लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

जर आपल्याला प्रभावी आध्यात्मिक युद्ध लढायचे असेल तर आपण सैतानाच्या योजना, साधने आणि युक्त्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. वाळवंटात ज्या प्रकारे सैतानाने येशूची अन्नाद्वारे परीक्षा घेतली त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपल्या यथायोग्य दैहिक इच्छेद्वारेही सैतान आपल्याला मोहात पाडण्यास पाहील. येशूने आपल्या शिष्यांना अन्न व कपड्यांविषयीच्या फाजील काळजीपासून सावध राहायला सांगितले. जर आपल्यावर खाण्याची किंवा आकर्षक कपड्यांची पकड असेल तर सैतानाची आपल्यावर नक्कीच सत्ता आहे कारण आपले राज्य या जगाचे असेल. आपल्या मंडळीमधील तरुण मुलींना सुंदर पोशाख घालण्यासाठी आपण प्रशिक्षित करू नये यासाठी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर त्या मोठ्या होताच त्या सैतानाच्या मोहात अडकतील.

ल्युसीफर तेव्हा सैतान बनला जेव्हा तो (देवदूतांचा प्रमुख म्हणून) स्वत: ला देवदूतांपैकी महत्त्वाचा कोणीतरी समजू लागला (यहेज्केल २८: ११-१८; यशया १४: १२-१५). अशा प्रकारे सैतान अनेक विश्वासणार्यांच्या हृदयातही प्रवेश करतो. जेव्हा एखादा बंधू मंडळीमध्ये आपण महत्वाचे कोणीतरी आहोत असा विचार करण्यास सुरवात करतो, तेव्हा सैतानाच्या आत्म्याचा त्याला संसर्ग झाल्याचे स्पष्ट होते. मग तो आध्यात्मिक युद्धासाठी कुचकामी ठरेल, जरी आजूबाजूचे अविवेकी त्याच्या अहंकाराला खतपाणी घालून तो महत्वाचा असल्याची त्याची भावना तयार करतात !!

जेव्हा एखादा बंधू सभांमध्ये त्याच्या आध्यात्मिक सामग्रीच्या पलीकडे बराच वेळ बोलतो, आणि मंडळीमधील गरीब सहनशील बंधू व भगिनींवर शास्त्राचे ज्ञान ओकतो, हा स्पष्ट संकेत आहे की तो एखादी महत्त्वाची व्यक्ती आहे आणि तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे तो समजू लागला आहे. तो सैतानाचा आत्मा आहे. आणि तरीही, बर्‍याचदा आपल्याला आढळून आले आहे की अशा भावाचा नाराज होण्यासारख्या प्राथमिक गोष्टीवरदेखील विजय नसतो. सभेनंतर थोडक्यात सांगावे यासाठी प्रोत्साहन दिल्यास तो नाराज होतो. हे स्पष्ट आहे की असे बांधव सतत स्वतःचे निवाडा करणारे आयुष्य जगत नाहीत, जर ते असते तर त्यांना आत्मा त्यांच्या गर्विष्ठपणा आणि उन्मत्तपणाबद्दल दोषी ठरवितो याची जाणीव झाली असती.

जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना उपाधी वापरण्यापासून सावध केले तेव्हा तो त्यांना अशाच सैतानी आत्म्याबद्दल इशारा देत होता जो मंडळीमधील इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानू इच्छितो. सामान्य बांधवापेक्षा “रेव्हरंड” मोठा असतो. एक "पास्टर" देखील सामान्य भावापेक्षा मोठा असतो. पण येशू म्हणाला, की आपण सर्व जण फक्त सामान्य बंधू बनू. बाबेली लोकांना त्यांच्या उपाध्या राहू देत. आपण आत्म्यानेसुद्धा त्यांच्यापासून दूर राहू या. नेहमीच आपल्या मंडळीमधील आणि आत्म्यातही सर्वात कनिष्ठ बंधू बनण्याचा प्रयत्न करा आणि आपण केवळ स्वत:च सुरक्षित राहणार नाही तर ते सैतानाविरूद्धच्या लढाईसाठी देखील प्रभावी ठरेल.

