपूर्णता जर ती तुम्हाला तुमच्या जिभेवर आणि डोळ्यांवर नियंत्रण देत नसेल तर कोणत्याही कमी दर्जाच्या बनावटी परिपूर्णतेने कधीही समाधानी होऊ नका. देवासमोर जा आणि म्हणा, "प्रभु, माझ्याकडे जे आहे ते नकली आहे. मी तुझ्याशी प्रामाणिक राहू इच्छितो. मी फक्त लोकांना पटवून देत आहे की मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे पण त्याला काहीही मूल्य नाही. मी पवित्र आत्म्याच्या खऱ्या परिपूर्णतेला गमावू इच्छित नाही."
मी तरुण ख्रिस्ती असताना, या दोन्ही क्षेत्रात माझा पराभव झाला. मी पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेचा शोध घेत असताना, लोकांनी मला वेगवेगळ्या संमेलनांमध्ये पाठवले, परंतु मी तिथे जे पाहिले त्यामुळे मी खूप निराश झालो. मी खूप आवाज ऐकला आणि मी म्हणालो, "प्रभु, मी जे शोधत आहे ते हे नाही. मी पापावर मात करण्यासाठी शक्ती शोधत आहे. जरी दहा वर्षे लागली तरी चालेल पण मला खरी गोष्ट हवी आहे. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्र, याकोब आणि योहान यांना जे मिळाले ते मला हवे आहे, आज जगभरात चाललेले कमी दर्जाचे व बनावटी नाही."
सैतान लोकांना काही बनावटी गोष्टीने समाधानी करू इच्छितो. जर तुम्ही सोने, हिरे किंवा अगदी चलनी नोटा खरेदी करणार असाल, तर तुम्हाला बनावटी (नकली) नोटा मिळणार नाहीत याची तुम्ही किती काळजी घ्याल. जर तुम्हाला माहिती असेल की आजूबाजूला बऱ्याच बनावटी (नकली) नोटा आल्या आहेत, तर तुम्ही एखाद्याकडून पाचशे रुपयांची नोट घेताना किती लक्ष द्याल. आपल्या सार्वकालिक भविश्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दल - पवित्र आत्म्याची खरी परिपूर्णता, याबद्दल आपण किती काळजी घेतली पाहिजे !
बनावटीने समाधानी होऊ नका. जर तुम्ही नकली सोने, हिरे आणि चलनी नोटांनी समाधानी नसाल, तर आत्म्याच्या परिपूर्णतेच्या क्षेत्रातील बनावटीने तुम्ही किती जास्त प्रमाणात असमाधानी असले पाहिजे . ही एक परीक्षा आहे: देवाच्या आत्म्याने तुम्हाला पाप आणि मृत्यूच्या नियमापासून मुक्त केले आहे का (रोमकरास पत्र ८:२ )? हीच परीक्षा आहे.