WFTW Body: 

माणसांची तुलना मेंढ्यांशी केली जाते. आणि मेंढ्यांमध्ये कोणताही प्रश्न न विचारता कळपाचे अनुसरण करण्याची प्रवृत्ती असते. परंतु येशू आला आणि त्याने आपल्याला देवाच्या वचनाद्वारे प्रत्येक गोष्टीची परीक्षा करायला शिकवले. परुश्यांनी मानवी परंपरांना महत्त्व दिले. येशूने देवाच्या वचनाला महत्त्व दिले. आपण देवाच्या प्रत्येक वचनानुसार जगले पाहिजे – आणि देवाच्या वचनाच्या विरोधात असलेल्या प्रत्येक मानवी परंपरेचा त्याग केला पाहिजे (मत्तय ४:४).

येशूचा परुश्यांशी सतत युगायुगांचा संघर्ष चालू होता, तो म्हणजे देवाच्या वचना विरुद्ध मानवी परंपरा. आज मंडळीमध्ये आपणही त्याच संघर्षात गुंतलो आहोत. देवाचे वचन हाच या पृथ्वीवर आपल्यासाठी असलेला एकमेव स्वर्गीय प्रकाश आहे. आणि जेव्हा देवाने पहिल्यांदा प्रकाशाची निर्मिती केली, तेव्हा त्याने लगेचच त्याला अंधारापासून वेगळे केले. अंधार म्हणजे पाप आणि मानवी परंपरा दोन्ही आहेत. म्हणून आपण पाप आणि मानवी परंपरा या दोन्ही गोष्टींना देवाच्या शुद्ध वचनापासून वेगळे केले पाहिजे – जेणेकरून मंडळी मध्ये कोणताही गोंधळ होणार नाही.

नाताळ
नाताळचे उदाहरण घ्या , जो अनेकांकडून येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व धर्मांचे दुकानदार नाताळ या सणाची आतुरतेने वाट पाहतात, कारण ही अशी वेळ आहे जेव्हा ते खूप नफा कमवू शकतात. हा एक व्यावसायिक उत्सव आहे – आध्यात्मिक नाही. ख्रिसमस कार्ड्स आणि भेटवस्तूंवर लाखो डॉलर्स/रुपये खर्च केले जातात. या काळात दारूच्या विक्रीतही वाढ होते.

मग हा खरोखरच देवाच्या पुत्राचा वाढदिवस आहे की 'दुसऱ्या येशूचा ?
सर्वप्रथम आपण देवाच्या वचनाकडे पाहूया. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, ज्या रात्री येशूचा बेथलहेममध्ये जन्म झाला, त्या रात्री यहुदियाच्या शेतात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसोबत होते (लूक २:७-१४). इस्राएलमधील मेंढपाळ ऑक्टोबरनंतर आणि फेब्रुवारीपर्यंत रात्री आपल्या कळपांना मोकळ्या शेतात ठेवत नसत – कारण या महिन्यांत तेथील हवामान पावसाळी आणि थंड दोन्ही प्रकारचे असे. त्यामुळे खरा येशू मार्च ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान कधीतरी जन्माला आला असावा. मग २५ डिसेंबर हा 'दुसऱ्या येशूचा वाढदिवस असला पाहिजे, ज्याला धर्मांतर न झालेल्या लोकांनी सहज विश्वास ठेवणाऱ्या अश्या ख्रिस्ती लोकांवर लादला आहे!

याशिवाय, जरी आपल्याला येशूच्या जन्माची नेमकी तारीख माहित असती, तरीही प्रश्न हाच राहिला असता की देवाला त्याच्या मंडळीणे तो साजरा करावा असे अभिप्रेत होते का. येशूची आई मरीया हिला येशूच्या जन्माची नेमकी तारीख नक्कीच माहित असेल . आणि पेन्टेकॉस्टच्या दिवसानंतर ती अनेक वर्षे प्रेषितांसोबत होती. तरीही, येशूच्या जन्मदिनाचा उल्लेख कुठेही आढळत नाही. हे काय दर्शवते ? हेच की, देवाने येशूच्या जन्माची तारीख जाणीवपूर्वक लपवली, कारण मंडळीणे तो दिवस साजरा करावा असे त्याला वाटत नव्हते. येशू हा काही सामान्य मर्त्य माणूस नव्हता, ज्याचा वाढदिवस वर्षातून एकदा साजरा केला जावा. तो देवाचा पुत्र होता, 'ज्याचा जन्मदिवस अथवा आयुष्याचा शेवट नाही’. (इब्रीकरास पत्र ७:३). देवाला असे वाटते की आपण येशूचा जन्म, मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण वर्षातून एकदाच नव्हे, तर दररोज कबूल करावे .

जुना आणि नवीन करार यांच्यातील फरकाची समज आपल्याला हे समजून घेण्यास मदत करेल की देव आता आपल्या मुलांना कोणतेही विशेष 'पवित्र दिवस' साजरे करण्यास का सांगत नाही. जुन्या कराराअंतर्गत, इस्राएलला काही दिवस विशेष पवित्र दिवस म्हणून साजरे करण्याची आज्ञा देण्यात आली होती. पण ते केवळ एक छाया होती. आता ख्रिस्त आल्यामुळे, देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस समान पवित्र असावा. नवीन कराराअंतर्गत, साप्ताहिक शब्बाथ देखील रद्द करण्यात आला आहे. म्हणूनच नवीन करारामध्ये कोणत्याही पवित्र दिवसांचा उल्लेख कुठेही आढळत नाही (कलस्सैकरास पत्र २:१६,१७).

मग नाताळ या सणाने ख्रिस्ती धर्मात प्रवेश कसा केला? उत्तर हे आहे: ज्याप्रमाणे सैतानाच्या सूक्ष्म कार्यामुळे आणि मनपरिवर्तन न झालेल्या लोकांद्वारे बालदीक्षा, दशांश, पौरोहित्य, पगारदार पाळक आणि इतर अनेक मानवी परंपरा आणि जुन्या करारातील प्रथांनी प्रवेश केला, त्याचप्रमाणे नाताळ या सणाने ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला .

जेव्हा चौथ्या शतकात सम्राट कॉन्स्टँटिनने ख्रिस्ती धर्माला रोमचा राजधर्म बनवले, तेव्हा अनेक लोक ख्रिस्ती झाले - त्यांच्या हृदयात कोणताही बदल न होता केवळ 'नावापुरते' ते ख्रिस्ती झाले . आणि म्हणून, त्यांना त्यांचे दोन मोठे वार्षिक मूर्तिपूजक सण सोडायचे नव्हते -जे दोन्ही त्यांच्या सूर्योच्या उपासनेशी संबंधित होते. एक - सूर्यदेवाचा वाढदिवस जो २५ डिसेंबर रोजी असे, जेव्हा दक्षिण गोलार्धात गेलेला सूर्य आपला परतीचा प्रवास सुरू करत असे तो दिवस (हिवाळी संक्रांती). दुसरा होता मार्च/एप्रिलमधील वसंतोत्सव, जेव्हा ते हिवाळा संपण्याचा आणि त्यांच्या सूर्यदेवाने आणलेल्या उबदार उन्हाळ्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करत असत. त्यांनी त्यांच्या सूर्यदेवाला 'येशू' असे नाव दिले आणि त्यांचे दोन मोठे सण साजरे करणे सुरूच ठेवले, आणि त्यांना नाताळ आणि ईस्टर असे ख्रिस्ती सण म्हणून नाव दिले!!

आजच्या नाताळाच्या प्रथा युरोपमधील ख्रिस्ती काळापूर्वीच्या काळापासून विकसित झाल्या आहेत – आणि त्या मूर्तिपूजक, धार्मिक प्रथा, तसेच दंतकथा आणि परंपरांमधून आल्या आहेत. ख्रिस्ताच्या जन्माची नेमकी तारीख आणि वर्ष कधीही समाधानकारकरीत्या निश्चित झाले नाही; परंतु जेव्हा इ.स. ४४० मध्ये चर्चच्या धर्मगुरूंना हा सोहळा साजरा करण्यासाठी एक तारीख निश्चित करायची होती, तेव्हा त्यांनी हिवाळी संक्रांतीचा दिवस निवडला, जो त्या काळातील लोकांच्या मनात पक्का रुजलेला होता – आणि तो त्यांचा सर्वात महत्त्वाचा सण होता. जसजसा ख्रिस्ती धर्म मूर्तिपूजक देशांतील लोकांमध्ये पसरला, तसतसे हिवाळी संक्रांतीच्या उत्सवातील अनेक प्रथा ख्रिस्ती धर्माच्या प्रथांमध्ये सामील होऊ लागल्या.

'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका' (धर्मनिरपेक्ष इतिहासावरील एक अधिकृत संदर्भग्रंथ) नाताळ सण कसा सुरू झाला याबद्दल खालीलप्रमाणे सांगते:

“प्राचीन रोमन उत्सव सॅटर्नलिया कदाचित नाताळाच्या आधुनिक उत्सवाशी सर्वात मिळता जुळता आहे . हा उत्सव हिवाळी संक्रांतीच्या सुमारास होत असे आणि तो पेरणीच्या हंगामाच्या समाप्तीचे प्रतीक होता. अनेक दिवस खेळ, मेजवान्या आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होत असे, आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी काम आणि व्यवसाय बंद ठेवले जात असे. शेवटच्या दिवसांमध्ये मेणबत्त्या, मेणाच्या फळांच्या प्रतिकृती आणि मेणाच्या लहान मूर्ती भेट म्हणून देण्याची प्रथा होती. सॅटर्नलियाचा प्रभाव नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवांवर थेट पडला आहे. नंतर नाताळ हा 'अजिंक्य सूर्याच्या' वाढदिवसानिमित्त साजरा केला जाऊ लागला, जो एक दुसरा रोमन उत्सव होता, त्यामुळे या हंगामाला सौर पार्श्वभूमी मिळाली आणि तो रोमन नवीन वर्षाशी जोडला गेला, जेव्हा घरे हिरवळीने आणि दिव्यांनी सजवली जात असत आणि मुलांना व गरिबांना भेटवस्तू दिल्या जात असत.”
(https://www.britannica.com/topic/Winter-Holidays)

या मूर्तिपूजक प्रथा निम्रोदने सुरू केलेल्या बॅबिलोनियन धर्मातून उगम पावल्या (उत्पत्ति १०:८-१० पहा). परंपरेनुसार, निम्रोदच्या मृत्यूनंतर, त्याची पत्नी सेमिरॅमिसला एक अनौरस अपत्य झाले, ज्या बद्दल नंतर तिने असा दावा केला की निम्रोदच पुन्हा जिवंत होऊन परत आला आहे. अशा प्रकारे आई आणि मुलाच्या पूजेची सुरुवात झाली, जी शतकांनंतर नाममात्र ख्रिश्चनांनी 'मेरी आणि येशू' यांच्याकडे हस्तांतरित केली. या बाल-देवतेचा वाढदिवस प्राचीन बॅबिलोनियन लोक २५ डिसेंबर रोजी साजरा करत असत . सेमिरामिस ही स्वर्गाची राणी होती (यिर्मया ४४:१९), जिची शतकानंतर इफिस शहरात डायना आणि आर्टेमिस म्हणून पूजा केली जात होती (प्रेषितांची कृत्ये १९:२८).

सेमिरामिसने दावा केला की एका मृत झाडाच्या बुंध्यातून रातोरात एक पूर्ण वाढलेले सदाहरित झाड उगवले. हे निम्रोदच्या पुनरुज्जीवनाचे आणि मानवासाठी स्वर्गाच्या देणग्या आणण्याचे प्रतीक होते. अशा प्रकारे देवदार वृक्ष तोडून त्यावर भेटवस्तू टांगण्याची प्रथा सुरू झाली. आणि हेच ख्रिसमस ट्रीचे मूळ आहे!
देवाचे वचन की मानवी परंपरा?

नाताळच्या उत्सवामागे, देवाच्या वचनात कोणताही आधार नसतानाही, मानवी परंपरांचे पालन करण्याचे अधिक घातक तत्त्व दडलेले आहे. परंपरेची ही शक्ती इतकी प्रबळ आहे की, इतर क्षेत्रांमध्ये पवित्र शास्त्राचे पालन करणाऱ्या अनेक विश्वासणाऱ्यांनासुद्धा नाताळ साजरा करणे सोडणे कठीण जाते.

हे आश्चर्यकारक आहे की अनेक विश्वासणारे ते स्वीकारायला तयार नाहीत, जे धर्मनिरपेक्ष लेखकांनी (जसे की वर उद्धृत केलेल्या 'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका'च्या लेखकांनी) स्पष्टपणे समजून घेतले आहे – की नाताळ हा मुळात एक मूर्तिपूजक सण आहे. फक्त नाव बदलल्याने हा सण ख्रिस्ती होत नाही!

जसे आम्ही सुरुवातीला सांगितले, येशू याच मुद्द्यावरून- मानवी परंपरा विरुद्ध देवाचे वचन- परुश्यांशी सतत संघर्ष करत होता -. पापाविरुद्ध उपदेश करण्यापेक्षा 'पित्यांच्या' पोकळ परंपरांना विरोध केल्यामुळे त्याला अधिक विरोधाचा सामना करावा लागला. जर आपण त्याच्याइतकेच विश्वासू राहिलो, तर आपला अनुभवही तसाच असेल.

केवळ देवाचे वचनच आपले मार्गदर्शक आहे - धार्मिक पुरुष जे देवाच्या वचनाचे काही क्षेत्राणमध्ये पालन करत नाही त्यांचे उदाहरणही नाही. "देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो" (रोमकरास पत्र ३:४). बेरियाच्या लोकांनी पौलाच्या शिकवणीची खात्री करण्यासाठी पवित्र शास्त्राचा शोध घेतला, आणि पवित्र आत्म्याने त्यासाठी त्यांची प्रशंसा केली (प्रेषितांची कृत्ये १७:११). हे आपल्या सर्वांसाठी अनुकरण करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे.

दाविद देवाच्या मनासारखा माणूस होता. तरीही, चाळीस वर्षे त्याने इस्राएल लोकांना मोशेच्या पितळी सापाची पूजा करण्याची परवानगी दिली, हे न ओळखता की ती देवाला घृणास्पद गोष्ट होती. अशा उघड मूर्तीपूजेबद्दलही त्याला काही ज्ञान नव्हते. हेझेकीया नावाचा एक सामान्य राजा होता, ज्याने ही मूर्तीपूजेची प्रथा उघडकीस आणली आणि नष्ट केली (२ राजे १८:१-४). आपण देवाच्या माणसांच्या पवित्र जीवनाचे अनुकरण करू शकतो, परंतु मानवी परंपरांबद्दलच्या त्यांच्या अज्ञानाचे नाही. आपले संरक्षण केवळ देवाच्या वचनाच्या शिकवणीचे पालन करण्यात आहे, त्यात काहीही जोडण्यात किंवा त्यातून काहीही कमी करण्यात नाही.

इतरांचा न्याय करू नका

शेवटी: नाताळ साजरा करणाऱ्या प्रामाणिक विश्वासणाऱ्यांबद्दल आपली वृत्ती कशी असावी?

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केवळ नाताळ साजरा न केल्याने आपण आध्यात्मिक होत नाही. आणि जे हा सण साजरा करतात, ते त्यामुळे शारीरिक वृत्तीचे विश्वासणारे ठरत नाहीत. आध्यात्मिक लोक ते आहेत जे दररोज स्वतःचा त्याग करून आणि दररोज पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन येशूच्या मार्गावर चालतात – मग ते नाताळ साजरा करोत वा न करोत.

त्यामुळे, जेव्हा आपण हे सण साजरे करणाऱ्या विश्वासनाऱ्याना भेटतो, तेव्हा आपण इतके कृपाळू असले पाहिजे की, आपण हे समजून घेतले पाहिजे की त्यांना या सणाचे मूर्तिपूजक मूळ माहीत नसल्यामुळे त्यानी तो साजरा केला असेल. आणि म्हणूनच, ते तो साजरा करताना कोणत्याही प्रकारे पाप करत नाहीत. दुसरीकडे, जर आपण त्यांचा न्याय केला, तर आपण पाप करत असू – कारण आपल्याला सत्य माहीत आहे.

२५ डिसेंबर हा सहसा सर्वांसाठी सुट्टीचा दिवस असतो आणि त्याच्या आसपासचे दिवसही शाळांसाठी सुट्टीचे असतात, त्यामुळे बरेच लोक हा काळ वर्षाच्या शेवटी कौटुंबिक भेटीगाठींसाठी वापरतात – जी एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि काही लोक फक्त २५ डिसेंबर रोजीच मंडळीत उपासनेसाठी उपस्थित राहतात – म्हणून या तारखेला मंडळीमध्ये उपासना असणे चांगले आहे, जेणेकरून ते अशा लोकांना सुवार्ता सांगू शकतील आणि त्यांना समजावून सांगू शकतील की येशू लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी पृथ्वीवर आला आणि त्याने आपल्यासाठी मृत्यूवर आणि सैतानावर विजय मिळवला.

ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीच्या काळात, काही ख्रिस्ती शब्बाथ साजरा करत असत – जो नाताळा प्रमाणेच एक गैर-ख्रिस्ती यहुदी धार्मिक सण होता. म्हणूनच पवित्र आत्म्याने पौलाला रोमकारास पत्र १४ वा अध्याय लिहिण्याची प्रेरणा दिली, जेणेकरून इतर ख्रिस्ती लोक त्यांचा न्याय करण्याचे पाप करणार नाहीत. हाच इशारा अश्यासाठीही लागू होतो जे नाताळ साजरा करणाऱ्यांचा न्याय करतात .

"ज्याचा विश्वास कमजोर आहे, त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतांवर न्याय करण्यासाठी नाही. तू दुसऱ्याच्या सेवकाचा न्याय करणारा कोण आहेस? एक जण एका दिवसाला दुसऱ्या दिवसापेक्षा श्रेष्ठ मानतो, तर दुसरा प्रत्येक दिवसाला सारखेच मानतो. जो दिवस पाळतो, तो प्रभूसाठी पाळतो, कारण तो देवाचे आभार मानतो; आणि जो पाळत नाही, तोही प्रभूसाठीच पाळत नाही आणि देवाचे आभार मानतो. प्रत्येकाने आपल्या मनात पूर्णपणे खात्री करून घेतली पाहिजे. पण तू, तू आपल्या भावाचा न्याय का करतोस? किंवा पुन्हा तू , आपल्या भावाकडे तुच्छतेने का पाहतोस? कारण आपण सर्वजण देवाच्या न्यायसनासमोर उभे राहू आणि आपल्यापैकी प्रत्येक जण (एकटाच) देवापुढे आपला हिशोब देईल" (रोमकरास पत्र १४:१२)

आणि नाताळाविषयीच्या अभ्यासाचा समारोप करण्यासाठी हेच सर्वोत्तम वचन आहे .