देवाने त्याला ज्या परिस्थितीत ठेवले त्याविषयी ल्युसिफरदेखील असंतुष्ट होता. अशाप्रकारे तो सैतान बनला. असंतोषाची ही भावना सैतान आता जगभरात लोकांच्या हृदयात पसरवत आहे. आणि पुष्कळ, पुष्कळ विश्वासणाऱ्यांनादेखील हा संसर्ग झाला आहे. आपल्या ऐहिक, भौतिक परिस्थितीत सुधारणा करण्यात काहीही चूक नाही. पण जेव्हा तुम्ही पाहता की एखाद्या दुसऱ्या भावाकडे तुमच्यापेक्षा जास्त आहे, तेव्हा त्याचा हेवा करु नका, त्याच्याकडे जे काही आहे त्याची इच्छा करु नका आणि त्याच्याकडून कोणत्याही भेटवस्तूंची अपेक्षा करू नका. तुम्हाला जे देण्यास देव प्रसन्न झाला त्यामध्ये समाधानी रहा. "पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो."(नीतिसूत्रे १५:२७ ब ) सैतानाच्या योजनांकडे दुर्लक्ष करू नका. ज्या क्षणी आपण आपल्या पगाराबद्दल, आपले घर, आपल्या त्वचेचा रंग किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल असंतोष व्यक्त करता तेव्हा आपण सैतानाकडे आपल्या हृदयाचे दार उघडता.

सैतानाने बर्‍याच ख्रिस्ती लोकांना पक्षघाती केले आहे आणि त्याच्याविरूद्ध आध्यात्मिक युद्धात ते निष्प्रभ ठरले आहेत कारण सैतानाला त्यांच्या भावा-बहिणींबद्दल, त्यांचे नातेवाईक व शेजारी यांच्याबद्दल, त्यांच्या परिस्थितीविरूद्ध इतकेच नव्हे तर स्वतः देवाबद्द्लही कुरकुर करणे आणि तक्रार करणे या भावनांनी त्यांना संक्रमित करण्यात यश आले आहे. जेव्हा आपण खालील उपदेशांचे पालन करतो तेव्हा आपण सैतानावर विजय मिळवितो: (१) "ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिच्याकरता तुम्हांला एकशरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.(कलस्सैकरांस पत्र ३:१५) (२) तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी.(तीमथ्याला पहिले पत्र २:१) (३) आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा.(इफिसकरांस पत्र ५:२०).

एकदा आपण ख्रिस्ताचे शरीर असलेल्या आपल्या बंधू व भगिनींचे आभार मानण्यास शिकल्यानंतर आपण नंतर सर्व माणसांचे आणि नंतर आपल्या सर्व परिस्थितीबद्दल आभार मानण्यास शिकू शकतो. आम्हाला माहित आहे की आपला स्वर्गीय पिता सर्व माणसांवर आणि सर्व परिस्थितींवर सार्वभौमपणे नियंत्रण ठेवतो. जर आपण खरोखर यावर विश्वास ठेवला तर आम्ही नक्कीच नेहमी त्याची स्तुती करू आणि सिद्ध करू की आपले राज्य या जगाचे नाही तर स्वर्गाचे आहे. मग सैतान आपल्यावरील त्याचा प्रभाव गमावेल. तरच आम्ही त्याच्या विरुद्ध प्रभावी युद्ध करू शकू. प्रकटीकरण १२: ८ मध्ये एक अद्भुत वचन लिहिले आहे की सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गात कोणतीही जागा मिळाली नाही. आपल्या अंतःकरणात, आपल्या घरात आणि आपल्या मंडळ्यांमध्ये - आपल्या जीवनात देखील हेच असले पाहिजे. सैतान आणि त्याचे सैन्य यांना यापैकी कोणत्याही जागेमध्ये कोणतेही स्थान मिळू नये.