लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

कालवरीच्या क्रुसावर झालेल्या तीन क्षेत्रांतील दैवी अदलाबदलीविषयी मला तुम्हांला सांगू द्या - येशू आमच्यासाठी काय झाला आणि आता त्याचा परिणाम म्हणून आपण त्याच्यात काय होऊ शकतो.

(१)ख्रिस्त आमच्यासाठी पाप असे झाला यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे (२ करिंथ ५:२१).
विश्वासाने न्यायीपण मिळण्याचे हे गौरवशाली सत्य आहे - जे इतके नम्र आहेत की त्यांना जाणीव आहे की ते देवाच्या मापदंडाची पूर्तता करण्याइतपत कधीही नीतिमान बनू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही देवाची एक विनामूल्य भेट आहे. येशूने केवळ आपल्या पापांची शिक्षा भोगली नाही. प्रत्यक्षात तो पापही झाला. हा येशूसाठी किती भयंकर अनुभव होता हे आपल्याला पूर्णपणे समजत नाही कारण दुर्दैवाने आपण, डुक्कर जसे घाणीशी तसेच पापाशी परिचित झालो आहोत. येशूला पापाबद्दल वाटणारा तिटकारा काय होता हे पुसट समजून घेण्यासाठी, पूर्ण भरलेल्या मलाच्या टाकीमध्ये (सेप्टिक टॅन्क ) उडी मारून त्यातील मल आणि घाणीत कायमस्वरूपी मिसळण्याचा विचार करा. यावरून आपल्याला त्याची आपल्यावरील प्रीति किती खोल आहे याचे एक पुसट चित्र दिसून येते, ज्यामुळे तो ज्या गोष्टीचा तिरस्कार करत होता ते झाला, जेणेकरून आपण त्याच्यात देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे. देवाचे नीतिमत्त्व पृथ्वीवरील सर्वांत पवित्र मनुष्याच्या नीतिमत्त्वापेक्षा उंच आहे जितके आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे. पापहीन देवदूत देवाच्या चेह-याकडे पाहू शकत नाहीत (यशया ६:२,३). पण आपण ते करू शकतो, कारण आपण ख्रिस्तात आहोत. जेव्हा आपण पापाचा भयानकपणा पाहतो तेव्हा येशूला वधस्तंभावर खिळणाऱ्या गोष्टींचा आपण द्वेष करू लागतो. आणि आपण ख्रिस्तात काय झालो आहोत हे पाहिल्यावर आम्ही देवासमोर आमच्या परिपूर्ण स्वीकृतीत आनंदित होऊ.

(२) ख्रिस्त आपल्यासाठी दरिद्री झाला, की आपण धनवान व्हावे (२ करिंथ ८:९).
या वचनाच्या संदर्भावरून हे दिसून येते की ते भौतिक दारिद्र्य आणि भौतिक संपत्तीच्या संदर्भात बोलत आहे. ख्रिस्त एकेकाळी धनवान होता, असे हे वचन आपल्याला सांगते. “धनवान असणे म्हणजे काय”? धनवान असणे म्हणजे भरपूर पैसा आणि मालमत्ता असणे नव्हे, तर आपल्या गरजांसाठी पुरेसे आणि इतरांना मदत व आशीर्वादित करण्यासाठी काही अतिरिक्त असणे. आपल्या सर्वांकडे हेच असावे अशी देवाची इच्छा आहे. प्रकटीकरण ३:१७ मध्ये धनवान असण्याचे वर्णन "कशाचीही गरज नाही" असे करण्यात आले आहे. अशा प्रकारे देव धनवान आहे. देवाकडे चांदी, सोने, बँक खाते किंवा पाकीटही नाही.पण त्याला कशाचीही गरज नाही. जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा येशूही अशा प्रकारे धनवान होता. तो पाच हजार पुरुषांना खाऊ घालू शकत होता, स्त्रिया आणि मुले वेगळीच. आज फक्त एक धनवान माणूसच असे करू शकतो. त्याचा कर भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे होते. फरक एवढाच होता की, कर भरण्यासाठी माणसे आपल्या बँकांमधून पैसे काढतात, पण त्याने ते माशाच्या तोंडून काढले. गरिबांना देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे होते (योहान १३:२९). तो पृथ्वीवर गरीब नव्हता, कारण त्याला “कशाचीही गरज नव्हती”. पण तो क्रुसावर गरीब झाला. आपण पाहिलेल्या सर्वांत गरीब भिका-याच्या शरीराभोवती किमान एक फाटके वस्त्र असते. येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा येशूकडे तेही नव्हते. तो मेला तेव्हा तो खरोखरच गरीब होता. तो क्रुसावर गरीब का झाला? कारण आपण धनवान व्हावे - कारण आपल्या आयुष्यात केव्हाही आपल्याला “कशाचीही गरज असू नये ”. आपल्याला हवे असलेले सर्वच देण्याचे देवाने वचन दिलेले नाही. सुज्ञ पालकही आपल्या मुलांना मागितलेल्या सर्वच गोष्टी देत नाहीत. पण त्याने आपल्या सर्व गरजा पुरवण्याचे वचन दिले आहे. (फिलिप्पै ४:१९). जर आपण आधी देवाचे राज्य आणि त्याच्या नीतिमत्वाचा शोध घेतला तर या पृथ्वीवर आपल्याला आवश्यक असलेले सर्व काही आपल्याकडे असेल. (मत्तय ६:३३, २ पेत्र १:४).

