लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

येशूचे जीवन हे जगाने पाहिलेले सर्वांत सुंदर, सर्वांत नियोजनबद्ध, सर्वांत शांतीपूर्ण आणि आनंदी जीवन होते. याचे कारण म्हणजे त्याने काटेकोरपणे केलेले देवाच्या वचनाचे आज्ञापालन. जिथे जिथे देवाची परिपूर्ण आज्ञाधारकता असते तिथे परिपूर्णता आणि सौंदर्य आहे- ज्याप्रमाणे ग्रह आणि ताऱ्यांमध्ये आपण पाहतो. "परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय." (नीतिसूत्रे १४:२७) आणि येशूने "सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा." (नीतिसूत्रे २३:१७) या आज्ञेचे पालन केले. येशू पृथ्वीवर चालला तेव्हा लोकांनी त्याच्यामध्ये स्वर्गाचे जीवन पाहिले. त्याची करुणा, इतरांचा विचार करण्याची वृत्ती , त्याची शुद्धता, त्याचे निःस्वार्थ प्रेम आणि त्याची नम्रता हे सर्व देवाच्या जीवनाची अभिव्यक्ती होती. देवाचे हे जीवन आणि स्वर्गाचे वातावरण आपल्या अंतःकरणात आणण्यासाठी आता पवित्र आत्मा आला आहे. हे स्वर्गीय जीवन जगाला प्रकट करण्यासाठी देवाने आपल्याला पृथ्वीवर ठेवले आहे. येत्या वर्षात तुमच्या घरात आणि तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही स्वर्गाचा आनंद, शांती, प्रेम, शुद्धता आणि चांगुलपणा यांची चव चाखावी अशी देवाची इच्छा आहे. येशू या पृथ्वीवर स्वर्गीय जीवन जगला. जर तुम्ही त्याच्यावर दृष्टी लावून त्याच्या मागे गेलात तर या वर्षाचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी पृथ्वीवरील स्वर्गासारखा असेल.

पित्यासोबत सहभागिता हा येशूचा सर्वांत मौल्यवान ठेवा होता. त्या तुलनेत त्याने विश्वातील इतर कोणत्याही गोष्टीची किंमत केली नव्हती. जेव्हा त्याला तीन तास हरवलेल्या मानवतेसाठी सार्वकालिक नरकाच्या वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा ही सहभागिता कालवरीवर मोडली जाईल हे येशूला माहीत होते. (मत्तय २७:४५, ४६). मग पित्याला त्याचा त्याग करावा लागेल आणि पित्याबरोबर मिळालेली सहभागिता तीन तास तुटेल. त्याला ती सहभागिता तुटण्याची इतकी भीती वाटत होती की गेथशेमाने बागेमध्ये त्याने रक्तासारखे घामाचे मोठे थेंब गाळले. पित्याने त्याच्यापासून काढून टाकावा अशी ज्यासाठी प्रार्थना केली तो प्याला हाच होता: त्याची पित्याबरोबरची सहभागिता तुटणे. येशूचे अनुसरण करणे म्हणजे त्याच्यासारखेच पित्यासोबतच्या सहभागितेचे मोल जाणणे. मग पाप आपल्यासाठी अत्यंत पापमय होईल कारण त्यामुळे आपली पित्यासोबतची सहभागिता मोडेल. दुस-या माणसाबद्दलची प्रीतीरहित वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, कारण त्यामुळे आपली पित्यासोबतची सहभागिता मोडेल.

पवित्र शास्त्र समजून घेण्याचे रहस्य म्हणजे सर्वप्रथम प्रभूशी घनिष्ठ नातेसंबंध असणे. देवाच्या वचनात, देवाने काय प्रेरित केले याचा अर्थ पवित्र आत्मा समजावून सांगू शकतो. त्यामुळे, आरंभीच्या शिष्यांप्रमाणे येशूबरोबर चाला आणि त्याने तुमच्याशी बोलावे अशी उत्कट इच्छा धरा. मग तुमचे डोळे त्यांच्यासारखे उघडले जातील आणि त्यांच्याप्रमाणे तुमचे हृदय पेटून उठेल. गेल्या ६१ वर्षांत मी माझ्या प्रभूबरोबर चालत असताना मला हेच समजले आहे.

