WFTW Body: 

हे वर्ष संपत असताना, आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करणे आणि ते कसे गेले आहे हे पाहणे आपल्यासाठी चांगले आहे. हग्गय संदेष्ट्याने त्याच्या काळातील लोकांना 'आपल्या मार्गांकडे लक्ष लावा' असे आवाहन केले. हग्गय १:५,६ मध्ये असे लिहिले आहे: आता, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, “ तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा ”.

“तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता, पण तुम्हास ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.” आपण वरील प्रश्न स्वतःला अशा प्रकारे लागू करू शकतो: परमेश्वर आपल्याला आव्हान देत म्हणतो की, “तुमच्या जीवनात गोष्टी कश्या चालल्या आहेत याचा विचार करा.”

आध्यात्मिक फलदायीता आली आहे का? तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण हाती थोडे लागले . तुम्ही अनेक सभांना गेला, अनेक ख्रिस्ती पुस्तके वाचली आणि अनेक ख्रिस्ती संदेश ऐकले , पण आज तुमचे घर एक देवाचे घर आणि शांतीचे घर आहे का? तुम्ही तुमच्या पत्नीवर/पतीवर ओरडण्यासारख्या साध्या गोष्टीवर मात केली आहे का? जर नसेल, तर तुम्ही पुष्कळ पेरणी केली असली तरी, तुमच्या हाती थोडे लागले आहे . तुम्ही कपडे घालता, पण तुम्हास अजूनही ऊब येत नाही. तुम्ही खूप पैसे कमावता, पण तुमच्या खिशाला छिद्रे आहेत आणि त्यामुळे त्यातील बहुतेक वाया जाते .

देवासाठी काहीही अशक्य नाही - आपण वारंवार आणि दयनीय प्रकारे अयशस्वी झाल्यानंतरही, आपल्याला त्याच्या परिपूर्ण इच्छेत आणणे हे देखील अशक्य नाही. केवळ आपला अविश्वासच त्याला अडथळा आणू शकतो. जर तुम्ही म्हणालात, "पण मी अनेक वेळा चुका केल्या आहेत . आता देवाला मला त्याच्या परिपूर्ण योजनेत आणणे अशक्य आहे", तर ते देवासाठी अशक्य होईल, कारण तो तुमच्यासाठी काय करू शकतो यावर तुमचा विश्वास नाही. पण येशू म्हणाला की देवाला आपल्यासाठी कुठलीही गोष्ट करणे अशक्य नाही - जर आपला विश्वास असेल तर .

“तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो”, हा सर्व बाबतीत देवाचा नियम आहे (मत्तय ९:२९). ज्यावर आपला विश्वास आहे तेच आपल्याला मिळेल. जर आपल्याला असे वाटत असेल की देव आपल्यासाठी एखादी गोष्ट करू शकत नाही, तर ते आपल्या जीवनात पूर्ण होणार नाही. नंतर , ख्रिस्ताच्या न्यायसिंहासनासमोर तुम्हाला हे कळेल की, तुमच्यापेक्षाही आपल्या आयुष्याची अधिक वाताहत केलेल्या एका दुसऱ्या विश्वासणाऱ्याने, त्याच्या जीवनात देवाच्या परिपूर्ण योजनेची पूर्तता केली - फक्त कारण त्याला विश्वास होता की देव त्याच्या जीवनाच्या तुटलेल्या तुकड्याना गोळा करून त्यातून काहीतरी 'अतिशय उत्तम' निर्माण करू शकतो. त्या दिवशी तुम्हाला किती पश्चात्ताप होईल, जेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनातील देवाच्या योजनेत अडथळा आणणारी तुमची अपयशं (ती कितीही असली तरी) नव्हती, तर तुमचा अविश्वास होता !

“सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला ” (१ योहान ३:८, ॲम्प्लिफाइड बायबल). त्या वचनाचा खरा अर्थ असा आहे की, सैतानाने आपल्या जीवनात बांधलेल्या सर्व गाठी सोडण्यासाठी येशू आला. याची कल्पना अशा प्रकारे करा की : जेव्हा आपला जन्म झाला, तेव्हा आपण असे समजा की देवाने आपल्या प्रत्येकाला दोऱ्याचा एक परिपूर्ण गुंडाळा दिला होता. जसजसे आपण दररोज जीवन जगू लागलो, तसे आपण तो दोऱ्याचा गुंडाळा उलगडू लागलो आणि त्यात गाठी मारू लागलो (पाप करून). आज अनेक वर्षे तो दोरा उलगडल्यानंतर , त्यात दिसणाऱ्या हजारो गाठी पाहून आपण निराश होतो. पण येशू “सैतानाने बांधलेल्या गाठी सोडवण्यासाठी” आला आहे. त्यामुळे ज्यांच्या दोऱ्यांमध्ये सर्वाधिक गाठी आहेत, त्यांच्यासाठीही आशा आहे.

प्रभू प्रत्येक गाठ सोडून तुमच्या हातात पुन्हा एकदा दोऱ्याचा एक परिपूर्ण गुंडाळा देऊ शकतो. हाच सुवार्तेचा संदेश आहे: तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकता. तुम्ही म्हणाल, “हे अशक्य आहे!”. ठीक आहे, तर तुमच्या विश्वासाप्रमाणेच तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या बाबतीत ते अशक्यच राहील. पण मी एका दुसऱ्या व्यक्तीबद्दल एकतो , ज्याचे आयुष्य तुमच्यापेक्षाही वाईट आहे, तो म्हणत आहे, “होय, मला विश्वास आहे की देव माझ्यामध्ये हे करेल”. त्याच्या बाबतीतही त्याला त्याच्या विश्वासाप्रमाणेच प्राप्त होईल. त्याच्या जीवनात देवाच्या परिपूर्ण योजनेची पूर्तता होईल.

जर तुमच्या जीवनातील सर्व अपयशांबद्दल तुमच्या मनात ईश्वरी दुःख असेल तर- जसे जुन्या करारात वचन दिले आहे (यशया १:१८) तुमची पापे जरी किरमिजासारखी तांबडी असली किंवा लाखे सारखी लालभडक असली तरी, ती केवळ बर्फासारखी शुभ्र होतील असेच नाही, तर नवीन करारात देव वचन देतो की, "तो तुमच्या पापांची यापुढे आठवण ठेवणार नाही" (इब्रीकरास पत्र ८:१२). तुमच्या चुका किंवा अपयश काहीही असोत, तुम्ही देवाबरोबर एक नवीन सुरुवात करू शकता. आणि जरी तुम्ही भूतकाळात हजारो वेळा नवीन सुरुवात केली असेल आणि त्यात अयशस्वी झाला असाल, तरीही तुम्ही आज १००१ वी नवीन सुरुवात करू शकता. देव अजूनही तुमच्या जीवनातून काहीतरी गौरवशाली निर्माण करू शकतो. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत आशा आहे. म्हणून, देवावर विश्वास ठेवण्यात कधीही कमी पडू नका. तो आपल्या अनेक मुलांसाठी अनेक महान कार्ये करू शकत नाही,याचे कारण त्यांनी भूतकाळात त्याला निराश केले आहे म्हणून नाही, तर ते आता त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून. तर चला, आपण "विश्वासात दृढ राहून देवाला गौरव देऊया" (रोम ४:२०), आणि आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टींसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये त्याच्यावर विश्वास ठेवूया. भूतकाळात कितीही अयशस्वी झाला असाल तरीही सर्व लोक - तरुण आणि वृद्ध - आशा बाळगू शकता, फक्त त्यांनी आपल्या चुका मान्य कराव्यात , नम्र राहावे आणि देवावर विश्वास ठेवावा.