लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

मंडळी म्हणून आपल्या सेवाकार्याला विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण पवित्रता आणि नीतिमत्वाचा उपदेश दिला आहे. आपण हे सत्य घोषित केले आहे की "यापुढे आपल्यावर पापाची सत्ता असण्याची काही गरज नाही" (रोम ६:१४), आणि "जे लोक पैशावर प्रेम करतात ते देवावर प्रेम करू शकत नाहीत" (लूक १६:१३), आणि "जे इतरांवर रागावतात आणि इतरांना तुच्छ लेखतात ते नरकात जाण्याइतपत दोषी आहेत" (मत्तय ५:२२), आणि "जे आपल्या डोळ्यांनी स्त्रियांकडे कामेच्छेने पाहतात तेही नरकात नष्ट होण्याच्या धोक्यात आहेत" (मत्तय ५:२८,२९), इत्यादी. येशूचे हे शब्द बहुसंख्य विश्वासणाऱ्या लोकांना रुचत नसल्याने त्यांनी आपल्याला विरोध केला आहे.

आपण ख्रिस्ती कामकर्‍यांना वेतन देण्याची प्रणाली जी शास्त्राविरुद्ध आहे (ज्याबद्दल पहिल्या शतकात कोणीही ऐकले नव्हते) तिचाही विरोध केला आहे आणि शास्त्राविरुद्ध पैशाची भीक मागून ख्रिस्ती सेवाकार्याचे तेच वैशिष्ट्य ठरवणार्‍यांच्याही विरोधात आपण उभे राहिलो आहोत. यामुळे आपल्या प्रचारातून उदरनिर्वाह करणाऱ्यांचा आणि त्याद्वारे आपली खाजगी साम्राज्ये बांधणाऱ्यांचा रोष आपण ओढवून घेतला आहे. मंडळीमधील व्यक्तिनिष्ठ-पंथ, पोपचे शिक्षण, संप्रदायवाद, मंडळ्यामध्ये पाश्चिमात्यांचे वर्चस्व, आणि हानिकारक असे पाश्चिमात्य नेतृत्वावर अवलंबून राहणे जे मंडळीच्या विकासात अडथळा आणते अशा गोष्टींच्या विरोधातही आपण उभे राहिलो आहोत. यामुळे पंथवादी गट संतप्त झाले आहेत.

सैतानाचे ध्येय देवाचे पवित्र ठिकाण कोणत्या ना कोणत्या मार्गाने भ्रष्ट करणे हे आहे. देवाचे कार्य आतून नष्ट करण्यासाठी तो आपले "सैन्य" (दानिएल ११:३१) मंडळीमध्ये ठेवतो. ख्रिस्ती धर्मजगताच्या इतिहासावरून हे दिसून येते की, या सर्व २० शतकांमधून त्याच्या सैन्याने कसे गटानंतर गट व चळवळीनंतर चळवळ भ्रष्ट करण्यात यश मिळवले आहे.

मंडळीच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे देवाने मंडळीमध्ये नेमलेले पहारेकरी सावध आणि जागरूक राहिले नाहीत. या पहारेकऱ्यांना झोपवण्यात सैतानाला यश कसे आले? काही बाबतीत, त्यांना सत्य बोलण्यास भीती घालून की त्यामुळे काही लोक - विशेषत: श्रीमंत आणि प्रभावशाली लोक नाखुश होतील. इतर काही बाबतीत, त्यांना पत्नीला खुश ठेवणारे बनवून, आणि पैशाचे आणि चांगल्या जेवणाचे लोभी बनवून. काही बाबतीत, मंडळीमध्ये देवाचे मापदंड टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करता करता , पहारेकरी स्वत:च त्यांच्या संदेशाला होत असलेल्या सततच्या विरोधाला सहन करून करून कंटाळले. आणि म्हणून त्यांनी लोकांना खूश करण्यासाठी देवाचे मापदंड कमी करून त्यांच्या संदेशात बदल केले.

इब्री लोकांस पत्र १२:३ मध्ये आपल्याला येशूबद्दल विचार करण्यास सांगितले आहे की, "ज्याने स्वतः पापी लोकांचा इतका विरोध सहन केला, म्हणून यामुळे आपण थकू नये आणि खचू नये". येशूला विरोध करणारे हे पापी लोक कोण होते? ते कसबिणी किंवा खुनी किंवा इस्रायलातील लुटारू नव्हते. तसेच ते रोमी किंवा हेल्लेणीही नव्हते. नाही. येशूला सतत विरोध करणारे पापी लोक म्हणजे इस्रायलातील पवित्र शास्त्राचा अतिउत्साहाने प्रचार करणारे व धार्मिक पुढारी होते. त्यांना येशूचा हेवा वाटे व शेवटी त्यांनी त्याला ठार मारले.

येशूचे अनुसरण केले तर आजही आपल्याला त्याच लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. देवाचे मापदंड कमी करून मंडळी भ्रष्ट करणाऱ्या प्रचारकांकडूनच आपल्याला सर्वात मोठा विरोध होईल. आम्हाला विरोध करण्यासाठी हे सैतानाचे मुख्य प्रतिनिधी असतील. या सततच्या विरोधाला तोंड देत देत आपले थकून जाणे व निराश होणे साहजिकच आपल्यासाठी खूप सोपे आहे.

सैतान "छळाद्वारे देवाच्या पवित्र जनांस थकवून टाकण्याचा" प्रयत्न करतो (दानीएल ७:२५). यावर विजयी होण्याचा एकच मार्ग म्हणजे येशूच्या उदाहरणाकडे पाहणे ज्याला सतत विरोधाचा सामना करावा लागला, तोपर्यंत जोपर्यंत त्याच्या शत्रूंनी त्याला ठार मारले नाही. आपणही "मरेपर्यंत विश्वासू" असण्यास तयार असले पाहिजे (प्रकटीकरण २:१०). कोणताही उपदेशक जो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विरोधाला सामोरे जाण्यास तयार नसेल, त्याचा शेवट कानाची खाज जिरवणारा उपदेशक म्हणूनच होईल, जो "लोकांना त्याच्या बाजूने जिंकण्यासाठी खुशामत करतो " (दानीएल ११:३२), आणि तडजोड करणारा बलाम म्हणून त्याचे दिवस तो संपवेल.

मंडळी म्हणून आपले पाचारण कोणत्याही परिस्थितीत देवाचे मापदंड आपल्यामध्ये राखण्यासाठी झाले आहे. आपल्याला ख्रिस्तविरोधी शक्तींच्या विरुद्ध नेहमी सावध असले पाहिजे. पौलाने इफिसमधील मंडळीला जेथे तो तीन वर्षे राहिला होता, देवाच्या कृपेने शुद्ध राखले होते. पण जेव्हा तो निघाला तेव्हा त्याने वडिलांना सांगितले की, त्याच्या जाण्यानंतर भ्रष्टाचार नक्कीच आत शिरेल (प्रेषितांची कृत्ये २०:२९-३१). आणि असेच झाले जे आपण इफिसकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात वाचतो (प्रकटीकरण २:१-५)