WFTW Body: 

येशूने पैशाच्या बाबतीत आपल्याला एक उदाहरण दिले आहे ज्याचे त्याची सेवा करणाऱ्यांनी आणि सर्व मंडळ्यांनी अनुकरण केले पाहिजे.

जेव्हा येशूने वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत, सुतार काम केले तेव्हा त्याने आपली स्वतःची उपजीविका कमावली - प्रामाणिकपणे, कधीही कोणाची फसवणूक न करता आणि कधीही कर्जात न अडकता.

त्यानंतर, पुढील ३ १⁄२वर्षे तो पूर्ण-वेळेच्या सेवेत होता. या काळात त्याचे आर्थिक बाबींमध्ये काही कडक सिद्धांत होते. त्याच्या प्रेषितांनी या सिद्धांतांचे काटेकोरपणे व कठोरपणे पालन केले. मंडळी म्हणजे ख्रिस्ताचे शरीर आहे आणि म्हणूनच ख्रिस्ताच्या पहिल्या शरीराने (येशू स्वत:) ज्या सिद्धांतांचे पालन केले त्याच सिद्धांतांचे तिने पालन केले पाहिजे. सर्व मंडळ्या आणि ख्रिस्ती कार्यात गुंतलेल्या सर्वांनी त्याच सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.

ते सिद्धांत काय होते ?

सर्वांत प्रथम आणि महत्त्वाचे म्हणजे, येशू आपल्या पित्याचा सेवक असल्यामुळे, त्याने त्याच्या पित्यावरच पृथ्वीवरील गरजा भागवल्या जाण्यासाठी विश्वास ठेवला - जसे एखाद्या कंपनीसाठी काम करणारे कोणी त्या कंपनीने आपल्या आर्थिक गरजा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा करेल. म्हणून येशूने आपल्या पित्याशिवाय इतर कोणालाही त्याच्या आर्थिक गरजांबद्दल कधीच सांगितले नाही. त्याने कधीही आपल्या कार्याची जाहिरात केली नाही आणि कोणालाही, त्यांच्यांकडून साह्य मिळावे म्हणून काम करण्याबद्दलचे अहवाल दिले नाहीत. देवाने स्वतः काही लोकांना स्वेच्छेने येशूला भेट देण्यास प्रवृत्त केले - आणि अशा भेटी त्याने स्वीकारल्या. अशा प्रकारे मिळालेला पैसा ठेवण्यासाठी येशूने खजिनदार (यहूदा) नेमला.

लूक ८:२-३ पहा: “मग्दालीया नगराची मरीया, हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत.” आणि येशूने त्यांची भेट स्वीकारली.

दुसरे म्हणजे, येशू मिळालेले पैसे कसे खर्च झाले याबद्दल काळजी घेत होता. योहान १३:२९ मधून आपल्याला येशू आपल्या पैशांचा खर्च कसा करत होता हे समजते. जेव्हा त्याने यहूदाला तेथे काही सूचना दिल्या तेव्हा इतर प्रेषितांना वाटले की ज्याप्रमाणे येशू नेहमी आपले पैसे खर्च करीत असे त्याचप्रमाणे तो यहूदाला पैसे खर्च करण्यास सांगत आहे. ते असे होते की : (१) आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी; आणि (२) गरिबांना देण्यासाठी. आमचे पैसे खर्च करण्यासाठी ही नेहमीच आमची मार्गदर्शक तत्त्वे असायला हवीत.

