लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

दानीएल हा अशा लोकांपैकी एक होता ज्याचा उपयोग देव त्या पिढीमध्ये करू शकत होता. जेव्हा तो १७ वर्षांचा तरुण होता, तेव्हा "त्याने आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा मनात निश्चय केला (दानीएल १:८)." आणि जेव्हा हनन्या, मीशाएल आणि अजर्‍या यांनी तरुण दानीएलाला परमेश्वरासाठी ठाम भूमिका घेताना पाहिले, तेव्हा त्यांनाही परमेश्वराच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस मिळाले (दानीएल १:११). स्वत:च्या जिवावर उभे राहण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. पण दानीएलाची भूमिका पाहिल्यावर ते धाडसी झाले. आज असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या जिवावर परमेश्वराच्या बाजूने उभे राहण्याची हिंमत नाही, परंतु जे अशा दानीएलाची वाट पाहत आहेत जो ठाम भूमिका घेईल. मग ते त्याच्याबरोबर सामील होतील. तुम्ही असे दानीएल व्हाल काय? तुम्ही असे म्हणाल का की , "मी आपणाला विटाळ होऊ देणार नाही. मी राजाला, सेनापतीला किंवा पापाकडे पुन्हा वळलेल्या कोणत्याही वडिलांना किंवा कोणालाही खूश करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी १००% देवाच्या वचनासाठी उभा राहीन." आज आपल्या भूमीत दानीएलाच्या सेवाकार्याची खूप गरज आहे - पुरुष आणि स्त्रिया जे "अनेकांना नीतिमत्तेकडे नेतील" (दानीएल१२:३). हे वचन धर्मोपदेशक जे नीतिमत्तेचा प्रचार करतात त्यांचा नव्हे , तर इतरांना नीतिमत्तेकडे नेणाऱ्यांचा - शब्दाने आणि उदाहरणाने- उल्लेख करते.

आम्ही आणखी एका सेवाकार्याबद्दल पवित्र शास्त्रात वाचतो - आणि ते या "दानीएलाच्या सेवाकार्या" च्या अगदी विरुद्ध आहे "लुसिफरचे सेवाकार्य". प्रकटीकरण १२:४ मध्ये आपण वाचतो की, देवाविरुद्धच्या बंडात लाखो देवदूतांना त्याचे अनुसरण करायला लावण्यात लुसिफर यशस्वी झाला. देवाने लुसिफरला इतक्या देवदूतांना भरकटवण्याची परवानगी का दिली? जेणेकरून सर्व असंतुष्ट आणि बंडखोर देवदूत स्वर्गातून बाहेर काढले जातील. देवाविरुद्धच्या बंडात त्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक लुसिफर उद्भवला नसता तर त्यांची दुष्ट हृदये उघड झाली नसती.

आणि म्हणूनच आजही देव, बंधू-भगिनींना मंडळीमध्ये लुसिफरचे सेवाकार्य करण्याची परवानगी देईल. त्यांना पाठीमागे निंदा करणे, आरोप करणे , खोटे बोलणे आणि वाईट बोलत घरोघरी फिरण्याची परवानगी देवाकडून दिली जाईल जेणेकरून मंडळीमधील सर्व असंतुष्ट, बंडखोर आणि जगिक विश्वासणारे लोक ओळखता येतील, उघडे पाडले जातील, एकत्र जमवले जातील आणि मंडळीमधून बाहेर काढले जातील - म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचे शुद्धीकरण होईल. अशा लुसिफरच्या सेवाकार्यात गुंतलेल्यांना देव मंडळीमध्ये फिरण्यापासून थांबवणार नाही, जसे लाखो वर्षांपूर्वी त्याने स्वर्गात मूळ लुसिफरला थांबवले नाही. हे दैवी शहाणपण आहे.

अशा बंधू-भगिनींशी आपणही कधी भांडू नये. देव स्वत: मंडळीचे रक्षण करील व तो योग्य वेळी मंडळीची अशुद्धता करणाऱ्यांना नष्ट करेल (१ करिंथ ३:१७). पण देव अत्यंत सहनशील आहे आणि तो न्याय करण्यापूर्वी अनेक वर्षे वाट पाहतो - कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही पण सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे (२ पेत्र ३:९). नोहाच्या काळात त्याने १२० वर्षे वाट पाहिली. पण जेव्हा देव न्याय करतो, तेव्हा त्याचा न्याय कठोर असेल. त्यामुळे मंडळीमध्ये कधीही फूट पडली नाही, असा अभिमान बाळगणे मूर्खपणाचे आहे. स्वर्गातच, देवदूतांमध्ये अगदी सुरुवातीला फूट पडली होती. अशा फुटी आवश्यक आहेत, "कारण तुमच्यामध्ये जे (देवाच्या )पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत"(१ करिंथ ११:१९) प्रकाश अंधारापासून वेगळा करावाच लागेल. ही काही फूट नाही. हे एक शुद्धीकरण आहे. ते केले नाहीतर पृथ्वीवरील देवाची साक्ष भ्रष्ट होईल.

आपल्या सर्वांचे एकतर दानीएलासारखे सेवाकार्य - मंडळीमध्ये ऐक्य आणि सहभागिता निर्माण करणे - किंवा लुसिफरचे सेवाकार्य - मतभेद पेरणे यांपैकी एक असू शकते. आपण तटस्थ राहू शकत नाही. येशूने म्हटले की, जे त्याच्याबरोबर गोळा करत नाहीत ते लोकांना त्याच्यापासून दूर पांगवतात. मंडळीमध्ये फक्त दोन सेवाकार्ये आहेत - गोळा करणे आणि विखुरणे. (मत्तय १२:३०).

या शेवटच्या दिवसांत आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगावे यासाठी कृपा आणि शहाणपण देव आपल्याला पुरवो जेणेकरून देवाच्या नावाच्या वैभवासाठी प्रत्येक ठिकाणी शुद्ध साक्ष म्हणून मंडळीची निर्मिती करता येईल.