“सैतानाच्या डावपेचांपूढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा.” इफिसकरांस पत्र ६:११
आपल्यापैकी अनेकांनी हे वचन ऐकले आहे आणि “तारणाचे शिरस्त्राण” व “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” यांविषयी वाचले आहे. परंतु तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की, हे शस्त्र धारण करणारी पहिली व्यक्ती खुद्द येशूच होता.
“कोणीही कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला; तेव्हा त्याच्या स्वतःच्याच बाहूने त्याला साहाय्य केले ... त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले, आणि आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले.” यशया ५९:१६-१७.
हे येशूविषयीचे जुन्या करारातील एक भविष्यकथन आहे, ज्याचा संदर्भ पौलाने इफिसकरांस पत्र ६ मध्ये दिला आहे.
परंतु यात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, हे वचन असे दर्शवते की, आपल्यासाठी मध्यस्थी करण्याकरिता येशू देवाची शस्त्रसामग्री धारण करत आहे. आणि आता, मध्यस्थी करण्याच्या त्याच्या या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी तो आपल्याला आवाहन करत आहे.
दैनंदिन जीवनातील शस्त्र–वाहक
जुन्या करारातील शास्त्रवचनांमध्ये आणि प्राचीन काळी, एका योद्ध्यासोबत नेहेमीच एक ‘शस्त्रागार – वाहक’ असे - एक शांत, निनावी मदतनीस; जो शस्त्र वाहून नेई, संकटाच्या वेळी योद्ध्याच्या अगदी जवळ राही, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो योद्धा युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची खात्री करी. ते चित्र आपल्या जीवनाच्या त्या उद्देशाशी अगदी चपखल जुळते, ज्यानुसार आपण आपल्या जोडीदाराच्या, मुलांच्या आणि मंडळीच्या वतीने मध्यस्थी करणारे बनतो. हे करताना आपण येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुसरण करतो; येशू आपल्यासाठी सतत मध्यस्थी करत असल्यामुळे, तो आपल्यासाठी एक 'शस्त्रागार-वाहक' बनून राहिला आहे (इब्री लोकांस पत्र ७:२५).
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अशा प्रकारचे संघर्ष पाहायला मिळतात :
· एखादा जोडीदार जो नैराश्य, आत्म-करुणा, चिंता किंवा कामाच्या/आर्थिक परिस्थितीच्या अडचणींच्या ओझ्या खाली दडपला गेला आहे.
· एखादे मूल जे असुरक्षितता, एखादे गुप्त पाप किंवा शाळेतील एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीशी झगडत आहे.
· एखादा भाऊ किंवा बहीण जे पापाने पराभूत झाले आहेत, किंवा कधीकधी एखादे पाप जे त्यांच्यासाठी विषासमान आहे त्याची त्यांना जाणीवही नसते.
यावर आपली प्रतिक्रिया दूरवरून टीका करणाऱ्याची नसावी, तर आपण असे 'शस्त्रागार-वाहक' बनले पाहिजे ज्यांनी म्हणावे: "तुझे युद्ध हे माझे युद्ध आहे. तुझी दुर्बलता ही माझी दुर्बलता आहे. ज्याप्रमाणे येशू माझ्या पाठीशी उभा राहिला, त्याचप्रमाणे मीही तुझ्या पाठीशी उभा राहीन."
मध्यस्थी करणाऱ्या प्रेमाचे पहिले लक्षण: मी १००% तुझ्या सोबत असेन.
१ शमुवेल १४ मध्ये, योनाथान केवळ आपल्या 'शस्त्रागार-वाहकाला' सोबत घेऊन पलिष्ट्यांच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी जातो. विश्वासाचे एक धाडसी कृत्य करत तो दोन तीक्ष्ण सुळक्यानमधून वर चढतो आणि म्हणतो: "कदाचित परमेश्वर आपल्यासाठी काहीतरी करेल; कारण परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही " (१ शमुवेल १४:६). त्यावर त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला खरोखरच एक आश्चर्यकारक उत्तर दिले: "तुला जे सर्वोत्तम वाटते ते तू कर; तू कोणताही निर्णय घेतलास तरीही, मी पूर्णपणे तुझ्या सोबत आहे" (१ शमुवेल १४:७ NLT).
· पत्नींनो: जेव्हा तुमचे पती एखाद्या आत्मिक युद्धात असतात, तेव्हा तुमची प्रतिक्रिया "मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे" अशी असते का? की तुम्ही त्यांच्या मनात शंका आणि भीती निर्माण करता?
· पतींनो: जेव्हा तुमची पत्नी एखाद्या संघर्षातून जात असते, तेव्हा तुम्ही केवळ टीका करत दूर राहता का? की तिची दुर्बलता ही जणू तुमचीच दुर्बलता आहे असे मानून तुम्ही तिच्या मदतीला धावून जाता?
· बंधू-भगिनींनो: जेव्हा तुमचे नेतृत्व करणारे एखाद्या कठीण परीक्षेतून जात असतात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून काही कठीण निर्णय घेत असतात, तेव्हा तुम्ही 'शस्त्रागार-वाहका' प्रमाणे त्यांना आधार देता का? की केवळ टीकाकार बनून दूर उभे राहता?
