पेत्राच्या पहिल्या पत्रात, प्रेषित पेत्र अधीनतेबद्दल बरेच काही बोलतो. जो माणूस देवाची खरी कृपा अनुभवतो तो जिथे जाईल तिथे तो नेहमीच अधिकाराच्या अधीन राहील. त्याला अधीन राहण्यात कोणतीही अडचण असणार नाही. आदामाची निर्मिती होण्याच्या खूप आधी ,पापाची उत्पत्ती बंडातून झाली. सर्वोच्च देवदूताने देवाच्या अधिकाराविरुद्ध बंड केले आणि लगेच तो सैतान बनला. म्हणूनच "बंड करणे हे जादूटोण्याच्या पापासारखे आहे" (१ ले शमुवेल १५:२३) - कारण जादूटोणा करण्या सारखेच बंडखोर आत्मा एखाद्याला दुष्ट आत्म्यांच्या संपर्कात आणतो. येशूने अगदी उलट पद्धतीने जगून सैतानावर विजय मिळवला. त्याने स्वतःला नम्र केले आणि त्याच्या पित्याच्या परिपूर्ण अधीनतेत तो पृथ्वीवर आला; आणि येथे पृथ्वीवर तो ३० वर्षे आपरिपूर्ण योसेफ आणि मरीया यांच्या अधीन राहिला, कारण ते मानवी अधिकार त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर ठेवले होते. ज्याने देवाची खरी कृपा अनुभवली आहे तो त्याच्या आत्म्यात बंडाच्या आत्म्यापासून तारणाचा अनुभव घेईल. जर तुम्हाला अधिकाराला अधीन राहण्यात समस्या येत असेल तर तुम्हाला तुमच्या आत्म्यात तारण मिळणे आवश्यक आहे.
ख्रिस्ती लोकांना सर्व मानवी अधिकाऱ्यांच्या जसे राजे, राज्यपाल इत्यादींच्या अधीन राहण्याचे आवाहन केले जाते (पेत्राचे पहिले पत्र २:१३, १४). त्या वेळी रोमचा सम्राट नीरो होता, जो रोमवर राज्य करणाऱ्या सर्वात दुष्ट राजांपैकी एक होता आणि ख्रिस्ती लोकांचा छळ आणि हत्या करणारा होता. तरीही पेत्र ख्रिस्ती लोकांना केवळ त्याच्या अधीन राहण्यासच नव्हे तर "राजाचा सन्मान" करण्यास सांगतो (पेत्राचे पहिले पत्र २:१७). तो असेही म्हणतो की आपण "सर्व माणसांचा सन्मान" केला पाहिजे. (पेत्राचे पहिले पत्र २:१७). जुन्या करारानुसार, वृद्धांचा आदर करण्याची आज्ञा होती (लेवीय १९:३२). परंतु नवीन करारानुसार, आपण सर्व लोकांचा आदर केला पाहिजे. नवीन करारानुसार प्रत्येक क्षेत्रातील दर्जा उच्च आहे. जुन्या करारानुसार, लोकांना देवाला १०% द्यावे लागत होते. नवीन करारात, आपण देवाला सर्वकाही दिले पाहिजे (लूक १४:३३). जुन्या करारानुसार, एक दिवस पवित्र (शब्बाथ) पाळावा लागत असे. नवीन करारात, प्रत्येक दिवस पवित्र असायला हवा. जुन्या करारानुसार, प्रथम जन्मलेला मुलगा देवाला समर्पित करावा लागत असे . नवीन करारात, आपली सर्व मुले देवाला समर्पित असायला हवीत. ज्या माणसाने देवाची कृपा अनुभवली आहे त्याला सर्व लोकांचा आदर करण्यात कोणतीही अडचण येत नाही. आपण येशूसारखे सेवक असायला हवे, आणि म्हणून सर्वांना आदर देण्यात आणि "सर्वांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानण्यात" आपण आनंद मानला पाहिजे.(फिलिप्पैकरास पत्र २:३).
