WFTW Body: 

वधस्तंभाचा मार्ग हा एकच विजयाचा मार्ग आहे. यामुळेच येशूला त्या मार्गापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न सैतानाने केला. यामुळेच माणसांनी हा मार्ग त्यांच्या जीवितांसाठी स्वीकारू नये असा प्रयत्न सैतान सतत करीत असतो. पेत्राचे येशूवर प्रेम होते व म्हणूनच वधस्तंभाच्या यातनांपासून ख्रिस्ताला परावृत्त करण्याचा प्रयत्न त्याने केला, पण येशूने त्यातील सैतानाची वाणी बरोबर ओळखली (मत्तय १६:२१-२३). आपला मार्ग खडतर असेल तेव्हा आपले मित्र व आप्त आपल्याला असाच सल्ला देतील. परंतु वधस्तंभाच्या मार्गापासून आपल्याला विचलित करणारे आवाज, आपल्या अंत:करणातून येवोत की बाहेरून कानी पडोत ती सैतानाची कुजबूज असते हे विसरू नका. आपल्याला त्यांची आधीच्या प्रकरणात पाहिले त्याप्रमाणे, हा अशी ओळख नेहमी पटते का?

प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रभू येशू हा वधिलेला कोकरा असा आपल्य दृष्टीस पडतो. हा कलवरीचा स्वर्गीय दृष्टिकोन आहे. मनुष्याच्या दृष्टीने कालवरी हा मोठा पराजय होता. येशूच्या पुनरुत्थानानंतर कोणाही अविश्वासू माणसाला येशूचे दर्शन झाले नाही व म्हणूनच अजूनही माणूस कलवरीकडे एक पराजयाचे चिन्ह अशाच दृष्टीने पाहतो. परंतु स्वर्गीय दृष्टीने कालवरी हा पृथ्वीवरील सर्वात महान विजय होता. पृथ्वीवर देवाच्या कोकऱ्याला खांबी खिळण्यात आले, पण स्वर्गात त्याची आराधना करण्यात येते. येशूला तुम्ही अनुसरता व तुमच्या अधिकाराकडे पाठ फिरवता, तेव्हा तुमच्यामध्ये हिंमत नाही असे पृथ्वीवरील माणसे म्हणतील; पण देवाच्या एका मुलाने विजयाच्या पथावर पाय ठेवला म्हणून स्वर्गात उत्सव केला जाईल. "त्याला (सैतानाला) त्यांनी..... जिंकले; आणि त्याच्यावर ( वधस्तंभावर) मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावा प्रीती केली नाही म्हणून स्वर्गानो... उल्लास करा (प्रकटीकरण १२:११,१२).

पारध्यांच्या पाशातून सुटणाऱ्या पक्षाचे उदाहरण घेऊन स्तोत्र १२४:७ या वचनात ख्रिस्ती जीवन रेखाटले आहे. आकाशात भरारी मारून उंच जाणाऱ्या पक्षासारखे गौरवी स्वातंत्र्य देवाच्या मुलांनी अनुभवावे अशी त्याची इच्छा आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या प्राण्यांना त्यांच्या प्रगतीपथावर पर्वत व नद्या अडथळा करू शकतात, पण पक्षांना त्यांचे अडखळण होऊ शकत नाही. पक्षी या सर्वाच्या वर उंचावरून पार जातो. मानवाने त्या पक्षासारखेच मुक्त असावे, सर्व पृथ्वीवर सत्ता गाजवावी व सर्वांना त्याच्या अधिकारात आणावे म्हणून देवाने मानवाला उत्पन्न केले (उत्पत्ती १:२८). पण मनुष्याच्या अवज्ञेच्या पातकामुळे तो जाळ्यात सापडलेल्या पक्षासारखा झाला आहे, उडणे त्याला अशक्य झाले आहे.

ते जाळे तोडणे व आपल्याला मुक्त करणे वधस्तंभालाच शक्य आहे. मुक्ततेचा दुसरा मार्गच नाही. तुम्ही जगाचा व स्वतःचा त्याग केला तर सैतानाच्या शक्तीचाही तुमच्यामध्ये नाश होईल. तुमच्यातील त्याची पकड सुटेल व पक्षासारखे आकाशात भरारी मारण्यास कसलेही अडखळण तुम्हांला येणार नाही. ही खरी मुक्तता आहे - आपल्या जीवनात हेच स्वातंत्र मिळावे म्हणून पवित्र आत्मा प्रयत्न करीत असतो (२ करिंथ. ३:१७). पण वधस्तंभाचा मार्ग हा त्या स्वातंत्र्याचा एकच मार्ग आहे.

अशा ख्रिस्ती लोकांचे वर्णन येशूने मार्क ४:१७ या वचनात 'मूळ नसलेले ख्रिस्ती' असे केले आहे. त्यांचे ख्रिस्ती आचरण उथळपणाचे असते. त्यांच्या जीवनात त्यांनी वधस्तंभाचा स्वीकार करावा व त्यायोगे त्यांची मुळे बळकट व्हावीत म्हणून देव त्यांना संधी देतो, पण त्या संधी ते नेहमी टाळतात. ख्रिस्तामध्ये जीवनाची जी पूर्णता आहे ती मनुष्याला प्राप्त व्हावी याकरिता एकच मार्ग आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने आपल्याला हवे तर आपण चालू शकतो, पण दुसऱ्या मार्गाने आपल्याला देवाची योजना कधीही पूर्ण करता येणार नाही, आपल्या जीवनातील वधस्तंभाचा मार्ग आपण टाळला तर आपल्या सर्व देणग्या, नैपुण्ये व्यर्थ ठरतील. आपण तो मार्ग स्वीकारावा किंवा टाळावा निवड करणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.

साधु सुंदरसिंग म्हणतात की, आपण स्वर्गात गेलो म्हणजे येशूकरिता त्याचा वधस्तंभ वाहण्याची दुसरी संधी आपल्याला पुनः मिळणार नाही. आता आपण त्या संधीचा अव्हेर केला तर येशूच्या रक्ताळलेल्या मार्गावरून जाण्याची संधी मृत्यूनंतर आपल्याला कधीही मिळणार नाही. आपण आपल्या धन्य प्रभूला भेटू तेव्हा त्याच्या हातांवर व पायांवर खिळ्यांचे व्रण आपल्याला दिसतील. त्यावेळी आपल्या पृथ्वीवरील जीवनाची आठवण आपल्याला होईल व आपण प्रत्येक पावलागणिक मोठ्या शिताफीने वधस्तंभ टाळीत आलो याची जाणीव आपल्याला होईल तेव्हा आपल्याला काय वाटेल? प्रभू करो, आणि आपण आपल्याला प्रत्येक पावलागणिक त्या वधस्तंभाच्या अधीन करावे असे होवो म्हणजे त्या दिवशी आपल्यावर अशी पश्चात्तापाची वेळ येणार नाही.