WFTW Body: 

जेव्हा गिदोनाने इस्रायलच्या शत्रूंशी लढण्यासाठी सैन्य गोळा केले तेव्हा त्याच्याबरोबर ३२,००० माणसे होती. पण देवाला माहीत होते की ते सगळे पूर्ण अंतःकरणाने आलेले नाहीत. आणि म्हणून देवाने त्यांना हळूहळू कमी केले. घाबरट लोकांना प्रथम घरी पाठवण्यात आले. पण अजूनही १०,००० शिल्लक राहिले. त्यानंतर त्यांना नदीत उतरवले गेले आणि परीक्षा घेण्यात आली. फक्त ३०० जण परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांना देवाची मान्यता मिळाली (शास्ते ७:१-८).

देवाने ते १०,००० लोक आपली तहान भागवण्यासाठी नदीतून ज्या पद्धतीने पाणी प्यायले त्या पद्धतीचा वापर गिदोनाच्या सैन्यात कोण पात्र आहे हे ठरवण्यासाठी केला. त्यांची चाचणी घेतली जात आहे याची त्यांना थोडीही कल्पना नव्हती . त्यांच्यापैकी ९७०० जण तहान भागवण्यासाठी गुडघे टेकताना शत्रूबद्दल सर्व विसरून गेले. त्यापैकी फक्त ३०० जण स्वतःच्या पायांवर उभे राहून,सावधपणे, तोंडाशी हात नेऊन पाणी प्यायले.

जीवनाच्या सामान्य गोष्टींमध्येच देव आपल्याला पारखतो - पैसा, आनंद, पृथ्वीवरील सन्मान आणि सुखसोयी इत्यादींबद्दलच्या आपल्या वृत्तीत. गिदोनाच्या सैन्याप्रमाणे देव आपल्याला पारखत आहे हे आपल्यालाही सहसा समजत नाही.

येशूने आम्हाला या जगाच्या काळजीने भारावून न जाण्याचा इशारा दिला. तो म्हणाला, "तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल" (लूक२१:३४).

पौलाने करिंथातील ख्रिस्ती लोकांना असे म्हणत बोध केला की, "बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे; जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे; जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे; जे विकत घेतात त्यांनी आपल्याजवळ काही नसल्यासारखे; आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे…. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हांला फासात गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो." (१करिंथ ७:२९-३५).

आपण या जगातील कोणत्याही गोष्टीला परमेश्वराच्या संपूर्ण भक्तीपासून आपले लक्ष विचलित करू देऊ नये. जगातील वैध गोष्टी पापी गोष्टींपेक्षा मोठे पाश आहेत - कारण वैध गोष्टी इतक्या निरागस आणि निरुपद्रवी दिसतात!!

आपण आपली तहान भागवू शकतो - परंतु आपण आपल्या हातांची ओंजळ केली पाहिजे आणि कमीत कमी, आवश्यक तेव्हढेच प्यावे. आपले मन पृथ्वीच्या गोष्टींवर नव्हे तर वरील गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे. येशूचे शिष्य व्हायचे असेल तर आपल्याला सर्व काही सोडून द्यावे लागेल. एखाद्या ताणलेल्या रबर-बँडप्रमाणे आपले मन आवश्यक असलेल्या पृथ्वीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकते. पण एकदा का त्या गोष्टी संपल्या की, रबर-बँड त्याच्या तणावातून मुक्त झाल्यावर त्याच्या सामान्य स्थितीत जसे परत येतो , आपले मनही परमेश्वराच्या आणि अनंतकाळाच्या गोष्टींकडे परत गेले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपले मन "वरील गोष्टींकडे लावा,पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका."(कलस्सै २:३) अनेक विश्वासणाऱ्या लोकांबरोबर मात्र रबर-बँड विरुद्ध मार्गाने काम करतो. त्यांचे मन कधी कधी सार्वकालिक गोष्टींचा विचार करण्यासाठी ताणले जाते आणि जेव्हा ते सोडले जाते, तेव्हा या जगाच्या गोष्टींसह व्यापलेल्या त्यांच्या सामान्य पद्धतीकडे परत येते!