WFTW Body: 

उत्पत्ति २२ मध्ये परिच्छेदाची सुरुवात "ह्या गोष्टी घडल्यावर...." या वाक्याशांने होते. या कसोटीच्या अगदी आधीची परिस्थिती पाहता आपल्याला अब्राहाम विजयी स्थितीत सापडतो. विदेशी त्याच्याकडे आले होते आणि म्हणाले, "जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्याबरोबर आहे."(उत्पत्ती २१:२२) सारेची ज्या अद्भुत पद्धतीने गर्भधारणा झाली होती त्याबद्दल त्यांनी निश्चितच ऐकले होते आणि देव या कुटुंबासोबत आहे याची त्यांना खात्री होती यात शंका नाही. इश्माएलला घालवण्यात आले होते. इसहाक आता अब्राहामाच्या हृदयाचा लाडका होता. या वेळी अब्राहाम देवाबद्दलची पहिली प्रीती आणि भक्ती गमावण्याच्या गंभीर धोक्यात उभा होता . आणि म्हणून देवाने त्याची पुन्हा परीक्षा घेतली आणि त्याला इसहाकाचे अर्पण करण्यास सांगितले. पण अब्राहामाला देवाचे ऐकण्यासाठी कान होते आणि देवाने आज्ञा केलेल्या कोणत्याही गोष्टीचे पालन करण्यास तयार असलेले अंतःकरण होते. दुस-या दिवशी तो पहाटे उठून देवाचे आज्ञापालन करण्यासाठी पुढे निघाला (उत्पत्ती २२:३). देव त्याच्याशी बोलल्यानंतर आदल्या रात्री हा वयस्क कुलाधिपती कोणत्या मनस्थितीतून गेला हे या नोंदीतून आपल्याला सांगता येत नाही. मला खात्री आहे की त्या रात्री तो झोपला नसणार. तो जागा राहिला असेल आणि पुन्हा पुन्हा जाऊन आपल्या लाडक्या मुलाकडे बघत राहिला असेल; आणि त्याचे आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करताना अश्रू त्याच्या डोळ्यांतून खाली ओघळले असावेत.

अब्राहामाला आपल्या वृद्धापकाळातील मुलाचे अर्पण देणे किती कठीण गेले असेल. पण तो कोणत्याही परिस्थितीत देवाचे आज्ञापालन करण्यास तयार होता. पन्नास वर्षे आधी देवाने त्याला बोलावले होते तेव्हा त्याने नांगराला हात घातला होता; आणि तो आता मागे वळून बघणार नव्हता. त्याच्या आज्ञापालनाला आणि त्याच्या देवासाठी त्याग करण्याच्या इच्छेला कोणतीही मर्यादा नव्हती. तो देवाचा मित्र बनला यात नवल नाही.

इसहाकाचे अर्पण देण्यासाठी जाताना अब्राहामाच्या अंतःकरणात विश्वास होता, की देव आपल्या मुलाला काहीही करून मृतांमधून उठवेल. इब्री लोकांस पत्र ११:१९ आपल्याला हे सांगते. देवाने इसहाकाच्या जन्माने अब्राहामाला त्याच्याच शरीरात आणि सारेच्या शरीरात पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा पूर्वानुभव दिला होता. वेदीवर मारल्या गेलेल्या एका इसहाकाला पुन्हा जिवंत करणे अशा देवाला नक्कीच अशक्य नव्हते. आणि म्हणून अब्राहाम आपल्या नोकरांना मोरिया पर्वताच्या पायथ्याशी सोडताना सांगतो, "मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून (आम्ही दोघे) तुमच्याकडे परत येतो" (उत्पत्ती २२: ५). तो विश्वासाचा शब्द होता. त्याला विश्वास होता की इसहाक त्याच्याबरोबर परत येईल.

हे ही पहा की तो आपल्या नोकरांना सांगतो, "आम्ही देवाची उपासना करणार आहोत." देवाला त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे, अशी तक्रार तो करत नाही, किंवा देवासाठी तो जे अद्भुत बलिदान करणार आहे त्याबद्दल तो अभिमानही बाळगत नाही. नाहीच. अब्राहाम, जे लोक देवासाठी केलेल्या अर्पणाबद्दल इतरांना सहजपणे माहिती सांगतात त्यांच्या श्रेणीत बसला नाही. अब्राहाम म्हणाला की तो आपल्या देवाची उपासना करणार आहे. आणि तिथे आपल्याला उपासनेचा खरा अर्थ समजतो. येशूने एकदा असे म्हटले होते, "अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला; तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला." (योहान ८:५६). अब्राहामाने ख्रिस्ताचा दिवस नक्कीच मोरिया पर्वतावर पाहिला असावा. भविष्यदर्शक दृष्टांतामध्ये, वयस्क कुलाधिपतीने स्वत: च्या कृतीत त्या दिवसाचे एक चित्र (जरी ते अंधुक असले तरी)पाहिले, जेव्हा देव स्वतः आपल्या एकमेव पुत्राला कालवरीच्या टेकडीवर घेऊन जाईल आणि त्याला मानवजातीच्या पापी लोकांसाठी बलिदान म्हणून अर्पण करेल. आणि त्या दिवशी अब्राहामाला, मोरिया पर्वतावर एक भरकटलेले जग वाचवण्यासाठी देवाच्या अंतकरणाला काय किंमत मोजावी लागेल याची कल्पना आली.त्या सकाळी तो देवाच्या अंतकरणाशी घनिष्ठ सहभागितेत आला. होय, त्याने देवाची उपासना केली - केवळ सुंदर शब्द आणि गीतांनी नव्हे, तर मोठी किंमत मोजाव्या लागलेल्या आज्ञापालनाने आणि त्यागाद्वारे.

देवाचे सखोल आणि घनिष्ठ ज्ञान अशा आज्ञापालनातूनच मिळू शकते. आपण आपल्या मनात बरीच अचूक धर्मशास्त्राची माहिती जमा करू शकतो; पण खरे आध्यात्मिक ज्ञान तेव्हाच मिळू शकते जेव्हा आपण देवाला सर्वकाही अर्पण करतो. दुसरा कोणताही मार्ग नाही. अब्राहामाला देणारा आवडेल की त्याची दाने जास्त आवडतील याची येथे परीक्षा घेतली जात होती. इसहाक ही निःसंशयपणे देवाची देणगी होती, पण अब्राहामाला आपल्या मुलाबद्दल अवाजवी आपुलकी असण्याचा धोका होता. ज्याने अब्राहामाच्या आध्यात्मिक दृष्टीला झाकोळून टाकले असते. आणि म्हणून देवाने अब्राहामाला अशा शोकांतिकेपासून वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला.