लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

अनुवाद म्हणजे 'दुसरा नियम' असा अर्थ होतो. कारण नियमशास्त्राच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंची येथे पुनरावृत्ती आहे. आपण या पुस्तकाचे दोन प्रकारे विभाजन करू शकतो. आपण सर्वप्रथम मोशेने दिलेल्या तीन भाषणांप्रमाणे त्याचे विभाजन करू शकतो :

१. पहिले भाषण (अध्याय १ ते ४)
२. दुसरे भाषण (अध्याय ५ ते २६)
३. तिसरे भाषण (अध्याय २७ ते ३०)

आणि हे सगळं त्या माणसाने सांगितले ज्याने जळत्या झुडपात परमेश्वराला सांगितले की त्याला बोलता येत नाही! पुस्तकाचा समारोप; मोशेचे गीत (अध्याय ३२), मोशेने दिलेला आशीर्वाद (अध्याय ३३) आणि मोशेचा मृत्यू (अध्याय ३४) यांनी होतो. पुस्तकाचे विभाजन करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तीन दिशांकडे पाहणे :

१. मागे वळून पाहणे. अरण्यात ४० वर्षांदरम्यान देवाच्या विश्वासूपणाकडे मागे वळून पाहणारे दोन संदेश (अध्याय १-११).
२. वर पाहणे. देवाकडे पाहणारे दोन संदेश - त्याच्या नियमांद्वारे. देवाच्या नियमांद्वारे मनुष्याला स्वतःची गरज दिसते (अध्याय १२-३१).
३. पुढे पाहणे. भविष्यात देव ज्या अद्भुत गोष्टी करणार आहे त्याबद्दल दोन संदेश (अध्याय ३२-३३).

आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात या तिन्ही दिशांकडे पाहण्याची गरज आहे. आपण कितीही वयातीत झालो तरी या तिन्ही दिशांकडे पाहणे आपण कधीही थांबवू नये.

१. मागे वळून पाहणे (अनुवाद १-११)

आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज आहे. माझ्या आयुष्यात अनेकदा परमेश्वराने मला कसे चालवले आहे याकडे मी मागे वळून पाहिले आहे - आणि त्यामुळे माझा विश्वास पुन्हा नवीन झाला आहे. जेव्हा मला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि त्यातून मार्ग नाही असे वाटते तेव्हा मी स्वतःला पवित्र शास्त्रामधील अभिवचनांची आठवण करून देतो आणि इतर विश्वासणाऱ्या बांधवांनी मला दिलेल्या प्रोत्साहनाकडे लक्ष देतो. पण माझा विश्वास बळकट करणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की जेव्हा मी मागे वळून पाहतो. परमेश्वर मला विचारतो, "मी तुला आतापर्यंत एकदाही तोंडघशी पडू दिले आहे का?" मला उत्तर द्यायला हवे की "नाही, प्रभुजी. एकदाही नाही." मग तो म्हणतो, "मी तुला आता ही तोंडघशी पडू देणार नाही." मागे वळून पाहणे मला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रोत्साहन देते.

तुम्ही पुन्हा पडला आहात का? मागे वळून पाहा आणि भूतकाळात परमेश्वराने तुम्हांला कशी क्षमा केली ते पाहा. जेव्हा त्याने तुम्हांला माफ केले तेव्हा तुम्ही पुन्हा पडाल हे त्याला माहीत नव्हते का? तुम्ही पुन्हा पडलात हे पाहून त्याला आश्चर्य वाटले का? नाही. मग तो तुम्हांला पुन्हा माफ करेल. कृतज्ञतेने मागे वळून पाहा. यामुळे तुमचा विश्वास आणखी मजबूत होईल. प्रभूच्या दयेबद्दल कृतज्ञ राहा. भूतकाळात जेव्हा तुम्ही तुमच्या अपयशाकडे पाहता तेव्हा तुम्ही अपयशी ठरलेल्या तुमच्या आजूबाजूच्या इतर विश्वासणाऱ्या बांधवांशी दयाळूपणे वागायला शिकाल. पण आणखी एक मार्ग आहे ज्याप्रमाणे आपण मागे वळून पाहू नये. पौल म्हणाला, "मागील गोष्टी विसरून जाऊन." (फिलिप्पैकरांस पत्र ३:१३). जर आपण चुकीच्या पद्धतीने मागे वळून पाहिले तर आपण निराश होऊ आणि विचार करू की आपण निरुपयोगी आहोत आणि आपल्या आयुष्याची इतकी वर्षे वाया घालवल्यामुळे आपण जीवनात अपयशी ठरलो आहोत.

