WFTW Body: 

"............ ज्याने तटाची भिंत बांधावी आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभे राहावे अशा मनुष्याला मी त्यांच्यामध्ये शोधले, परंतु मला असा कोणी सापडला नाही ."(यहेज्केल २२:३०) जगाच्या, इस्रायलच्या आणि मंडळीच्या इतिहासात देव अनेकदा विशिष्ट परिस्थितीत केवळ एका मनुष्यावर आपले हेतू पूर्ण करण्यासाठी कसा अवलंबून राहिला आहे याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. पण देवाबरोबरचा एक माणूस नेहमीच अधिक असतो.

नोहा : जेव्हा संपूर्ण जग देवाविरुद्ध दुष्टतेने आणि बंडाने भरलेले होते, तेव्हा नोहाच्या काळात पृथ्वीवर आठ देवभीरु लोक असले तरी देवाच्या उद्देशांची पूर्तता पूर्णपणे नोहा या एका माणसाच्या विश्वासूपणावर अवलंबून होती. त्या वेळी देवाच्या नजरेत कृपा पावणारा नोहा हा एकमेव माणूस होता (उत्पत्ति ६:८). जर त्या एका माणसाने देवाशी विश्वासघात केला असता, तर संपूर्ण मानवजातीचा नाश झाला असता आणि आज आपल्यापैकी कोणीही जिवंत नसते!! नोहा विश्वासू राहिला याबद्दल आपण देवाचे नक्कीच आभार मानू शकतो.

मोशे : इस्राएली लोक इजिप्तमध्ये असताना त्याला देवाचे प्रतिनिधित्व करण्यास योग्य असा माणूस मिळेपर्यंत देव त्यांना त्यांच्या गुलामगिरीपासून मुक्त करू शकत नव्हता. आणि असा माणूस तयार होईपर्यंत देव वाट पाहण्यास तयार होता. एकदा मोशे केवळ ४० दिवस इस्राएली लोकांपासून दूर होता, तेव्हा त्यातील सर्व २० लाख लोक भरकटले (निर्गम ३२). एकदा देवाचा माणूस त्या ठिकाणापासून दूर गेला तेव्हा , संपूर्ण राष्ट्राला, खऱ्या देवाला सोडून मूर्तींची उपासना करण्यासाठी भरकटायला फक्त काही दिवस लागले.

यहोशवा : आपण असे वाचतो की "यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली" (शास्ते २:७). यहोशवाचा प्रभाव इस्राएली लोकांवर इतका शक्तिशाली होता की, त्याच्या हयातीत आणि त्याच्यासोबतच्या वडिलांच्या हयातीत मूर्तींची उपासना करण्याचे धाडस त्यांनी केले नाही. पण जेव्हा यहोशवा मरण पावला त्याचवेळी इस्रायल वाईटरित्या कुमार्गाकडे परत फिरला. 'देवाच्या एका माणसाच्या जीवनाचा असा प्रभाव असतो.'

एलीया : पवित्र शास्त्र एलीयाच्या संदर्भात म्हणते की, "नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.(याकोब ५:१७,१६). एका माणसाने एकहाती संपूर्ण राष्ट्राला देवाकडे वळवले, दुष्टतेच्या शक्तींचा पराभव केला आणि बालाच्या सर्व संदेष्ट्यांना ठार मारले.

अलीशा : एलीयाच्या काळात पन्नास "संदेष्ट्यांची मुले" (पवित्र शास्त्र -शाळेतील विद्यार्थी) होती, जे एक दिवस इस्रायलमध्ये संदेष्टा होण्याची आशा बाळगून होते. पण देवाच्या आत्मा त्या सर्वांना बाजूला सारून अलीशावर आला, जो "संदेष्ट्याचा मुलगा" नव्हता (२ राजे २:७,१५). अलीशा इस्रायलमध्ये फक्त एक सेवक म्हणून ओळखला जात होता - "जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे" (२ राजे ३:११).

दानीएल : देवाला जेव्हा यहुद्यांना बाबेलमधून यरुशलेममध्ये आणायचे होते, तेव्हा त्याला एका माणसाची गरज होती. त्याला दानीएल सापडला. दानीएल त्याच्या तारुण्यापासून विश्वासू होता आणि त्याने प्रत्येक परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण केली होती. बाबेलमध्ये किशोरवयीन असताना त्याने परमेश्वरासाठी ठाम भूमिका घेतली. "त्याने आपल्या मनात निश्चय केला की तो स्वत: ला विटाळ होऊ देणार नाही" (दानीएल १:८) - सर्व तरुणांना लक्षात ठेवण्यासाठी एक चांगले वचन. तर इतर सर्व यहूदी तरुण राजाच्या भीतीने राजाच्या मेजावर दिले जाणारे अन्न (देवाने लेवीयमध्ये जे अन्न निषिद्ध केले होते) सहजपणे खात होते, तर एकट्या दानीएलाने ते खाण्यास नकार दिला. त्या दिवशी त्या मेजावर आणखी तीन तरुण होते, ज्यांनी दानीएलाला ठाम भूमिका घेताना पाहिले आणि त्याला सामील झाले. त्यानंतर दानीएल आणि ते तीन पुरुष बाबेलमध्ये देवासाठी एक शक्तिशाली प्रभाव बनले.

पौल : पौलाने इतर कोणत्याही मंडळीपेक्षा इफिसमध्ये जास्त वेळ घालवला. दररोज ३ वर्षे तो तेथील प्रत्येकांस देवाचा बोध करत असे (प्रेषितांची कृत्ये २०:३१). सर्व मंडळ्यांमध्ये ही सर्वांत भाग्यशाली होती . पौलाने त्यांना लिहिलेल्या पत्रातील शिकवणुकीचा उच्च दर्जा हे दर्शवतो की ती आध्यात्मिक विचारसरणीचीदेखील मंडळी होती. जर त्या काळात अशी एक मंडळी असती जिथे विश्वासणाऱ्यांनी नवीन कराराच्या जीवनात मोठ्या संख्येने प्रवेश केला असता, तर ती इफिस येथील मंडळी असायला हवी होती. अरेरे, पण तसे नव्हते . तिथल्या वडिलांनीही अशा आयुष्यात प्रवेश केला नव्हता. पौल त्या वडिलांना सांगत होता, "मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील." (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०).जोपर्यंत पौल वैयक्तिकरित्या इफिस येथील मंडळीमध्ये उपस्थित होता, तोपर्यंत कोणताही लांडगा त्यात प्रवेश करू शकला नाही, कारण पौल कळपाचा सतर्क मेंढपाळ आणि प्रभूच्या घराचा कठोर द्वारपाल होता.

प्रत्येक पिढीत देवाला त्याच्या नावासाठी शुद्ध साक्षीची गरज असते. आणि तो आपल्या पिढीतही स्वतः ला साक्षीदाराशिवाय ठेवणार नाही. या पिढीत देवाला पूर्णपणे उपलब्ध असण्याची किंमत तुम्ही मोजणार का?