बायबल आपल्याला सर्व गोष्टींसाठी, सर्व परिस्थितीत आणि सर्व लोकांसाठीही आभार मानण्यास सांगते.
"आपल्या प्रभु येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देव पित्याची उपकारस्तूती करीत जा" (इफिसकरास पत्र ५:२०).
"सर्व स्थितीत उपकारस्तूती करा; कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यासाठी देवाची इच्छा हीच आहे" (थेस्सलनीकरास पहिले पत्र ५:१८).
"सर्व प्रथम मी आग्रह करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तूती करावी” (तिमथ्याला पहिले पत्र २:१).
जेव्हा आपण देवाचे पूर्ण सार्वभौमत्व पाहू तेव्हाच आपण हे अर्थपूर्णपणे करू शकतो.
देवाने जशी येशूची काळजी घेतली तशीच तो आपली काळजी घेतो. येशूला मदत करणारी तीच कृपा, पवित्र आत्म्याची तीच शक्ती ज्याने त्याला मात करण्यास सक्षम केले, तीच आता आपल्याला उपलब्ध आहे.
यहूदाने येशूचा विश्वासघात केला, पेत्राने त्याला नाकारले, त्याच्या शिष्यांनी त्याला सोडले, लोक त्याच्याविरुद्ध झाले, त्याच्यावर अन्यायाने खटला चालवला गेला, खोटे आरोप लावले गेले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. आणि तरीही कलव्हरीच्या वाटेवर जाताना, तो जमावाकडे वळून म्हणू शकला, "माझ्यासाठी रडणे थांबवा, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी रडा" (लूक २३:२८).
त्याच्यात आत्म-दयेचा एकही अंश नव्हता.
त्याला माहित होते की जो प्याला तो पीत होता तो त्याच्या पित्याने पाठवला आहे. यहूदा इस्कर्योत प्याला आणणारा केवळ एक दूत होता. आणि म्हणून तो यहूदाकडे प्रेमाने पाहू शकत होता आणि त्याला "मित्र" म्हणू शकत होता. देवाच्या संपूर्ण सार्वभौमत्वावर विश्वास असल्याशिवाय तुम्ही ते करू शकणार नाही.
येशूने पिलाताला सांगितले, "आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता" (योहान १९:११).
या आश्वासनामुळेच येशूला या जगात राजा म्हणून, सन्मानाने चालता आले. तो त्या आध्यात्मिक प्रतिष्ठेने जगला आणि त्याच आध्यात्मिक प्रतिष्ठेने मरण पावला.
"जसा येशू चालला तसे चालण्यास" आपल्याला बोलावले आहे. जसे त्याने पिलातासमोर "चांगली कबुली दिली" तशी आपणही अविश्वासू पिढीसमोर आपली कबुली दिली पाहिजे.
तिमथ्याला पहिले पत्र ६:१३-१४ मध्ये पौल तीमथ्याला सांगतो, "सर्व प्राणिमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातासमोर स्वतः विषयी चांगला पत्कर केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभु येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व अदूश्य राख ."
आपण आधीच पाहिले आहे की, देव ज्या अंतिम चांगल्यासाठी काम करत आहे ते म्हणजे आपल्याला त्याच्या स्वभावाचे, त्याच्या पवित्रतेचे भागीदार बनवणे. त्याच्या अद्भुत सार्वभौमत्वात, तो आपल्या मार्गातून येणाऱ्या प्रत्येकाचा वापर त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी करतो. म्हणूनच आपण सर्व लोकांचे आभार मानू शकतो.
देव त्या त्रासदायक शेजाऱ्याला, त्या त्रासदायक नातेवाईकाला आणि त्या अत्याचारी बॉसला तुम्हाला त्रास देत राहण्याची परवानगी का देतो ? तो त्यांना सहजपणे इतरत्र काढून टाकू शकतो किंवा त्यांचे जीवन देखील काढून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे तुमच्यासाठी जीवन अधिक आरामदायी बनवू शकतो. पण तो असे काहीही करत नाही. का ? कारण तो तुम्हाला पवित्र करण्यासाठी त्यांचा वापर करू इच्छितो. तो कदाचित तुमच्याद्वारे त्यांना वाचवू इच्छित असेल -.