प्रेषितांनी येशूच्या उदाहरणाचे अगदी बरोबर अनुकरण केले. त्यांच्या सर्व गरजा पुरवण्यासाठी त्यांनीही स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवला. म्हणून त्यांनी कोणालाही त्यांच्या वैयक्तिक गरजा किंवा त्यांच्या सेवेच्या आवश्यकतांबद्दल कधीच सांगितले नाही - तोंडी किंवा पत्राद्वारे ( की ज्यात त्यांच्या पैशाच्या आवश्यकतेबद्दल अप्रत्यक्षपणे सूचित केलेले असते ). जेव्हा जेव्हा प्रेषितांनी मंडळीला पैसे गोळा करण्याची विनंती केली तेव्हा ते नेहमीच गरीब विश्वासणाऱ्यांना वाटप करण्यासाठी होते - आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नव्हते (पहा करिंथकरांस दुसरे पत्र ८ आणि ९ आणि करिंथकरांस पहिले पत्र १६:१-३).

काही लोक तीमथ्याला पहिले पत्र ५:१७-१८ या वचनांचा चुकीचा संदर्भ घेतात आणि असे शिकवतात की पाळक आणि ख्रिस्ती सेवकांना चांगला पगार मिळाला पाहिजे. पण त्या वचनांत खरोखर काय म्हटले आहे?

“जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत. कारण शास्त्र म्हणते, “बैल मळणी करत असता त्याला मुसके बांधू नकोस,” आणि “कामकर्‍याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे."

ही वचने पैशाविषयी काहीही सांगत नाहीत, ती केवळ शिकवतात की जे वडील श्रम घेतात त्यांना त्यांच्या कळपात दुप्पट सन्मान मिळाला पाहिजे. जर हे वचन पैशांचा संदर्भ देत असते तर याचा अर्थ असा होईल की देव त्याच्या पुढाऱ्यांना, मंडळीमधील इतरांना मिळणाऱ्या पगाराच्या दुप्पट पगार देण्याची आज्ञा देत आहे. हे हास्यास्पद आहे! पौल खरेतर येथे विश्वासणाऱ्यांना त्यांच्या मंडळीमधील वडीलजनांबद्दल सन्मान राखण्यास व आदर करण्यास शिकवत होता. तो म्हणतो की , “जसे तुम्ही तुमच्या बैलाला मळणी करीत असताना धान्य खाण्यास देता तसे तुम्ही त्यांना मान द्या.” म्हणून आपण पाहतो की वडिलांचे प्राथमिक वेतन कळपाकडून मान (सन्मान आणि कृतज्ञता) असते - पैसा नव्हे.

हे पौलाने थेस्सलनीकांकरांस पहिले पत्र ५:१२-१३ मध्ये दिलेल्या बोधाप्रमाणेच आहे “तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा… आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा.” ( द मेसेज बायबल अनुवाद )

तथापि पौल करिंथकरांस पहिले पत्र ९:७-१८ या वचनांमध्ये ख्रिस्ती सेवकांच्या आर्थिक मदतीबद्दल बोलतो. तेथे तो म्हणतो: “द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध सेवन करत नाही असा कोण आहे? आम्ही तुमच्यात आध्यात्मिक गोष्टी पेरल्या, तर तुमच्याकडून आम्ही भौतिक गोष्टी घेतल्या तर हे जास्त आहे काय?”

पण पौल पुढे म्हणतो, “दुसरे लोक जर तुमच्यावरच्या ह्या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेषेकरून घेऊ नये काय? तथापि हा हक्क आम्ही बजावला नाही, एवढेच नव्हे, तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडथळा करू नये म्हणून आम्ही सर्वकाही सहन करतो.त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की, जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. मी तर ह्यांपैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही; कारण माझा हा स्वाभिमान कोणी व्यर्थ करावा त्यापेक्षा मी मेलेले बरे. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार! मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपवला आहे. तर मग माझे वेतन काय? ते हेच की, मी [ख्रिस्ताची] सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की, मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये ”

म्हणून पौलाने कधीही पगारासाठी किंवा भेटवस्तूंसाठी उपदेश केला नाही, तर “ख्रिस्तावरील त्याच्या प्रीतिमुळे” आणि “देवाने सुवार्तेच्या कारभारीपणाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती” म्हणून केला. त्याला इतरांना कोणत्याही शुल्काशिवाय मुक्तपणे सुवार्ता सांगायची होती, यासाठी की देव सुवार्ता ऐकण्याबद्दल लोकांकडून पैसे घेतो असे वाटू नये. आणि इतरांनी त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास सांगितले ( करिंथकरांस पहिले पत्र ११:१ आणि फिलिप्पैकरांस पत्र ३:१७ पहा).