आपल्या जन्मापूर्वीच देवाने आपल्या जीवनाची योजना आखली होती. दावीद म्हणतो, "तू माझा जन्म होण्यापूर्वी मला पाहिले आणि मी श्वास घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक तू केले होते. प्रत्येक दिवस तुझ्या पुस्तकात नमूद केला होता. हे देवा, तू माझा सतत विचार करतोस हे जाणणे किती मोलवान आहे. तुझे माझ्याकडे दिवसभर वळणारे विचार इतके आहेत की मी ते मोजूही शकत नाही. जेव्हा मी सकाळी जागा होतो, तेव्हाही तू माझा विचार करत असतो." (स्तोत्र १३९:१६-१८ - लिविंग बायबल भाषांतर).

यावरून आपण हे शिकतो की तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवसासाठी देवाच्या मनात एक सविस्तर योजना आहे. तुमच्या जन्माच्या लाखो वर्षांपूर्वी, तुमचे आईवडील कोण असणार आहेत आणि तुम्ही कोणत्या देशात जन्माला येणार आहात आणि कोणत्या परिस्थितीत तो तुम्हांला ख्रिस्तात आणण्याची व्यवस्था करणार आहे हे त्याने आधीच लिहिले आहे. तुम्हांला आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी तो तुम्हांला कोणत्या परिक्षांमधून नेणार आहे हेही तेथे लिहिण्यात आले आहे; आणि तुमच्या चुका आणि प्रमाद याचा उपयोग त्याच्या वैभवासाठी तो कसा करणार आहे हेही लिहिले आहे.

मंडळीमधील सर्वांत मौल्यवान भाऊ-बहीण म्हणजे जे त्या मंडळीमध्ये स्वर्गाचे वातावरण आणू शकतात आणि तेथे सहभागिता निर्माण करू शकतात. आणि अशा व्यक्तीला वडिलांपैकी एक असण्याची गरज नाही. आपल्या सर्वांना असे मौल्यवान बंधुभगिनी होण्याची संधी आहे. मंडळीमधल्या एखाद्या बांधवाचा/बहिणीचा विचार करा, ते जेव्हा जेव्हा सभेला किंवा घरात येतात, तेव्हा ते स्वर्गातून खोलीत वाहणाऱ्या शुद्ध झुळुकेसारखे असतात. असा भाऊ/बहीण किती मौल्यवान व्यक्ती आहे! तो / ती थांबून फक्त पाच मिनिटे तुम्हांला भेटायला आले तरी तुम्हांला ताजेतवाने वाटते. तुम्हांला असे वाटते की स्वर्ग पाच मिनिटे तुमच्या घरात आला!

देवाने अब्राहामाला सांगितले: "... मी तुला आशीर्वाद देईन… तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील." (उत्पत्ती १२:२,३). पवित्र आत्म्याद्वारे (गलतीकरांस पत्र ३:१४ नुसार) हा आशीर्वाद आपला वारसा आहे. या वर्षी देवाला तुम्हांला अशा प्रकारे आशीर्वाद द्यायचा आहे की तुमचा प्याला इतरांना आशीर्वादित करण्यासाठी ओसंडून वाहू लागेल. या वर्षी तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी देवाच्या अभिषेकात पुरेसे सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हांला मिळणारे आशीर्वाद इतरांच्या जीवनात ओतत राहा. पण जर तुम्ही स्वार्थीपणे स्वतःसाठी देवाचा आशीर्वाद राखून ठेवलात तर रात्रभर ठेवलेल्या मान्नाप्रमाणे त्याला दुर्गंधी पसरू लागेल. जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतः देव पाणी पाजेल. (नीतिसूत्रे ११:२५). तुमच्या आयुष्यात तसेच असू द्या.

या वर्षी तुम्हांला खूप आशीर्वादित असे वर्ष लाभो.