येशू आपल्याला 'आरोप करण्याच्या वृत्ती'पासून सावध करतो: आपण आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ पाहतो, पण आपल्या स्वतःच्या डोळ्यात मात्र न्यायाचे/टीकेचे मोठे मुसळ असते .परंतु ही कथा केवळ आपल्या डोळ्यातील ते 'आरोपाचे मुसळ' काढून टाकण्याने संपत नाही. तर, आपल्या स्वतःच्या मनातील आरोप करण्याची वृत्ती पूर्णपणे काढून टाकल्यानंतरच, आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्याने या कथेचा खऱ्या अर्थाने शेवट होतो. हे केवळ तेव्हाच घडू शकते, जेव्हा आपण अशा एका अवस्थेत पोहोचतो जिथे आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ आपल्याला स्वतःच्याच डोळ्यात असल्यासारखे वाटते. "चला, आपण सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकू आणि येशूकडे पाहत एकत्र धावूया" (इब्री १२:१). तुमचा भार आता केवळ तुमचा एकट्याचा राहिला नाही; तो आता 'आपला' भार आहे.
याकोब ५:२० म्हणते की,"जो कोणी एखाद्या पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गापासून फिरवितो, तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व पापांची रास झाकील." अशा प्रकारेच प्रेम पापांची रास झाकून टाकते (१ पेत्र ४:८). प्रेम पापाकडे दुर्लक्ष करत नाही; तर ते पश्चात्ताप आणि पुनर्स्थापनेसाठी लढा देते.
यहूदा २२-२३ म्हणते," जे कित्येक जण संशयांत आहेत, त्यांच्यावर दया करा; त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा ... आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा, आणि देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेश्य माना ." मध्यस्थी करणारे प्रेम हे पापाने विटाळले जाण्याबाबत सावध असते; तरीही ते दयेने भरलेले असते आणि आपल्या प्रिय व्यक्तीला, गिळून टाकणाऱ्या त्या पापातून बाहेर काढण्यासाठी ते अथक प्रयत्न करत असते.
मध्यस्थी करणाऱ्या प्रेमाचे दुसरे लक्षण: मी कमी बोलेन आणि अधिक प्रार्थना करेन.
शास्त्रवचनांमध्ये एका प्रकारच्या "मौन सुवार्ताप्रसाराचे" कौतुक केले गेले आहे.१ पेत्र ३:१-२ म्हणते, "त्याचप्रमाणे, स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतींच्या अधीन असा ; ह्यासाठी की, जरी त्यांच्यापैकी कोणी वचनाचे उल्लंघन करत असतील, तरीही तुमचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून, ते तुमच्या एकाही शब्दाशिवाय—केवळ तुमच्या वर्तनाद्वारे - जिंकले जातील." तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही एकही शब्द न उच्चारता एखाद्याचा आत्मा जिंकू शकता?
जेव्हा शास्त्रवचन "त्याचप्रमाणे" असे म्हणते, तेव्हा ज्या उदाहरणाचे अनुकरण अपेक्षित आहे , ते काही वचने आधी १ पेत्र २:२३ मध्ये दिले आहे. तिथे येशूविषयी असे म्हटले आहे: "त्याची निंदा होत असतां त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असतां त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले."
याचा अर्थ असा की, हा आदर्श केवळ पत्नींसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठी आहे; कारण येथे उदाहरण म्हणून येशूचे नाव दिले आहे. मध्यस्थी करणाऱ्या प्रेमाचा अर्थ अनेकदा असा असतों की - लोकांशी कमी बोलणे आणि देवाशी अधिक बोलणे.
देवाने दिलेल्या शस्त्रास्त्रांचे वर्णन केल्यानंतर लगेचच पौल काय म्हणतो, हे पाहणे चित्तवेधक ठरते; कारण त्यातूनच आपल्याला या शस्त्रास्त्रांच्या व्यापक उद्देशाविषयीचा एक संकेत मिळतो. अगदी त्यानंतरच... देवाच्या शस्त्र सामग्रीच्या वचनांनंतर लगेचच, पौल इफिसकरांस पत्र ६:१८ मध्ये म्हणतो: सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा; आणि या कामी , पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा .” देवाचे चिलखत परिधान करणे म्हणजे केवळ स्वतःच्या बचावासाठी उभे राहणे नव्हे, तर लढाईच्या प्रसंगी इतरांसाठी—सुरुवात स्वतःच्या घरातून करून, आणि त्यानंतर आपल्या मंडळी व समाजापर्यंत - प्रार्थना करणे होय; हा विचार खरोखरच क्रांतीकारी आहे.
त्याचप्रमाणे, यशया संदेष्टा आपल्याला अशा प्रकारच्या मध्यस्थीच्या लढाईचे एक सुंदर चित्र सादर करतो.
यशया ६२:१: “सियोनेची धार्मिकता उदयप्रभेप्रमाणे फाके तोवर तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, आणि यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसे तोवर तिच्याकरीता मला चैन पडणार नाही.”