म्हणून आपण पाहतो की नवीन करार असे शिकवितो की प्रभूचा सेवक त्याच्या गरजांसाठी भेटवस्तू घेऊ शकतो (येशूने स्वत: जसे केले) परंतु त्याच वेळी, आम्ही हे देखील पाहतो:

१) कोणत्याही ख्रिस्ती सेवकांना मासिक पगार कधीच देण्यात आला नव्हता. येशूने आपल्या शिष्यांना कधीही मासिक पगाराचे वचन दिले नाही. प्रेषितांना कधीही पगार मिळाला नाही. त्यांनी त्यांच्या स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवला की तो लोकांची अंतःकरणे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल (जसे येशूच्या बाबतीत झाले). त्यांच्या सेवाकार्यात सामर्थ्य मिळण्यासाठी असे विश्वासाचे जीवन जगणे आवश्यक होते. यामुळे ते धनाच्या लोभापासूनही वाचविले गेले.

2) जेव्हा अशा परिस्थितीत पौलाने पाहिले की या आर्थिक तरतुदींचा प्रचारकांकडून गैरवापर केला जात आहे तेव्हा त्याने कोणाकडूनही पैसे न घेण्याचे ठरवले तर स्वतःच स्वतःची उपजीविका कमावण्याचे त्याने ठरविले ज्यायोगे तो सांगत असलेल्या सुवार्तेच्या साक्षीचे रक्षण करेल. तो करिंथकरांस दुसरे पत्र ११:७-१३ ( द लिविंग बायबल) मध्ये म्हणतो: “मी देवाची सुवार्ता तुम्हांला विनामूल्य सांगितली. मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली. आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपले व जपेनही.जे मी करतो ते करत राहीन; अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात, त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे. त्यांना देवाने कधीच पाठवले नाही ; ते "बनावट" आहेत कारण अशा माणसांनी आपल्याला ते ख्रिस्ताचे प्रेषित आहेत असे भासवून फसवले आहे ."

आम्ही येथे पाहतो की पौलाने काही प्रसंगी भेटवस्तू स्विकारल्या - जेव्हा मासेदोनियामधील ख्रिस्ती लोकांनी (फिलिप्पै) स्वेच्छेने त्याला काही पैसे पाठविले. परंतु त्याने करिंथकर ख्रिस्ती लोकांकडून कधीही पैसे घेतले नाहीत (आम्ही वर पाहतो त्याप्रमाणे), कारण त्या ठिकाणच्या खोट्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांपेक्षा तो वेगळा आहे हे त्याला त्यांना दाखवायचे होते. पौलाने कधीही कोणासही आर्थिक मदतीसाठी विचारणा केली नाही - आणि त्याने कधीही त्याच्या आर्थिक गरजा सूचित केल्या नाहीत.

पौलाने थेस्सलनीकातील ख्रिस्ती लोकांकडूनही पैसे घेतले नाहीत. तो थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३:८-१०मध्ये म्हणतो: “आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले.

इफिसकर ख्रिस्ती लोकांकडूनही पौलाने अजिबात पैसे घेतले नाहीत. तो प्रेषितांची कृत्ये २०:३१‭-‬३५ मध्ये म्हणतो: “म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा. मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

पौलाप्रमाणेच प्रभूच्या प्रत्येक सेवकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो पैशाच्या संबंधात ख्रिस्ताची मनोवृत्ती प्रकट करेल.

