याकोब ४:२ च्या शेवटच्या भागात आपण वाचतो, “तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही.” देवाला ख्रिस्ती लोकांना अनेक गोष्टी द्यायच्या आहेत, पण त्यांनी त्या मागितल्या नाहीत म्हणून त्यांना त्या मिळाल्या नाहीत. हे विशेषतः आत्मिक आशीर्वादांच्या बाबतीत खरे आहे. लूक ११:१३ मधील वचन घ्या, “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना तो स्वर्गीय पिता किती विशेषकरूण पवित्र आत्मा देईल.” जो आपल्याला पवित्र करतो त्या पवित्र आत्म्याची जर आपल्याला इच्छा नसेल, तर येशूच्या दर्जाप्रमाणे जगण्याची क्षमता आपल्यात कधीच येणार नाही. म्हणूनच येशूने मत्तय ७:७ मध्ये म्हटले आहे, “मागा, म्हणजे तुम्हाला दिले जाईल.”
देव आपण त्याला मागण्याची वाट का पाहतो ? कारण तो आपल्याला जे देतो, त्याची आपण किंमत करावी अशी त्याची इच्छा असते. आपण न मागता तो जे देतो, त्याचे मूल्य आपण सहसा जाणत नाही. पापांची क्षमा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ती मागितल्यावरच तुम्हाला मिळाली, नाही का? तुम्ही मागितले नसते तर तुम्हाला ते मिळाले असते का? तुम्ही मागितले नसते तर तुम्हाला तारण मिळाले असते का? पृथ्वीवर असे लाखो लोक आहेत ज्यांचे तारण झालेले नाही, कारण ते ते मागत नाहीत. त्यांना त्याची गरज आहे हे मान्य करण्यासाठी ते स्वतःला नम्र करत नाहीत.
देवाचे सर्वोच्च आत्मिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इतर कोणत्या आवश्यकता आहेत? सर्वप्रथम, आपल्या मनात त्यांची इच्छा, त्यांची तहान असली पाहिजे. मग, आपण विश्वासाने मागितले पाहिजे. मागणे हे त्या इच्छेबद्दल बोलते, आणि येशू काही वचनांनंतर, मत्तय ७:११ मध्ये विश्वासाविषयी बोलतो. तो म्हणतो, “जर आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणे हे तुम्हाला समजते, तर तुमचा स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्याना तो किती विशेषकरूण चांगल्या देणग्या देईल.”
तुम्ही मागितले नाही तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही शोधाल तर तुम्हाला सापडेल. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला ते शोधावे लागेल. देवाच्या वचनात खजिना आहे. काही गोष्टी वरवर दिसतात, ज्या प्रत्येकाला मिळू शकतात, पण त्यातील खजिना सर्वात खोल आत असतो आणि तो तुम्हाला शोधावा लागतो. पृथ्वीचा विचार करा. पृष्ठभागावर आंबे, नारळ आणि इतर अनेक चांगल्या फळांसारख्या अनेक मौल्यवान गोष्टी आहेत, पण जर तुम्हाला सोने आणि हिऱ्यांसारखा खरोखर महागडा खजिना हवा असेल, तर तुम्हाला जमिनीखाली हजारो फूट खोदावे लागेल. त्याचप्रमाणे, बायबलच्या वरवरच्या भागातून काही गोष्टी मिळतात, जसे की आपल्या पापांची क्षमा कशी होऊ शकते (कारण ख्रिस्त त्याच्यासाठी मरण पावला). पण जर तुम्हाला पवित्र शास्त्रातील गहन सत्ये जाणून घ्यायची असतील—आत्म्याने भरलेले जीवन कसे जगावे, देवाच्या स्वभावात कसे सहभागी व्हावे, सर्व पापांवर कशी मात करावी, राग, कटुता, क्षमा न करण्याची वृत्ती, मत्सर, कामवासना यांवर कशी मात करावी— हे समजण्यासाठी तुम्हाला खोलवर खोदावे लागेल. जर एखादी व्यक्ती खोलवर खोदत नसेल, तर देवाला दिसते की त्या व्यक्तीला त्यात खरोखर रस नाही. “मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. पूर्ण मनाने शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल.”
यिर्मया २९:१३ मध्ये आपल्याला हे वचन आढळते, “जेव्हा तुम्ही मला पूर्ण अंतःकरणाने शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.” जर एखाद्या व्यक्तीला देव आणि त्याच्यामध्ये असलेले धन सापडले नसेल, तर मी यत्किंचितही संकोच न बाळगता म्हणू शकतो की, त्या व्यक्तीने देवाला पूर्ण अंतःकरणाने शोधले नाही. त्याने अर्धवट मनाने शोध घेतला आहे, आणि पवित्र शास्त्रामध्ये अर्धवट मनाच्या लोकांसाठी कोणतेही वचन नाही. पाऊण मनाच्या लोकांसाठीही कोणतेही वचन नाही, परंतु पूर्ण मनाच्या लोकांसाठी प्रचंड वचने आहेत. तुम्ही अगदी जवळ असू शकता; तुम्ही स्वतःचे ९०% देवाला देऊ शकता आणि तरीही तुम्हाला ज्याने त्याला १०% दिले आहे त्या व्यक्तीपेक्षा जास्त काही मिळणार नाही. पण, जेव्हा तुम्ही देवाला १००% देता, तेव्हा तुम्हाला सर्वकाही मिळते. जर तुम्ही ९०% दिले, तर तुम्ही त्याच श्रेणीत येता ज्याने १०% दिले. हीच गोष्ट ख्रिस्ती लोकांच्या लक्षात येत नाही. देवाला तुमच्या हृदयाच्या १०% मनाने शोधा, तो तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही ९०% मनाने त्याचा शोध घ्या, तरीही तो तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही संपूर्ण मनाने देवाचा शोध घ्या, म्हणजे तो तुम्हाला सापडेल.
शोधा, म्हणजे सापडेल. ठोका, म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. ही वचने आहेत. देव आपली वचने कधीही तोडत नाही.“जो कोणी मागतो, त्याला मिळते.”तुम्हाला का मिळाले नाही? कारण देवाला जसे हवे आहे, तसे तुम्ही मागत नाही हे उघड आहे.“जो कोणी शोधतो, त्याला सापडते.”कदाचित देवाला जसे हवे आहे, तसे तुम्ही शोधले नसेल.“जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी उघडले जाईल.”कदाचित तुम्ही पुरेसे ठोकले नसेल .
ख्रिस्ती लोक देवाला मागत नाहीत, केवळ या कारणामुळे त्यांच्या हातून लाखो गोष्टी सुटल्या आहेत.याकोब ४:२ च्या शेवटी असलेले हे छोटे वाक्य लक्षात ठेवा, “देवाला जे तुम्हाला द्यायचे आहे, ते तुमच्याकडे नाही, कारण तुम्ही मागत नाही.”