WFTW Body: 

सार्वकालिक जीवन म्हणजे देवाला आपला पिता आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू, तारणारा व अग्रगामी असे ओळखणे होय (योहान १७:३). जर तुम्हाला स्थिर ख्रिस्ती जीवन जगायचे असेल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याशी व येशूशी जवळीक वाढवली पाहिजे. मागे घसरण्यापासून ते सर्वात मोठे संरक्षण आहे.

उत्तेजन देणारे संदेश ऐकणे पुरेसे नाहीत; मग ते देवाकडून अभिषिक्त झालेले शब्द असले तरीसुद्धा. स्वर्गातून पडलेल्या मान्नातही २४ तासांच्या आत किडे पडू लागले व दुर्गंधी येऊ लागली (निर्गम १६:२०). २४ तासात आपल्या ख्रिस्ती जीवनातला ताजेपणा नाहीसा होणे आणि ते शिळे होणे हे सोपे आहे!! पण हाच मान्ना जेव्हा कोशात (निवासमंडपातील परमपवित्र स्थानात) देवाच्या सान्निध्यात ठेवण्यात आला, तेव्हा इस्राएली लोक अरण्यात भटकत होते त्या सर्व ४० वर्षांपर्यंत आणि त्यानंतर कनानमध्ये शेकडो वर्षे त्याच्यात किडे पडले नाही किंवा दुर्गंधीही आली नाही(निर्गम १६:३३, इब्री ९:४). आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ताजी टवटवीत ठेवणे हेच परमेश्वराच्या उपस्थितीचे सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही परमेश्वराबद्दल (सभांमध्ये आणि इंटरनेट द्वारे) दुसऱ्याकडून मिळवलेली जी माहिती ऐकता, ती परमेश्वरासमोर नेली पाहिजे आणि तिचे रूपांतर प्रत्यक्ष परमेश्वराकडून त्याच्या वचनाद्वारे मिळालेल्या ज्ञानात केले पाहिजे.

मत्तय ११:२७-२९ मध्ये येशू आपल्याला सांगतो की, येशूने पित्याला आपल्यासमोर प्रगट केल्याशिवाय आपण पित्याला ओळखू शकत नाही. हे प्रकटीकरण प्राप्त करण्यासाठी, तो आपल्याला त्याच्याकडे येण्याचे आणि त्याचे जू (वधस्तंभ) आपल्यावर घेण्याचे आणि त्याच्याकडून सौम्यता आणि लीनता शिकण्याचे आमंत्रण देतो (ती सर्व ३ वचने एकत्रित वाचा ). येशूने आपल्याला त्याच्याकडून शिकण्यास सांगितलेल्या या दोनच गोष्टी आहेत. तेव्हा, या क्षेत्रांत खासकरून येशूचे वैभव पाहण्यासाठी तुम्ही वचनाकडे लक्ष दिले पाहिजे.

(१) सौम्यता. सर्वात आधी, येशूचा सौम्यपणा या गोष्टीवरून दिसून येतो की, तो नेहमी परूश्यांच्या विरोधात पापी लोकांची बाजू घेत असे. व्यभिचारात अडकलेल्या स्त्रीच्या बाबतीत आपण हे पाहतो (योहान ८:१-१२). आणि परूशी शिमोनाच्या घरात त्याच्या पायांवर तेलाचा अभिषेक करणाऱ्या पापी स्त्रीच्या बाबतीतही पाहतो (लूक ७:३६-५०). जोपर्यंत शिमोनाची त्या पापी स्त्रीबद्दल टीकात्मक मनोवृत्ती नव्हती तोपर्यंत येशू काहीही बोलला नाही. पण ज्या क्षणी येशूने पाहिले की शिमोनाने तिचा तिरस्कार केला आहे, त्याच क्षणी त्याने सौजन्य व देवाबद्दल प्रीती न बाळगल्याबद्दल त्याला फटकारले (लूक ७:४०-४७). जे पश्चात्ताप करणाऱ्या पापी लोकांवर टीका करत होते त्यांच्याबाबतीत येशू फार कठोर होता. तो नेहमी पश्चात्ताप करणाऱ्या पापी माणसाची बाजू पवित्र शास्त्राने वार करणाऱ्या परूश्यांच्या विरोधात घेतो. हे जाणून घेण्याने आम्हाला एक मोठा दिलासा आहे. हा सौम्यपणा आपण त्याच्याकडून शिकला पाहिजे.