देवाने रुजवलेल्या आमच्या सीएफसी मंडळींपैकी प्रत्येक (१५०हून अधिक) पुढारी / वडीलजन स्वतःच्या आर्थिक गरजा पुरवतात. त्यांपैकी कोणासही कधीच पगार मिळालेला नाही. ही नवीन कराराची पद्धत आमच्यासाठी आतापर्यंत ४७ वर्षे उत्तम प्रकारे चालली आहे (१९७५ पासून जेव्हा प्रथम सीएफसी मंडळी सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत - २०२२) - जगातील मोठी शहरे तसेच भारतातील सर्वांत गरीब खेड्यांमध्ये. आमच्या या भूमिकेने आम्हांला, पवित्र शास्त्र उद्धृत करणार्‍या आणि पैशासाठी लोकांचे शोषण करणार्‍या लोभी उपदेशकर्त्यांच्या शिरकावापासून वाचवले आहे.

ही वरील भूमिका नवीन कराराच्या वेळी प्रभूच्या सर्व सेवकांनी घेतली होती. पण ख्रिस्ती जग शतकानुशतके या मानकांपासून दूर गेले आहे. आज बरेच पाळक आणि उपदेशक लोकांना त्यांनी अधिकाधिक आर्थिक मदत करावी म्हणून आग्रह करतात आणि त्यांच्या प्रायोजकांना (सहसा धर्मांतराबद्दल चुकीच्या आकडेवारीसह), अधिकाधिक आर्थिक मदतीची अपेक्षा करत हेलावून टाकणारी पत्रे लिहितात.

ख्रिस्ती पुढाऱ्यांमधील पैशांबद्दलच्या या चुकीच्या मनोवृत्तीमुळे, आज बहुतेक ख्रिस्ती लोकांच्या सेवेतून देवाचा अभिषेक नाहीसा झाला आहे आणि बहुतेक प्रचारकांच्या सेवेत स्वर्गातून कोणतेही प्रकटीकरण झालेले नाही. कोणालाही देव आणि धनाची सेवा करता येत नाही (लूक १६:१३).

प्रभू म्हणाला की जे पैशाच्या बाबतीत विश्वासू आहेत त्यांनाच खरी संपत्ती दिली जाईल (लूक १६:११) - दैवी प्रकटीकरण आणि आत्म्याचा अभिषेक ही संपत्ती.

आपण आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे: प्रभूच्या सेवकाने कधीही अविश्वासणाऱ्याकडून किंवा त्याच्यापेक्षा गरीब असलेल्याकडून दान म्हणून पैसे स्विकारू नये. एखाद्या गरीब व्यक्तीने दिलेली कोणतीही भेट नेहमी मंडळीच्या दानपेटीमध्ये टाकली पाहिजे आणि स्वतःसाठी कधीही वापरली जाऊ नये.

आम्ही सीएफसी, बंगलोरमध्ये आमच्या दानपेटीच्यावर तपासण्याची अशी यादी आहेः
आपण पैसे देण्यापूर्वी, कृपया तपासा:

१. आपण नवा जन्म झालेले देवाचे मूल आहात काय?
२. तुमच्याकडे आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?
३. तुम्ही(गृह -कर्जाव्यतिरिक्त) कर्जमुक्त आहात का?
४. तुम्ही सर्व लोकांशी समेट केला आहे का?
५. तुम्ही आनंदाने देत आहात का ?

वरील मानकांचे पवित्र शास्त्रातील संदर्भ पाहण्यासाठी आपण खालील लिंकवर जाऊ शकता:
http://www.cfcindia.com/our-financial-policy

आम्ही याबाबतीत आमच्यापेक्षा भिन्न गोष्टी करणार्‍या अन्य मंडळ्यांचा किंवा उपदेशकांचा न्याय करीत नाही. हे आम्हांला परुशी बनवेल. पण आम्ही स्वतः, येशूच्या जीवनात आणि प्रेषितांच्या जीवनात ज्या मानकांना पाहतो त्या काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करतो.

ज्याला कान आहेत तो ऐको.

आमेन.