WFTW Body: 

सैतानाची पहिली योजना हव्वेला हे सांगणे होती की, देवाने सांगितल्याप्रमाणे देव करणार नाही (उत्पत्ती ३:१-६). तो तिला म्हणाला, "तुम्ही खरोखर मरणार नाही." अशारितीने तो हव्वेला पापात पाडू शकला. आजही तो हीच पद्धत वापरतो. देवाचे वचन म्हणते, की जे विश्वासणारे लोक "देहाप्रमाणे जगतात ते मरणारच "(रोम ८:१३). पण सैतान म्हणतो, "तुम्ही खरोखर मरणार नाही." आणि बहुतेक विश्वास ठेवणारे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि पाप करत राहतात.

असा कितीजणांचा खरा विश्वास आहे की, एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहण्यापेक्षा आपला डोळा गमावणे आणि आंधळे होणे अधिक हिताचे आहे;आणि त्याचबरोबर व्यभिचार करण्यापेक्षा आपला उजवा हात गमावणे अधिक हिताचे आहे.

किती लोकांचा यावर विश्वास आहे जे राग आणि व्यभिचार यांना गंभीरपणे घेत नाहीत ते शेवटी नरकात जातील (मत्तय ५:२२-३०)?

किती लोकांचा असा विश्वास आहे, की देवाच्या वचनाची अवज्ञा करणे आणि विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणे हे देवावर मुठी आवळण्यासारखे आहे (२ करिंथ.६:१४)?

किती लोकांचा असा विश्वास आहे की केवळ अंतःकरणाचे शुद्ध लोकच देवाला पाहतील (मत्तय ५:८)?

किती लोकांचा असा विश्वास आहे जे सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्याचा व पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करीत नाहीत त्यांना परमेश्वराचे दर्शन होणार नाही (इब्री १२:१४)?

किती लोकांचा असा विश्वास आहे की, निष्काळजीपणे बोललेल्या प्रत्येक शब्दाचा त्यांना न्यायाच्या दिवशी हिशेब द्यावा लागेल (मत्तय १२:३६-३७)? देवाच्या या शब्दांवर विश्वास ठेवणारे जगात फार कमी विश्वासणारे आहेत. सैतानाने ख्रिस्ती धर्मजगतात केलेले फसवणुकीचे असे कार्य आहे. परिणामस्वरूप, बहुतेक विश्वासणारे लोक देवाचे भय आणि त्याच्या इशाऱ्यांचे भय गमावून बसले आहेत. सैतानाने त्यांचा समूळ नाश करेपर्यंत ते पापासंबंधी मूर्खासारखे वागतात.

देव अशा लोकांकडे पाहतो जे दीन आणि अनुतप्त आत्म्याचे आहेत आणि जे त्याच्या वचनाने थरथर कापतात (यशया ६६:२). देवाच्या वचनातील प्रत्येक इशाऱ्यावर आपण थरथर कापले पाहिजे. आपण खरोखरच देवाचे भय बाळगतो याचा हा पुरावा आहे. जे देवाच्या भयात पावित्र्याच्या परिपूर्णतेकडे जात आहेत तेच शेवटी ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग बनतील. ज्यांनी विजय मिळवला आहे त्यांनाच दुसऱ्या मृत्यूपासून (अग्नीच्या सरोवरापासून) वाचवले जाईल आणि त्यांनाच जीवनाच्या झाडाच्या फळाचे सेवन करण्याचा अधिकार असेल (प्रकटीकरण२:७,११). आत्मा सर्व मंडळ्यांना हेच सांगत आहे. पण ज्यांच्याकडे ऐकायला कान आहेत ते अगदी थोडे आहेत.