लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

हनोख आणि नोहा - देवाबरोबर चालणाऱ्या दोन माणसांचा आपण विचार करू या.

उत्पत्ति ५ मध्ये आम्ही आठ वेळा 'आणि तो मरण पावला' असे वाचतो. पण त्या अध्यायाच्या मध्यभागीच, आपण मरण न पावलेल्या एकाबद्दल वाचतो!! तो हनोख होता. तो देवाबरोबर चालला आणि देव त्याला जिवंतपणे स्वर्गात घेऊन गेला. ते मृत्यूच्या दरम्यान पुनरुत्थित जीवनाचे चित्र आहे. हनोख हा एक असा माणूस होता जो पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये राहिला, त्याने मृत्यूवर विजय मिळविला आणि त्याला स्वर्गात नेले गेले - हे एक आध्यात्मिक मृत्यूच्या वेळीही जिवंत राहणाऱ्या एका आत्मिक मंडळीचे चित्रण आहे, पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जिंकून शेवटी ती उचलली जाणार आहे.

हनोख कदाचित आपल्या आयुष्याच्या पहिल्या ६५ वर्षांत एक देवभीरू मनुष्य नसावा. पण ६५ व्या वर्षी त्याला मुलगा झाला. दैवी प्रकटीकरणानुसार त्याने मुलाचे नाव "मथुशलह" ठेवले. "मथुशलह" म्हणजे "त्याच्या मृत्यूच्या वेळी जलप्रलय येईल." असे दिसते की हनोखाचा मुलगा जन्माला आला तेव्हा देवाने त्याला हे प्रकट केले. देव हनोखाला म्हणाला की जेव्हा तो मुलगा मरण पावेल तेव्हा जगाचा न्याय पाण्याने होईल. हे न्यायाचे प्रकटीकरण नोहाला नव्हे तर प्रथम हनोखाला झाले. म्हणून त्याने आपल्या मुलाचे नाव मथुशलह ठेवले.

आता आपल्याला मूल झाल्यावर, ते किती काळ जगेल हे आपल्याला ठाऊक नसते. म्हणून जेव्हा प्रत्येक वेळी मथुशलह आजारी पडला तेव्हा, न्यायाचा दिवस जवळ आला असावा की काय असे हनोखाला वाटले असेल. आपण कल्पना करू शकता का एखाद्या मुलाचे नाव असे आहे ज्याचा अर्थ "त्याच्या मृत्यूच्या वेळी पूर येईल"? प्रत्येक वेळी जेव्हा आपण त्याला हाक मारू तेव्हा आपल्याला न्यायाच्या दिवसाची आठवण होईल. आणि देवाच्या न्यायाच्या भीतीमुळे हनोख देवाबरोबर चालायला शिकला आणि त्याच्या लक्षात आले की सांप्रत काळाच्या गोष्टींपेक्षा अनंतकाळच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हनोखाला पुढील ३०० वर्षे दररोज देवाबरोबर चालण्यासाठी हेच कारण होते.

पवित्र शास्त्र म्हणते, "जग नाहीसे होईल" (१ योहान २:१७). आपण जर विश्वास ठेवला तर हनोखाप्रमाणेच आपल्यालाही हे समजले असेल की सांप्रत काळाच्या गोष्टींपेक्षा अनंतकाळच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

मनुष्यासोबतची देवाची प्रचंड सहनशीलता या गोष्टीतून दिसून येते की त्याने मथुशलहाला इतर कोणत्याही मानवापेक्षा अधिक, ९६९ वर्षांचे आयुष्य दिले. ९६९ वर्षे जेव्हा लोकांनी मथुशलहाचे नाव ऐकले तेव्हा त्यांनी न्यायाचा दिवस येण्याबद्दलचा संदेश ऐकला. पण लोकांनी हा संदेश नाकारला. केवळ नोहानेच या न्यायाविषयी उपदेश केला नाही. हनोखानेही हाच उपदेश ३०० वर्षे केला आणि मथुशलहाने आपल्या नावावरुन आणखी ६६९ वर्षे हाच उपदेश केला.

नोहा सुद्धा देवाबरोबर चालला आणि मथुशलहाच्या आयुष्याच्या शेवटच्या १२० वर्षांमध्ये नोहाने न्यायाविषयी उपदेश केला. हनोख व मथुशलहाला जलप्रलयाचे तपशील स्पष्टपणे ठाऊक नव्हते जसे देवाने नोहाला नंतर प्रगट केले. पण त्यांना हे ठाऊक होते की जेव्हा मथुशलह मरण पावेल तेव्हा जलप्रलयाशी संबंधित काही न्याय होणार आहे.

यहूदा आम्हाला सांगतो की हनोखाने आपल्या काळातील सर्व अधार्मिक लोकांविरुद्ध न्यायाचा संदेश दिला (यहूदा १४,१५). हनोख संदेष्टा होता आणि तो देवाबरोबर चालला. हनोखाचा जन्म झाला तेव्हा आदाम ६२३ वर्षांचा होता आणि त्याचा मृत्यू ९३० व्या वर्षी झाला (उत्पत्ति ५: ५-२३). म्हणून हनोख आदामाला ३०८ वर्षे ओळखत असावा. मी कल्पना करू शकतो की एदेन बागेमध्ये आदाम स्वत: एके काळी देवाबरोबर चालला असता त्यावेळच्या एदेनातल्या गोष्टींबद्दल हनोखाने अनेकदा आदामाला विचारले असावे. आणि हनोखाला स्वतः देवासोबत चालण्याची उत्कट इच्छा झाली असावी. एदेनच्या बाहेरही एखादा देवाबरोबर चालू शकतो हे सिद्ध करणारा हनोख पहिला माणूस ठरला. जरी जगात पाप आले तरी माणूस देवाबरोबर चालू शकत होता.

मी माझ्या आयुष्यात बर्‍याच महान प्रचारकांना भेटलो आहे, परंतु मी देवाबरोबर चालणाऱ्या खूप कमी लोकांना भेटलो आहे. आणि हेच ते लोक आहेत ज्यांनी लहानपणापासून देवाबरोबर चालण्यासाठी माझ्या हृदयात तळमळ निर्माण केली.

नोहा हा मथुशलहाचा नातू होता आणि नोहा ६०० वर्षे मथुशलहाबरोबर राहिला. हनोख देवाबरोबर कसा चालला याबद्दल त्याने अनेक वेळा मथुशलहाला विचारले असावे. नोहाच्या मनातही आपण देवासोबत चालण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. आम्ही उत्पत्ति ६:९ मध्ये वाचतो की नोहासुद्धा देवाबरोबर चालत होता. नोहा देवाबरोबर चालत असताना, देवाने आपला न्यायनिवाडा करण्याचा उद्देश त्याला सांगितले.

पापाविरुद्धच्या न्यायाचे ते सत्य देवाने त्याच्या सोबत चालणाऱ्या पहिल्या दोन लोकांना प्रगट केले (शास्त्रात). आणि कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तरी हनोख व नोहाने विश्वासूपणे संदेश दिला. तेव्हापासून देवाच्या प्रत्येक खऱ्या संदेष्ट्यानेसुद्धा हाच संदेश दिला: देव विश्वासणाऱ्यांचा आणि अविश्वासणाऱ्यांचा त्यांच्या पापांसाठी न्याय करेल.

पवित्र शास्त्रात उल्लेख केलेले हनोख व नोहा हे पहिले दोन उपदेशक आहेत आणि ते दोघेही देवाबरोबर चालले. तेव्हापासून प्रत्येक उपदेशकानेही असेच करावे अशी देवाची इच्छा आहे.