लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

मंडळी ही ख्रिस्ताचे शरीर आहे आणि प्रत्येक आठवड्यात एकत्र जमणाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांचा मेळावा नव्हे. तेव्हा आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण ख्रिस्ताचे शरीर बांधत आहोत केवळ “धार्मिक ख्रिस्ती गट” नव्हे. कोणताही माणूस धार्मिक गट संघटित करू शकतो. तथापि ख्रिस्ताचे शरीर तयार करण्यासाठी देवाकडून कृपा व अभिषेकाची गरज आहे - आणि यासाठी आपण स्वतःला नाकारले पाहिजे, दररोज मरण पावले पाहिजे आणि पवित्र आत्म्याने भरले गेले पाहिजे.

जुन्या कराराच्या अधीन असलेले इस्राएली लोक ख्रिस्ताचे शरीर नाहीत तर एक धार्मिक मेळावा होते. आज बर्‍याच मोठ्या मंडळ्या धार्मिक मेळावा आहेत आणि ख्रिस्ताचे शरीर नव्हे. काही लहान, घरातल्या मंडळ्या थोड्या चांगल्या आहेत - ते धार्मिक संघ आहेत परंतु ख्रिस्ताचे शरीर नाहीत. पण येशू त्याचे शरीर बांधत आहे.

ख्रिस्ताचे पहिले शरीर मानवाने गव्हाणीत (गुराढोरांचे अन्न ठेवण्याचे कुंड) पहुडलेले पाहिले. त्या अपमानास्पद जन्मामुळे झालेली निंदा ही मेंढपाळांसाठी ख्रिस्ताचे शरीर ओळखण्याचे ही खूण होती. (लूक २:१२ पहा). पुन्हा एकदा, निंदा म्हणूनच ख्रिस्ताचे शरीर शेवटी कालवरी येथे गुन्हेगाराच्या वधस्तंभावर टांगले गेले. जन्मापासून मृत्यूपर्यंत ख्रिस्ताच्या पहिल्या शरीराचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्ष जगातील तसेच धार्मिक जगाकडून त्याच्या पहिल्या शरीराची केलेली निंदा होती.

आज ख्रिस्ताच्या शरीराच्या कोणत्याही वास्तविक अभिव्यक्तीस जग आणि बाबेलच्या ख्रिस्ती जगाकडून याचप्रमाणे निंदा सहन करावी लागेल. आपल्या स्थानिक मंडळीमध्ये 'ख्रिस्ताच्या निंदे' चे आवरण नसेल तर अशी शक्यता आहे की, आपण तडजोड करणारे झालो आहोत आणि आपण "बाबेलच्या छावणीबाहेर" जाऊ शकलो नाहीत (इब्री लोकांस पत्र १३: १३). ख्रिस्ताची निंदा आणि आपल्या स्वत: च्या पापामुळे किंवा मूर्खपणामुळे किंवा कोमटपणामुळे झालेली कोणतीही निंदा यात फरक आहे. आपण या दोहोंतील एकाला दुसरे समजण्याची चूक करू नये.

येशूविषयी असे लिहिले होते की "त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते….. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला" (यशया .५३: २,३). त्याचे गौरव त्याच्या आंतरिक जीवनात होते - कृपेने आणि सत्याने भरलेले - जे बहुतेक लोकांपासून लपलेले होते (योहान १:१४). आमच्या स्थानिक मंडळ्यादेखील आकर्षक नसाव्यात - एकतर जगासाठी किंवा बाबेलच्या ख्रिस्ती जगासाठी. जे मंडळीत आत्मिक जीवन शोधण्यासाठी येतात फक्त त्या सर्वांसाठीच ही मंडळी आकर्षक असणे आवश्यक आहे. निवास मंडपाच्या आतील भागावर सुंदर पडदे होते. परंतु बाहेरील आच्छादन गडद तपकिरी रंगाच्या मेंढाच्या कातड्यांनी धूळ व घाणीने झाकलेले होते. सौंदर्य सर्व मंडपाच्या आतील पडद्यांवर होते. ख्रिस्ताची वधूदेखील "तिच्या आंतरिक जीवनात गौरवी" आहे (स्तोत्र ४५:१३). आणि "तिच्या आतील वैभवावर पांघरुण असेल (निंदेचे)" (यशया ४: ५).

येथेच मंडळीच्या पुढाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. त्यांनी मंडळीला पुढे नेण्याच्या मार्गावरून हे ठरणार आहे की मंडळी येशूसारखी असणार आहे ज्याचा मनुष्यांद्वारे सन्मान केला जात नव्हता किंवा अशी की जगाकडून तिची स्तुती केली जाईल आणि तिचा आदर केला जाईल. जर आपण जगाकडून किंवा इतर दैहिक किंवा जीवाचे ऐकणाऱ्या ख्रिस्ती लोकांकडून कौतुक मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच बाबेलची उभारणी करू. जेव्हा आपण ख्रिस्ती धर्मजगताद्वारे सर्वसाधारणपणे लोकप्रिय आणि स्विकारले जातो तेव्हा आपण नक्कीच खात्री बाळगू शकतो की आपण येशूच्या पाऊलखुणांपासून पूर्णपणे चुकलो आहोत.

येशू म्हणाला, "माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला."(मत्तय ५: ११,१२). हेरोद आणि त्याचे सैनिक २० शतकांपूर्वी ख्रिस्त, बाळ येशू याचे पहिल्या शरीराला मारण्यासाठी आतुर होते. आणि असे बरेच लोक आहेत जे आज सुरु होणाऱ्या ख्रिस्ताच्या शरीरास नष्ट करण्यास उत्सुक आहेत. योसेफाने देवाच्या आवाजाविषयी संवेदनशील राहून आणि देवाने त्याला जे करण्यास सांगितले त्यानुसार त्वरेने वागून त्या शरीराचे रक्षण केले (मत्तय २: १३-१५). ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये ज्यांना जबाबदारी आहे त्यांनीदेखील योसेफासारखे झाले पाहिजे. आपल्याला 'ऐकणारे' व्हावे लागेल - पवित्र आत्मा आपल्याला जे सांगतो ते ऐकणारे आणि आपल्याला जे सांगितले गेले आहे त्याचे पालन करण्यास तत्पर असणारे. जर आपण ऐकले नाही आणि त्याचे पालन केले नाही तर आपल्या परिसरातील ख्रिस्ताच्या शरीराचे काही ना काही नुकसान होईल - आणि शेवटच्या दिवसात आम्हाला त्यासाठी जबाबदार धरले जाईल. या प्रकरणात आपण आपली जबाबदारी गंभीरपणे स्वीकारली पाहिजे कारण आपण आपल्या जबाबदाऱ्यांसाठी वचनबद्ध असलेल्या प्रत्येक आत्म्यासाठी आपल्याला देवाला हिशोब द्यावा लागेल (इब्री १३: १७)