लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

यहेज्केल ७:९: मध्ये, आम्ही येथे परमेश्वराच्या उपाधीबद्दल पाहतो की जिच्याबद्दल कदाचित बऱ्याच लोकांना ऐकायला आवडणार नाही, ‘मारणारा परमेश्वर', जो न्यायाने शिक्षा करतो. यहेज्केल ८ मध्ये, परमेश्वराने यहेज्केलाला मंदिरात चालू असलेल्या मूर्तिपूजा दाखवल्या, ज्यामुळे त्याने यहूदाचा त्याग केला होता . देवाच्या लोकांमध्ये चालू असलेल्या छुप्या पापांबद्दलची अंतर्दृष्टी देवाने यहेज्केलाला दिली. आपल्या लोकांमधील गुप्त पापे उघड करण्यासाठी, जी इतरांना ठाऊक नाहीत, देव खऱ्या संदेष्ट्याच्या मुखी शब्द घालेल.

करिंथकरांस पहिले पत्र १४:२४,२५, मध्ये आपण अशा मंडळीच्या उपासनेविषयी वाचतो, जिथे लोक संदेशात्मक रीतिने बोलत असता कोणी अनोळखी व्यक्ती आत येते आणि त्याला त्याच्या अंत: करणातील रहस्ये प्रकट होतात. आणि तो उपडा पडतो आणि कबूल करतो की देव त्या सभेत आहे. आपल्या मंडळीची प्रत्येक उपासना अशीच असावी. आणि आपण सर्वांनी असा संदेश देण्याची अभिलाषा बाळगली पाहिजे.

लोक मूर्तीची पूजा करीत होते आणि स्त्रिया तम्मुज मूर्तीसाठी रडत होत्या ज्यात ते परराष्ट्रीयांबरोबर अनेक अमंगळ, दूराचारी कर्मकांडात गुंतलेले होते (यहेज्केल ८:१४) आणि हे सर्व मंदिरात चालू होते. यांपैकी बहुतांश मूर्तिपूजा बाहेरील लोकांना माहित नव्हत्या. बाहेरून पवित्र दिसणारे बरेच लोक आतून अपवित्र असतात. परमेश्वर म्हणतो, “हे माझे मंदिर असता आत काय चालले आहे ते पाहा.” ते पूर्वेकडे तोंड करून सूर्याची उपासना करत होते, त्याचप्रमाणे आज बरेच ख्रिस्ती लोक प्रार्थना करण्यासाठी पूर्व दिशेला तोंड करतात (यहेज्केल ८:१६). यहेज्केल ९:३: देवाच्या मंदिरातल्या या सर्व पापामुळे, देवाचे तेज हळूहळू तेथून जाऊ लागले.

जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा मंडळीतून देवाचे तेज जाऊ लागते आणि अभिषेक, संजीवन आणि अग्नी निघून जातो तेव्हा नेहमीच एक कारण असते. २० वर्षांपूर्वी ज्यांना अभिषेक प्राप्त झाला होता अशा अनेक प्रचारकांनी तो आता गमावला आहे. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्या जीवनावरील अभिषेक वाढला पाहिजे. परंतु मी भेटलेल्या बहुतेक उपदेशकांसोबत, मी केवळ तो कमी होताना पाहिले आहे. याचे सहसा कारण असे असते की त्यांनी पैशाच्या मागे लागून स्वतःला भ्रष्ट केले असेल, किंवा इतर मार्गाने तडजोड केली असेल किंवा लोकांना खुश करण्यासाठी बोलण्यास सुरुवात केली असेल. देवाने कदाचित तुमच्यातील अनेकांना त्याची सेवा करण्यासाठी बोलावले असेल. तसे असल्यास, मग विश्वासू राहा आणि आपल्या सेवेतून तेज जाऊ देऊ नका.

यहेज्केल ९:४ मध्ये जे सांगितले आहे ते आपण आज मंडळीला लागू करू शकतो, अशा प्रकारे : परमेश्वर त्याला म्हणाला, “सर्व मंडळ्यांमध्ये चालत जाऊन जी माणसे मंडळीत होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर." जर आज देवाने देवदूताला (जसे त्याने तेव्हा केले होते) मंडळीमध्ये येशूच्या नावाचा अपमान होत असल्यामुळे रडणाऱ्यांच्या कपाळावर चिन्ह करण्यासाठी पाठवायचे ठरवले असेल तर किती लोकांना चिन्हांकित केले जाईल? ख्रिस्ती लोकांद्वारे येशूच्या नावाचा अनादर होत आहे याबद्दल आपल्याला किती कळकळ आहे? बहुतेक सर्व मंडळ्यांमध्ये - प्रत्येक संप्रदायाच्या मंडळ्यांमध्ये त्या पवित्र नावाचा अनादर केला जातो. आम्हांला त्याबद्दल चिंता आहे का? याबद्दल कळकळ असलेल्या लोकांना देव चिन्हांकित करतो. आणि येथे परमेश्वर म्हणतो , “ज्यांच्यावर माझी खूण नाही अशा सर्वांना ठार कर.” आजही, ज्यांना प्रभूच्या नावाबद्दल कळकळ नसते त्या सर्वांचा शेवट आध्यात्मिकरित्या मरणात होईल. “तुझे नाव पवित्र मानले जावो,” ही पहिली प्रार्थना आहे जी प्रभूने आपल्याला शिकवली आहे. जर तुम्हाला त्या नावाबद्दल कळकळ असेल तर देव तुम्हाला त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरु शकतो.

देवदूताने लोकांना ठार मारण्यास सुरवात केली तेव्हा प्रथम सत्तर वडीलजन मारले गेले! वडीलजन जे देवाच्या लोकांचे नेते समजले जाता त्यांनाच सर्वांत कमी आस्था होती. ज्याला पुष्कळ दिले आहे, त्याच्याकडून पुष्कळ मिळणे आवश्यक आहे. म्हणून जेव्हा न्यायाचा प्रारंभ होतो, तेव्हा तो नेहमीच मंडळीमधील पुढाऱ्यांपासून सुरू होईल. देवाचे तेज निघून जात होते कारण नेते अपयशी झाले होते. आजही तेच घडत आहे.