आपण आपले आयुष्य वाया घालवले आहे असे ज्यांना वाटते त्यांना मी प्रोत्साहन देऊ इच्छितो. येशूने कामाच्या दिवशी १२ पैकी ११ तास काम न करणाऱ्या काही कामकऱ्यांचा एक दाखला सांगितला. अकराव्या तासाला एका माणसाने त्यांना आपल्या द्राक्षबागेत काम करण्यास सांगितले. त्यांनी जाऊन फक्त एक तास काम केले. पण येशूने म्हटले की त्यांना आधी त्यांचे वेतन मिळाले! १२ तास काम करणाऱ्यांना शेवटी बक्षीस मिळाले! मला आशा आहे की यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. आपण निराशेने मागे वळून पाहू नये. आपण गर्वानेही मागे वळून पाहू नये. "मागे होऊन गेलेल्या गोष्टी विसरणे" हे आपल्याला निराश करणाऱ्या आणि आपल्याला गर्व वाटणाऱ्या या दोन्हींही गोष्टींशी संबंधित आहे. जर तुम्ही तुम्हांला निराश करणाऱ्या किंवा तुम्हाला गर्व वाटेल अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत असाल तर मी तुम्हांला ते लवकरात लवकर विसरायला सांगेन. पण देवाने भूतकाळात आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञतेने मागे वळून पाहिले पाहिजे. मी याच मागे वळून पाहण्याबद्दल बोलत आहे. पेत्र म्हणतो की ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे (२ पेत्र १:९).

२. वर पाहणे (अनुवाद १२-३१)

आपण वरसुद्धा पाहण्याची गरज आहे. वर पाहणे आणि परमेश्वराचे अधिक गौरव पाहणे आपण कधीही थांबवू नये. येशूचे गौरव आपण अजूनही पूर्णपणे पाहिलेले नाही.आपल्याला याची भूक लागली पाहिजे, कारण पवित्र आत्मा आपले याच प्रतिमेत परिवर्तन घडवून आणू इच्छितो. प्रभूचे वैभव पाहून आपण नम्र होऊ कारण आपल्याला स्वतःची गरज दिसेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत नम्रतेत राहण्याचे हे रहस्य आहे.

ज्याला देवाने अभिषिक्त केले आहे आणि ज्याचा उपयोग केला आहे त्याला गर्व होणे हे अतिशय सोपे आहे. मी असे अनेक प्रचारक पाहिले आहेत. देवाने त्यांचा वापर केल्यामुळे त्यांना इतका गर्व वाटतो आणि ते लोकांपासून दूर दूर राहतात. आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्यात भग्नता व नम्रता कशामुळे टिकून राहू शकते? एकच गोष्ट येशूकडे पाहणे जो आपल्या विश्वासाचा कर्ता व पूर्ण करणारा आहे.जेव्हा येशूकडे आपण पाहतो तेव्हा आपण गर्विष्ठ असणे अशक्य आहे. जेव्हा एखादा इतरांकडे पाहू लागतो आणि कल्पना करतो की स्वतः त्यांच्यापेक्षा जास्त चांगला आहे किंवा त्यांच्यापेक्षा त्याच्यावर देवाचा अधिक अभिषेक आहे किंवा त्याचा देवाने इतरांपेक्षा जास्त वापर केला आहे इत्यादी, तेव्हा तो गर्विष्ठ होतो. पण जर त्याने येशूकडे वर पाहिले तर तो पश्चात्तापाने त्याचा चेहरा धुळीत लपवेल- ज्याप्रमाणे पात्म बेटावर प्रेषित योहानाने केले. आणि जर तो येशूकडे पाहत राहिला तर तो आपला चेहरा कायम धुळीत ठेवेल. आपण सर्वांनी आपले चेहरे नेहमी धुळीत ठेवायला शिकले पाहिजे. ते सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे आयुष्य संपेपर्यंत देवाने तुमच्यावर प्रसन्न राहावे अशी तुमची इच्छा असेल तर वरच्या दिशेने पाहत राहा. आपण कधीही स्वतःकडे प्रथम पाहू नये. आपण नेहमी वरच्या दिशेने प्रथम पाहिले पाहिजे. आपण येशूकडे पाहिले पाहिजे आणि त्याचे गौरव पाहताना आपल्याला आपले पाप दिसेल. आपले पाप पाहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे; अन्यथा आपण निराश होऊ.

३ .पुढे पाहणे (अनुवाद ३२-३३)

आपण पुढेही पाहिले पाहिजे - विश्वासाने. देवाकडे आपल्यासाठी अद्भुत गोष्टी आहेत. आम्हांला करण्यासाठी त्याच्याकडे खूप मोठे काम आहे. आपल्याला हे जग कधी सोडावे लागेल हे आपल्याला माहीत नाही. पण प्रभू येण्याआधी आपण या पृथ्वीवर त्याच्यासाठी काहीतरी उपयुक्त करण्याची आशा बाळगतो. जगातील बहुतेक लोक भविष्याकडे भीतीने आणि चिंतेने पाहतात. पण आपण विश्वासाने पुढे पाहत आहोत. देवाने मोशेला अनुवादात इस्राएल लोकांनी कनानमध्ये राहण्याच्या काळाकडे पाहण्यास सांगितले. त्याने अनुवादात इस्राएलच्या दूरच्या भविष्याबद्दल भाकीत केले.