जेव्हा एखाद्या विश्वासणारा नवीन सत्याने जखडला जातो , तेव्हा तो त्याबाबतीत इतक्या सहजपणे टोकाला जाऊ शकतो की पहिल्या सत्याचे संतुलन साधण्यासाठी असलेल्या इतर सत्यांकडे दुर्लक्ष केले जाते. हे खरे आहे, विशेषतः खऱ्या ख्रिस्ती विश्वासच्या बाबतीत.
जुन्या करारात, विश्वास महत्त्वाचा नव्हता. फक्त क्रिया महत्त्वाची होती. मोशेच्या नियमशास्त्रात देवावर विश्वास ठेवण्याबद्दल काहीही सांगितले नाही. परंतु त्याने ६१३ आज्ञा दिल्या - कामांची एक मोठी यादी, जी माणसाला जर देवाला संतुष्ट करायचे असेल तर त्यानी ती पाळावी .
पण जेव्हा आपण नवीन कराराकडे येतो तेव्हा आपण वाचतो, "कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे; आणि ते तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणीही आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही "(इफिसकरास पत्र.२:८,९). हे वचन वाचून, बरेच विश्वासणारे अतिरेकीपणाकडे झुकतात आणि म्हणतात की, म्हणून कर्म अजिबात महत्त्वाचे नाहीत - कारण (जसे हे वचन म्हणते), कर्मांमुळे एखादी व्यक्ती तो काय करू शकतो याबद्दल बढाई मारु शकतो .
पण नवीन करार खरोखर काय शिकवतो ? तुम्हाला संपूर्ण सत्य पवित्र शास्त्राच्या फक्त एका वचनात सापडणार नाही. जेव्हा सैतानाने अरण्यात येशूला एक वचन उद्धृत केले आणि म्हटले, "असे लिहिले आहे......" (मत्तय ४:६)", येशू म्हणाला, " असे देखील लिहिले आहे की ...". म्हणून आपण पाहतो की जर आपल्याला संपूर्ण सत्य अचूकपणे समजून घ्यायचे असेल तर पवित्र शास्त्रातील एक वचन बहुतेकदा एखाद्या दुसऱ्या वचनानी (किंवा वचनांनी) संतुलित केले गेलेले पाहिजे. जर सैतानाने पवित्र शास्त्रातील एका वचनाने प्रभु येशूलाही फसवण्याचा प्रयत्न केला, तर तो आज पवित्र शास्त्रातील फक्त एका वचनाने विश्वासणाऱ्यांना किती फसवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. पक्ष्यांप्रमाणे, सत्यालाही दोन पंख असतात - आणि जर तुम्हाला सरळ उडायचे असेल तर तुम्ही दोन्हीचा वापर केला पाहिजे. फक्त एका पंखाने, तुम्ही एकतर पूर्णपणे भरकटले जाल, किंवा एकाच जागी गोल गोल फिराल आणि कधीही प्रगती करू शकणार नाही!
इफिसकरास पत्र २ मध्ये आपण हे संतुलन पाहतो, जिथे ते एका बाजूला म्हणते: " कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे ; आणि ते तुमच्याकडून नाही, तर ते देवाचे दान आहे; कोणीही आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही ”. पण कोणीही आढ्यता बाळगू नये हे भरकटले जाते, (फक्त त्या “एका पंखावर उडत”), लगेचच, पुढचे वचन असे म्हणते की: “आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत, ती सत्कृत्ये आचरीत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.” (इफिसकारास पत्र २:८-१०). म्हणून : आपण वाचलो आहोत - चांगल्या कामांमुळे नाही - तर ती सत्कृत्ये जी देवाने पूर्वीच योजून ठेवली आहेत ती आचरीत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून.
फिलिप्पैकरास पत्र २:१२, १३ मध्ये आपल्याला समान संतुलन दिसते. तेथे आपल्याला "भीतीने आणि थरथर कापत तुमचे स्वतःचे तारण साध्य करा" असे आवाहन केले आहे. परंतु पुढे ते म्हणते की, " इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सतसंकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे." देव आपल्यामध्ये प्रथम काय कार्य करतो हे आपण शोधले पाहिजे.
याकोबाचे पत्र २: १७, १८ मध्ये असे म्हटले आहे की, “जर विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे”. आणि मग याकोब पुढे म्हणतो की, “कोणी म्हणेल की, ‘तुमच्याठायी विश्वास आहे आणि माझ्याकडे क्रिया आहेत’. पण याकोब (पवित्र आत्म्याने प्रेरित) म्हणतो, “ मला क्रियावाचून तू आपला विश्वास दाखीव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन”. म्हणून जो विश्वास “विश्वासाची कामे” निर्माण करत नाही तो मृत विश्वास आहे. मृत विश्वास आणि जिवंत विश्वास यांच्यात हाच फरक आहे.
खरा ख्रिस्ती विश्वास नेहमीच विश्वासाची कामे निर्माण करेल - म्हणजेच पवित्र आत्म्यावर अवलंबून राहून केलेली कामे. कारण तोच खरा विश्वास आहे: पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणे , जसे फांदी फळ देण्यासाठी झाडावर अवलंबून असते. म्हणून, जर आपल्याकडे खरोखरच नवीन करारात आढळणारे सत्याचे संतुलन असेल, तर- आपल्या घरातील नातेसंबंधांमध्ये आणि आपल्या कामाच्या ठिकाणी देखील - ख्रिस्तासारखे जीवन जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, विश्वासाने निर्माण होते ,आपल्या जीवनात दिसून येईल (म्हणजेच, त्याच्यावर अवलंबून राहून).
क्रियेशिवाय विश्वास हा एक मृत बौद्धिक विश्वास आहे - आणि तो एखाद्या व्यक्तीच्या हृदयात पवित्र आत्म्याने निर्माण केलेला खरा विश्वास नाही. खरा ख्रिस्ती विश्वास म्हणजे देवावर पूर्ण अवलंबून राहणे, जो नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ख्रिस्तासारखे जीवन जगण्यात वाढण्याचे फळ देतो. दुसरीकडे, विश्वासाशिवाय क्रिया म्हणजे एक माणूस स्वतःच्या मानवी प्रयत्नांनी देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे स्व-धार्मिकता येते - ज्याला शास्त्र "घाणेरडया चिंध्या" असे म्हणते. ("आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत"- यशया ६४:६).
मी या लेखात जे सांगितले आहे ते एक अतिशय महत्त्वाचे सत्य आहे - कारण आपले शाश्वत भवितव्य त्यावर अवलंबून आहे - आणि म्हणून आपण या बाबतीत चूक करू शकत नाही. म्हणून सैतानाला तुम्हाला खोट्या "श्रद्धेने" फसवू देऊ नका, जो केवळ एक बौद्धिक विश्वास आहे जो आपल्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन निर्माण करत नाही.
ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत, त्याने ऐकावे. आमेन.