लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

पौलाचे काही जवळचे सहकारी जसा तीत, हे यहुदी नव्हते. पौल स्वतः अतिशय कट्टर यहुदी होता, परूशांचा परूशी होता. पण त्याच्या सततच्या प्रवासातला सोबती लूक नावाचा एक ग्रीक डॉक्टर होता. त्याने लूकाचे शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये लिहिली. त्याने ज्या दुस-या व्यक्तीबरोबर इतक्या जवळून काम केले तो म्हणजे तीमथ्य. तो अर्धा ग्रीक होता, त्याचे वडील ग्रीक होते. तीतही ग्रीक होता. त्यामुळे, वेगवेगळ्या समुदायांतील हे चार लोक एकत्र काम करत होते- पौल, तीत, तीमथ्य आणि लूक हे नव्या कराराच्या शुभवर्तमानाचे जिवंत प्रात्यक्षिक होते जेथे वेगवेगळ्या राष्ट्रांचे लोक एक म्हणून काम करू शकत होते.

जर तुम्ही तुमच्या स्वत:च्या संस्कृतीच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांबरोबरच काम करू शकत असाल तर तुमच्या ख्रिस्तीपणात काहीतरी गडबड आहे. जर तुम्ही मल्याळी असाल आणि तुम्ही फक्त मल्याळी लोकांबरोबरच काम करू शकता तर तुम्हांला शुभवर्तमान समजलेले नाही. या शुभवर्तमानामुळेच पौल वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या आणि वेगवेगळ्या राष्ट्रांतील लोकांबरोबर काम करू शकला. आपण कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या किंवा स्वभावाच्या लोकांबरोबर काम करण्यास तयार असले पाहिजे जर ते येशूचे शिष्य असतील , मग ते चिनी, आफ्रिकन, रशियन, दक्षिण अमेरिकन असोत किंवा उत्तर अमेरिकन असोत, मग ते अंतर्मुख असोत किंवा बहिर्मुख असोत. स्वभाव आणि राष्ट्रीयत्व हे सर्व वेगळे असू शकते आणि तरीही ते जवळचे सहकारी असू शकतात.ज्यामुळे आपल्याला केवळ आपले राष्ट्रीयत्व आणि आपल्या स्वभावाच्या लोकांबरोबर काम करण्यास बरे वाटते अशा सांप्रदायिक,जातीय, संकुचित विचारसरणीतून आपण बाहेर पडले पाहिजे आणि ख्रिस्ताच्या शरीरात असलेल्या सर्वांबरोबर काम करायला शिकले पाहिजे.

काही विशिष्ट राष्ट्रांतील आणि समाजातील लोकांची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. पण जेव्हा ते ख्रिस्ताकडे येतात तेव्हा त्यांपासून त्यांची सुटका होऊ शकते. पौलाने तीताला सांगितले की, तीत होता तेव्हा क्रेताच्या एका धार्मिक प्रचारकाने म्हटले होते, "क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात" (तीत१:१२). ते खरे असावे. पण जेव्हा असा क्रेतीय ख्रिस्ताकडे येतो आणि पवित्र आत्म्याने भरला जातो तेव्हा तो लबाड किंवा दुष्ट असणार नाही, तो पशुसारखा वागणार नाही, तो आळशी असणार नाही आणि तो खादाड असणार नाही. त्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा त्याच्या राष्ट्रीयत्वानुसार किंवा समाजानुसार कधीही न्याय करू नये. आपण कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीबद्दल त्याच्या समाजामुळे पूर्वग्रहदूषित असलो तर आपण आध्यात्मिकरित्या गरीब राहू.

देवाने मला विविध राष्ट्रांतील आणि समाजातील लोकांच्या सहभागितेमधून आध्यात्मिकरित्या अफाट श्रीमंत केले आहे -चिनी, आफ्रिकन, वेगवेगळ्या जातीचे भारतीय, युरोपीय, अमेरिकन इत्यादी. माझे हृदय सर्व समाजातील आणि राष्ट्रांतील देवाच्या लोकांसाठी नेहमीच खुले राहिले आहे- कारण कोणत्याही विशिष्ट राष्ट्रातच देवभीरूपणा आढळतो असे नाही हे मला माहीत आहे. माझ्या लक्षात आले आहे की काही श्रीमंत देशांतील लोक अतिशय उद्धट आहेत. पण त्या देशांतील खरे विश्वासू नम्र आहेत. त्यामुळे क्रेतीय लबाड असतील, पण क्रेतामधील ख्रिस्ती लबाड नाहीत. काही समाजातील लोकांची कौटुंबिक मूल्ये अतिशय हलकी आहेत. पण त्या समाजातील ख्रिस्ती इतरांसारखे असतील असे नाही. त्यामुळे एखादा ख्रिस्ती ज्या समाजातून येतो त्यावरून आपण त्याचा कधीही न्याय करू नये. तो एक नवीन उत्पत्ति आहे. म्हणूनच पौलाला आपले काही जवळचे सहकारी इतर राष्ट्रांतील असण्यात काहीच अडचण नव्हती.

जर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरात तुमच्यापेक्षा वेगळ्या लोकांबरोबर काम करण्यास तयार नसाल तर तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाचा संपूर्ण उद्देश पूर्ण करू शकणार नाही. मग देव तुम्हांला दाखवणार नाही की तुमचे सहकारी कोण असावेत - कारण त्याच्या योजनेत तुम्ही दुस-या राष्ट्रीयत्वाच्या किंवा भारताच्या दुस-या भागातून काम करावे अशी त्याची इच्छा असेल आणि तुम्ही त्याची योजना स्वीकारण्यास तयार नाही असे त्याला वाटते.

आपल्यात असे अनेक चुकीचे दृष्टिकोन आहेत जे ख्रिस्ताच्या शरीरातील इतरांसोबत काम करण्याआधी, कोणत्याही प्रकारचा भेद न करता काढून टाकण्याची गरज आहे. जर आपण आपल्याच प्रकारच्या लोकांबरोबर काम करण्यास प्राधान्य दिले तर देव आपल्याला मार्गदर्शन करणार नाही. आपण स्वतः आपल्या सहकाऱ्यांची निवड करू आणि म्हणू की प्रभूने आम्हांला त्यांच्याकडे नेले- पण ते खरे ठरणार नाही. असे होवू शकते की आपण आपल्या दैहिक प्राधान्याने तिकडे गेलो असू . आम्ही त्यांची निवड केली कारण ते आपल्याच बौद्धिक पातळीवरचे होते किंवा आपल्याच समाजाचे होते किंवा आपल्यासारख्याच स्वभावाचे होते. अशा प्रकारचा मिलाप लग्नासाठी ठीक आहे. पण देवासाठी काम करताना देव ज्यांना आपले सहकारी म्हणून निवडतो अशा कोणासाठीही आपण खुल्या मनाचे असले पाहिजे.