त्या वचनातील “सियोन” आणि “यरुशलेम” या शब्दांच्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव, भावाचे नाव किंवा मुलाचे नाव घालून वाचा: “माझ्या पत्नीच्या प्रीत्यर्थ मी गप्प बसणार नाही... माझ्या मुलाच्या प्रीत्यर्थ... माझ्या भावाच्या प्रीत्यर्थ.”
हीच ती ‘मध्यस्थीची सेवा’ होय—जी अविरत असते, अनेकदा कोणाच्याही नजरेत येत नाही, तरीही देवाला अत्यंत मौल्यवान वाटते. शमुवेलला याची इतकी सखोल जाणीव होती की तो म्हणाला: “तुमच्यासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो ” (१ शमुवेल १२:२३). त्याच्या दृष्टीने, मध्यस्थी करणे थांबवणे म्हणजे देवाच्या विरोधात पाप करणे होय. शौल जेव्हा भरकटला आणि त्याने देवाचा अभिषेक गमावला, तेव्हाही शमुवेलाने त्याच्यासाठी शोक करणे कधीच थांबवले नाही—अगदी त्यानंतर तो पुन्हा शौलाला कधीच भेटला नाही तरीही (१शमुवेल१५:३५).
मध्यस्थी करणाऱ्या प्रेमाचा अर्थ असा असू शकतो की, एखादे नाते कठीण किंवा दुरावले गेले असले तरीही त्या नात्यासाठी दीर्घकाळापर्यंत प्रार्थना करणे चालू ठेवणे.
मध्यस्थी करणाऱ्या प्रेमाचे तिसरे लक्षण : मी तुमच्यासाठी देवाचे नीतिमत्त्व घोषित करेन.
जखऱ्या ३ मध्ये, महायाजक यहोशवा हा परमेश्वराच्या दूतासमोर मळकट वस्त्रे परिधान करून उभा होता; आणि तिथे सैतानही “त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी” उपस्थित होता . त्यावर परमेश्वर जखऱ्या ३:२ मध्ये उत्तर देतो: “ अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; होय, यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो ! हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय?”
त्यानंतर देव आज्ञा करतो: “त्याच्या वरची मलीन वस्त्रे काढा.” यहोशवाला तो म्हणतो, "पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला ऊंची पोशाख घालीत आहे." त्यानंतर जखऱ्या ५ व्या वचनात पुढे म्हणतो, "त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा ."
हाच त्या उधळ्या पुत्राविषयी पित्याच्या अंतःकरणाचा भाव आहे: पश्चात्तापाची पहिली खूण दिसताच, तो धावत जातो, मिठी मारतो, वस्त्रे परिधान करवतो, पूर्ववत करतो आणि आनंद व्यक्त करतो. प्रामाणिक पश्चात्तापाची पहिली खूण दिसताच, आपला प्रतिसाद (त्या कथेतील थोरल्या भावाच्या अगदी उलट) त्या आनंदाचा, उत्सवाचा आणि निर्दोष ठरवण्याच्या कृती सारखाच असला पाहिजे. असे नव्हे की, "ठीक आहे, ही फक्त सुरुवात आहे; तू खरोखरच या बाबतीत गंभीर आहेस की नाही, ते आम्ही पुढे पाहू." तर त्याऐवजी असे असले पाहिजे: "जेव्हा तू पश्चात्ताप केलास, तेव्हा प्रभूने तुझा अधर्म दूर केला आहे आणि तुला नीतिमान घोषित केले आहे. तुझ्याविषयी त्याने दिलेल्या या निर्णयाचा मी आनंदाने स्वीकार करतो आणि त्याचा उत्सव साजरा करतो."
आपल्या घरांसाठी आणि आपल्या मंडळीसाठी एक आवाहन
अशा परिवारांची कल्पना करा, जिथे पती आणि पत्नी एकमेकांसाठी 'शस्त्रागार वाहणारे' असतात; जिथे पालक एकमेकांवर दोषारोप न करता त्याऐवजी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात; अशा मंडळीची कल्पना करा, जिथे भाऊ आणि बहिणी शांतपणे एकमेकांच्या पवित्रतेसाठी लढा देतात. अशा कुटुंबांची आणि मंडळ्यांची कल्पना करा, जिथे:
· आपण एकमेकांच्या संघर्षाना स्वतःचेच संघर्ष मानून त्यांचा भार उचलतो.
· आपण कमी बोलतो आणि अधिक प्रार्थना करतो.
· पश्चात्तापाची पहिली खूण दिसताच, आपण एकमेकांवर देवाचे 'नीतिमत्त्वाचे वचन' घोषित करण्यासाठी तत्परतेने धाव घेतो.
प्रभूने आपल्या वैवाहिक जीवनात, आपल्या कुटुंबांमध्ये आणि आपल्या मंडळीमध्ये - आपल्याला पहारेकरी आणि शस्त्र वाहक - मध्यस्थी करणाऱ्या प्रेमाचे वाहक म्हणून - उभे करावे, हीच प्रार्थना.