(३) ख्रिस्त आपल्याबद्दल शाप झाला जेणेकरून आपल्याला अब्राहामाचा आशीर्वाद मिळावा (पवित्र आत्म्याचे अभिवचन) (गलती ३:१३, १४).
नियमशास्त्र न पाळण्यामुळे मिळालेल्या शापाचे वर्णन अनुवाद २८:१५-६८ मध्ये करण्यात आले आहे - गोंधळ, असाध्य आजार, मरी, सतत अपयश, आंधळेपणा, वेडेपणा, इतरांकडून शोषण केले जाणे, मुले शत्रूकडून (सैतान) पराजित होणे, सर्व वस्तूंची वाण इ. यांपैकी काहीही आपल्यासाठी नाही, कारण येशू आपल्याबद्दल शाप बनला. तथापि, लक्षात घ्या की, त्याबदल्यात आपल्याला दिलेला आशीर्वाद हा नियमशास्त्राचा आशीर्वाद नाही (अनुवाद २८:१-१४ मध्ये वर्णन केलेला) ज्यात भरपूर पैसा आणि अनेक मुले आहेत, तर अब्राहामाचा आशीर्वाद (उत्पत्ति १२:२,३ मध्ये वर्णन केलेला) आहे: प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी आशीर्वाद असे करतो. पवित्र आत्म्याने भरल्याने मिळणारा हा आशीर्वाद आहे - आपल्या आत उपळणारा आणि आपल्याला आशीर्वादित करणारा पाण्याचा एक झरा (योहान ४:१४) आणि आपल्यातून वाहणाऱ्या व इतरांना आशीर्वादित करणाऱ्या पाण्याच्या नद्या (योहान ७:३७-३९). परमेश्वराने अगदी सर्वांत वाईट पापी माणसाला दिलेले वचन असे आहे की, “भूतकाळात तो शापरूप ठरला असला तरीही, येणाऱ्या काळात तो एक आशीर्वाद ठरू शकतो ” (जखऱ्या ८:१३ मधील हे अद्भुत अभिवचन पाठ करा).

माझा असा विश्वास आहे की तुम्ही जिथे कोठे राहत असाल तिथे तुम्हांला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही आशीर्वाद व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तथापि, असे होण्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. शापाचा कोणताही भाग तुम्हाला स्पर्श करू शकत नाही यावर विश्वास ठेवा. क्रुसावर सैतानाचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्याला तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही भागावर कोणताही अधिकार नाही. ही सत्ये आपल्या मुखाने कबूल करा आणि आयुष्यभर पापावर मात करा. जर आपण विश्वास ठेवला आणि दावा केला तर देवाचा प्रत्येक आशीर्वाद आपला होऊ शकतो. देवाचे वचन सत्य आहे हेही आपण मुखाने कबूल केले पाहिजे. अंतःकरणाने माणूस विश्वास ठेवतो. पण मुखाने आपण तारण आणि सुटकेची कबुली देतो (रोम.१०:१०). अशा प्रकारे ("आपल्या साक्षीच्या वचनाने") आपणही सैतानाने आपल्यावर केलेल्या आरोपांवर मात करतो (प्रकटीकरण १२:११).