मग तो विशेषतः सेवकांशी बोलतो आणि त्यांना त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यास सांगतो. सर्व प्रेषितांनी सेवकांना त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यास शिकवले. ज्या ख्रिस्ती व्यक्ती मध्ये त्याच्या कार्यालयात किंवा कारखान्यात त्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध बंड करण्याची भावना असते तो ख्रिस्तासाठी खूप वाईट साक्षीदार आहे . शाळेत किंवा महाविद्यालयात आपल्या शिक्षकांविरुद्ध बंड करणारा ख्रिस्ती विद्यार्थी देखील ख्रिस्तासाठी खूप वाईट साक्षीदार आहे . अशा ख्रिस्ती व्यक्तीला "देवाची खरी कृपा" अजिबात समजलेली नाही. त्याला हे समजलेले नाही की येशू ३० वर्ष त्याच्या अपरीपूर्ण जगिक पालकांच्या अधीन राहिला. हा धडा आपण सर्वांनी शिकला पाहिजे. सेवकांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकांच्या अधीन राहा. जर तुम्ही एखाद्या कार्यालयात, कारखान्यात, शाळेत, रुग्णालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काम करत असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा वरच्या लोकांचा आदर केला पाहिजे.
आपण आपल्या मुलांना त्यांच्या शिक्षकांचा आदर करण्यास शिकवले पाहिजे, आणि इतर मुलांशी गटबाजी करू नये आणि शिक्षकांची थट्टा करू नये हे ही शिकविले पाहिजे. नोकरांनी केवळ चांगल्या आणि सौम्य असलेल्या मालकांनाच नव्हे तर अवास्तव अपेक्षा करणाऱ्या लोकांनाही आदर दाखवायला शिकले पाहिजे. चांगल्या मालकाच्या अधीन राहणे सोपे आहे, परंतु "देवाची खरी कृपा" अनुभवलेला ख्रिस्ती अवास्तव अपेक्षा करणाऱ्या मालकाच्यादेखील अधीन राहतो (पेत्राचे पहिले पत्र २:१८). जेव्हा तुम्ही अवास्तव अपेक्षा करणाऱ्या मालकाच्या अधीन राहता तेव्हाच तुमचा ख्रिस्ती म्हणून प्रकाश पडतो. जळणारी मेणबत्ती सूर्यप्रकाशात सहज दिसत नाही. परंतु रात्री प्रत्येकजण तीचा प्रकाश पाहू शकतो. म्हणून, एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचा प्रकाश जेव्हा तो अंधारात असतो तेव्हा सर्वात जास्त तेजस्वीपणे दिसतो.
जेव्हा तुम्हाला काही चुकीचे केल्याबद्दल शिक्षा होते तेव्हा धीराने अधीन राहण्यात काही सद्गुण नाही. परंतु जेव्हा तुम्ही जे योग्य आहे ते केले परंतु तरीही तुम्ही धीराने दुःख सहन करता, तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न होतो (पेत्राचे पहिले पत्र २:२०). अन्याय झाल्यावर देखील दुःख सहन करणे हा पेत्राच्या पत्राचा एक मोठा विषय आहे. तो पुढे म्हणतो की येशूनेही असेच दुःख सहन केले. त्याने अन्याय सहन केला आणि त्याच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपल्याला एक उदाहरण सोडले आहे. आपल्याला येथे "त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचे आवाहन केले आहे ज्याने कधीही पाप केले नाही, ज्याने कधीही खोटे बोलले नाही, ज्याने अपमान झाल्यावरही कधीही उलट उत्तर दिले नाही; आणि ज्याने दुःख सहन केले तेव्हा त्याने सूड घेण्याची धमकी दिली नाही; परंतु त्याचे प्रकरण न्यायाने न्याय करणाऱ्या देवावर सोपवले" (पेत्राचे पहिले पत्र २:२१-२३). "देवाची खरी कृपा" समजून घेतलेला ख्रिस्ती व्यक्ती देखील असेच वागतो.