WFTW Body: 

.१. पळ काढा
मोहावर मात करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ते टाळणे आणि त्यापासून पळून जाणे - जसे योसेफाने केले (उत्पत्ती ३९:७-१२). आपल्याला जोमाने मोहात पाडणारी आणि आपल्याला कमकुवत बनवणारी सर्व ठिकाणे आणि लोक टाळा. येशूने आपल्याला अशी प्रार्थना करण्यास शिकवले, "आम्हांस परीक्षेत आणू नको" (मत्तय ५:१३). आपण ते केले याबद्दल सार्वकालिक जीवनात तुम्ही आभार मानाल. पृथ्वीवरसुद्धा, आजपासून काही वर्षांतच तुम्ही कृतज्ञ असाल की, तुम्ही अशा ठिकाणांना आणि लोकांना टाळले, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मात करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन मोहात पडू शकला असता. अशी ठिकाणे आणि लोक टाळणे हा असा मार्ग आहे की तुम्ही परमेश्वराला हे सिद्ध करून दाखवता की तुम्ही फक्त त्यालाच संतुष्ट करण्यास खरोखर उत्सुक आहात. (या संदर्भात नीतिसूत्रे ७ वाचा. सर्व तरुण पुरुषांनी अधूनमधून वाचण्यासाठी हा एक चांगला अध्याय आहे).

विरुद्धलिंगी व्यक्तीशी खूप जवळची मैत्री होण्यापासून पळ काढा. आपल्या वासनांना चिथावणी देणारे आणि उत्तेजित करणारे साहित्य (आणि संकेतस्थळे) यांपासून दूर राहा. निरुपयोगी टीव्ही कार्यक्रम पाहण्यात जो वेळ जातो, त्या वेळेच्या अपव्ययापासूनही पळ काढा. चहाड्या ऐकण्यापासून पळ काढा. वाईट ऐकणे, वाईट वाचणे आणि वाईट पाहणे, यामुळे तुम्हाला केवळ वाईटाबद्दल ज्ञान मिळेल. पण तुम्हाला त्या घाणेरड्या माहितीची गरज का आहे? हे केवळ आपल्याला मलीन करेल आणि आपला नाश करेल. अशा सर्व माहितीसाठी आतापासून तुम्ही तुमचे कान आणि डोळे बंद केले पाहिजेत. इतर जे वाईट करतात ते जाणून घेण्याने तुम्ही कधीही शहाणे बनणार नाही. पवित्र शास्त्र आपल्याला " दुष्टपणाबाबत तान्हया मुलासारखे" होण्यास आर्जवते (१ करिंथ १४:२०). मुलाचे मन सर्व वाईटांपासून शुद्ध असते. आणि सुवार्तेची चांगली बातमी ही आहे की, आपण पुष्कळ वर्षे वाईट माहितीने आपले मन मलीन करण्यात घालवली असली, तरी आता जर आपण खरोखरच त्यापासून मुक्त होण्याची इच्छा बाळगली, तर पवित्र आत्मा आपल्याला पुन्हा एकदा मुलासारखे शुद्ध मन प्राप्त करण्यास मदत करू शकतो. देवाची कृपा आपल्यासाठी हेच करते. प्रभूची स्तुती करा! आपल्याला "जे चांगले आहे त्यासंबंधाने शहाणे आणि वाइटाविषयी साधेभोळे" असण्यासाठी बोलावले आहे (रोम १६:१९). तेव्हा, पवित्र आत्म्याला येशू कसा जगला हे तुम्हांला दाखवण्यास सांगा. मग "जे चांगले आहे त्यासंबंधाने शहाणे" असणे म्हणजे काय ते तुम्हाला समजेल.

2. शोक करा
जर तुम्ही पापात पडलात, तर तुम्ही ताबडतोब शोक केला पाहिजे आणि क्षमा मागितली पाहिजे; अन्यथा तुम्ही पापाला सहजपणाने घेण्यास सुरुवात कराल आणि मग विजय मिळवणे अधिकाधिक कठीण होईल. यास्तव, देवाच्या दर्जांपासून कोठेही कमी पडल्याची जाणीव होताच, तुम्ही देवासोबत लगेच आपला हिशोब नीट करणे आणि पाप कबूल करणे, ते सोडून देणे व त्याचा पश्चात्ताप करणे शिकले पाहिजे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही पापात पडता तेव्हा तुम्ही शोक करत असाल, तर यावरून देवाला सूचित होते, की तुम्हाला खरोखरच पापावर विजय मिळवण्याच्या जीवनाची तहान लागली आहे. आणि म्हणूनच, जेव्हा कधी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल थोडीशीही अस्वस्थता निर्माण होते, तेव्हा तेव्हा ते प्रकरण ताबडतोब मिटवा. तुमच्या केवळ विचारांमध्ये अपयश आले असले, तरी ते पाप त्याच वेळी देवाला कबूल करा. ज्याची माफी मागण्याची गरज असेल त्याची माफी मागा. आणि मग देव तुम्हाला कशा प्रकारे सामर्थ्य देतो हे तुम्हाला दिसेल.

3. टिकून राहा
हेच विजयाचे रहस्य आहे. हे चालू ठेवा - ज्याप्रमाणे एक विद्यार्थी गृहपाठाची समस्या सुटेपर्यंत त्यावर काम करत राहतो. निराश होण्याचा मोह सार्वत्रिक आहे; पण हार मानू नका. तुमचा जन्म होण्यापूर्वी देवाने तुमच्या जीवनाची एक परिपूर्ण योजना बनवली आहे (स्तोत्र १३९:१६). सैतानाला त्याचा नाश करू देऊ नका. कितीही किंमत मोजावी लागली तरी परमेश्वरासाठी ठाम राहा. येशूने योहान १४:३० मध्ये म्हटले आहे की, जगाचा अधिपती आला तेव्हा त्याला येशूमध्ये काहीही सापडले नाही. येशू ज्याप्रमाणे चालला आता आपल्याला त्याच्याप्रमाणे चालण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सैतान जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा त्याला तुमच्यात काहीही सापडू नये. म्हणूनच तुम्ही "देवासंबंधी व मनुष्यांसंबंधी अपराध न करणारा विवेक टिकवून ठेवण्यासाठी सर्वदा सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत" (प्रेषितांची कृत्ये २४:१६). जाणूनबुजून केलेले पाप न करता जगण्यासाठी देवाची मदत मिळावी म्हणून तुम्ही मनापासून देवाचा शोध घेतला पाहिजे. तुम्ही वासनांना शरण गेलात तर तुमच्या जीवनात सैतानाला पाय रोवता येईल. रोमकरांस पत्र ६:१ मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे, "आपण पाप करत राहावे काय ? " रोमकरांस पत्र ६:१५ मध्ये प्रश्न विचारला आहे, "आपण एकदाही पाप करावे काय ? दोन्ही प्रश्नांचे एक जोरदार उत्तर आहे, "नाही, कधीच नाही. "प्रलोभने आणि चुका तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्या आयुष्याचा सतत एक भाग असतील. परंतु आपण काही काळानंतर, जाणूनबुजून केलेल्या पापावर विजय मिळवू शकता - आणि त्यानंतर अपयशी होणे दुर्मिळ होईल.