येशूच्या सौम्यतेचा दुसरा पैलू, ज्यांनी त्याला दुखावले त्यांच्याप्रती असलेल्या क्षमाशील मनोवृत्तीत दिसून येतो. जेव्हा लोक त्याला भुतांचा अधिपती म्हणत, तेव्हा त्याने ताबडतोब म्हटले की त्यांना क्षमा करण्यात आली आहे (मत्तय १२:२४,३२). जेव्हा त्यांनी त्याची निंदा केली, तेव्हा त्याने त्यांना कधीही धमकावले नाही. तो फक्त शांत राहिला (१ पेत्र २:२३). येशूच्या सौम्यतेचा हा दुसरा पैलू आहे जो आपण शिकला पाहिजे. कटुता, सूड, राग किंवा अक्षम्य भावना याचा किंचितही विचार आपण झटकून टाकला पाहिजे, जसे की आपण आपल्या हातावर पडणारा सरडा किंवा झुरळ ताबडतोब झटकून टाकू.

(२) लीनता. मत्तयाच्या शुभवर्तमानातील पहिल्या सहा वचनांवरून, ज्या वंशातून येशूने जन्म घेण्याचे निवडले होते त्यावरून आपल्याला येशूच्या लीनतेची एक गोष्ट दिसून येते . यहूदी वंशावळींमध्ये सहसा स्त्रियांच्या नावाचा उल्लेख आढळत नाही. पण चार स्त्रियांचा इथे उल्लेख आहे - तामार, राहाब, रूथ आणि बथशेबा. तामार ही ती होती जिने आपला सासरा यहुदाशी व्यभिचार करून मुलास जन्मास घातले (उत्पत्ती ३८). राहाब ही यरीहो येथील एक परिचित वेश्या होती (यहोशवा २). रूथ मवाबी होती - मवाबाची वंशज होती जो अनाचाराद्वारे जन्माला आला होता - लोटाची मुलीने तिच्या वडिलांना तिच्याशी व्यभिचार करण्यास भाग पाडले (उत्पत्ती १९). आणि बथशेबा ती होती जिने दाविदाशी व्यभिचार केला होता(२ शमुवेल ११). नव्या कराराच्या पहिल्याच परिच्छेदात या चार स्त्रियांची (जी सर्व नावे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक पापाशी संबंधित होती) का नमूद करण्यात आली आहेत? येशू पापी लोकांमध्ये ओळखला जाण्यासाठी व त्यांचे तारण करण्यासाठी जगात आला आहे हे दाखवण्यासाठी.

येशूची लीनता त्याने पृथ्वीवर केलेल्या सर्वसाधारण कामातून (सुतारकाम) आणि पृथ्वीवरील त्याच्या सबंध जीवनादरम्यान त्याने जी सेवक-मनोवृत्ती बाळगली होती त्यावरून दिसून येते. सेवक-वृत्ती म्हणजे जी सतत सतर्क असते, इतरांच्या गरजा शोधत असते आणि अशा गरजा पूर्ण करण्यासाठी तत्परतेने पुढे सरसावते (उदा. येशू शिष्यांचे पाय धुताना हे दिसून येते - योहान १३:४-५).

अँड्र्यू मरे यांच्या 'ह्यूमिलिटी' या पुस्तकात नम्रतेची व्याख्या अशी करण्यात आली आहे: "काहीही नसण्याची तयारी असणे, जेणेकरून देवच सर्वस्व असेल". हेच असण्यात येशूला आनंद मिळत असे. हे आपण त्याच्याकडून शिकले पाहिजे.
म्हणून येशूचे जू नेहमी आपल्या मानेवर घ्या आणि त्याच्याकडून सौम्यता व लीनता शिका. अशा प्रकारे तो पित्याला तुमच्यासमोर अधिकाधिक प्रकट करू शकेल.