WFTW Body: 

“अरुंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत” (मत्तय ७:१३-१४).

नाश म्हणजे सार्वकालिक नरक.येशूने डोंगरावरील प्रवचनात नरकाविषयी सांगितले का? निश्चितच सांगितले. त्याने त्याबद्दल तीन वेळा सांगितले. चला, नाशाच्या मार्गाकडे पाहूया. मत्तय ५:२२ मध्ये येशू म्हणाला, “जर तू आपल्या भावावर रागावला असशील, तर तू न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होशील. जर त्या रागातून रागाचे शब्द बाहेर पडले तर, तर तू उच्च न्यायालयाच्या शिक्षेस पात्र होशील, जर ते रागाच्या गंभीर शब्दांपर्यंत पोहोचले, तर तू नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होशील.” पुन्हा, येशू मत्तय ५:२८ मध्ये म्हणतो, “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो, तर त्याने आपला उजवा डोळा काढून टाकणे बरे. नाहीतर, तुम्हाला नरकात टाकले जाईल. जर तुमचा उजवा हात तुम्हाला लैंगिक पापाकडे नेत असेल, तर तो तोडून टाकणे बरे.” नाहीतर, येशू मत्तय ५:३० मध्ये म्हणतो, तुम्हाला नरकात टाकले जाईल. हाच विनाशाचा मार्ग आहे. अनियंत्रित क्रोध आणि अनियंत्रित लैंगिक वासनेचा मार्ग हा एक विस्तृत मार्ग आहे, आणि त्या मार्गावरून चालणारे असंख्य लोक आहेत. जग अशा लोकांनी भरलेले आहे जे क्रोधीत आहेत आणि लैंगिक वासना, अनियंत्रित पापी लैंगिक इच्छा, गरीब स्त्रियांचे शोषण इत्यादींनी भरलेले आहेत. हाच विनाशाचा विस्तृत मार्ग आहे.

जर एखादा पुरुष स्वतःला नविन जन्म पावलेला ख्रिस्ती म्हणवत असेल, पण तो इंटरनेटवर पॉर्नोग्राफी पाहत असेल आणि गरीब स्त्रियांचे शोषन करूण त्यांचा फायदा घेत असेल तर काय? जर हा ख्रिस्ती आपला राग उघडपणे व्यक्त करत असेल तर काय? हाच विनाशाचा मार्ग आहे. तो स्वतःला ख्रिस्ती म्हणो वा ख्रिस्ती नसलेला म्हणो, त्याने काही फरक पडत नाही. तो विनाशाच्या मार्गावर आहे. तो एक रुंद मार्ग आहे.

काही उपदेशक हा मार्ग रुंद करतात, जे म्हणतात की आपण इतके संकुचित विचार करण्याची गरज नाही आणि जे या गोष्टींवर विजय मिळवतात तेच सार्वकालिक जीवनात प्रवेश करतात. नाही, ते येशूच्या शिकवणीपेक्षा ते प्रवेशद्वार अधिक रुंद करतात. येशू म्हणाला की जीवनाचा मार्ग सुईच्या छिद्रासारखा आहे. उंट सुईच्या छिद्रातून जाऊ शकतो का? नाही. येशू म्हणाला की, जो माणूस श्रीमंत आहे त्याला देवाचे राज्य मिळण्यापेक्षा उंटाला सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे. आपली श्रीमंती केवळ संपत्तीत नसते. ती आपल्या बुद्धीत असू शकते. पवित्र शास्त्राच्या बाबतीत ती आपल्या बौद्धिक युक्तिवादात असू शकते. आपण बौद्धिक युक्तिवादांनी देवाच्या वचनांचे गांभीर्य काढून टाकतो. तुम्ही विनाशाकडे नेणाऱ्या रुंद मार्गाने देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. पण जीवनाकडे नेणारे प्रवेशद्वार लहान आणि मार्ग अरुंद आहे. हाच तो मार्ग आहे ज्याचा येशूने डोंगरावरील प्रवचनात उपदेश केला. येशू असे म्हणत आहे की, “मी आतापर्यंत येथे जे काही सांगितले आहे, ते एक अतिशय अरुंद प्रवेशद्वार आणि एक अतिशय अरुंद मार्ग आहे, परंतु तोच जीवनाकडे नेणारा मार्ग आहे. तो मार्ग शोधणारे लोक खूपच थोडे आहेत.” डोंगरावरील प्रवचनात वर्णन केलेला मार्ग अनेक लोक निवडतील अशी तुम्ही अपेक्षा करता का? मुळीच नाही.

डोंगरावरील प्रवचन ख्रिस्ती नसलेल्यांसाठी नाही. ते शिष्य नसलेल्यांसाठी नाही. ते त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आपल्या जीवनात पश्चात्ताप आणि ख्रिस्तावरील विश्वासाचा पाया आधीच घातला आहे, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे आणि जे देवाची मुले बनले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने डोंगरावरील प्रवचनाचे पालन करण्याचा प्रयत्न करताना ते पहिले पाऊल उचलले नसेल, तर तो पायाशिवाय घर बांधणाऱ्या व्यक्तीसारखा आहे. परंतु येथे, प्रभूचे अनुसरण करू इच्छिणाऱ्या शिष्यांविषयी सांगितले आहे. त्यांना आढळेल की हे एक अतिशय अरुंद प्रवेशद्वार आहे आणि ते शोधणारे लोक खूपच थोडे आहेत. मत्तय ५-७ मध्ये लिहिलेल्या गोष्टींचे पालन करण्यासाठी अनेक लोक धावत येतील अशी मी अपेक्षा करत नाही.

जेव्हा तुम्ही अशी एक मंडळी पाहता जिथे हजारो लोक बसलेले आहे, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे ते 'मोजके' लोक आहेत का ज्यांना जीवनाचा मार्ग सापडला आहे. की हे लोक खोट्या उपदेशकांमुळे भरकटत आहेत आणि विनाशाकडे नेणाऱ्या रुंद मार्गावर जात आहेत? आम्हाला त्यांच्यापैकी कोणाचाही न्याय करायचा नाही. जर एका लहानशा भागातील तीस हजार लोकांनी डोंगरावरील उपदेशाचे पालन करून येशूचे अनुसरण करण्याची इच्छा व्यक्त केली, तर मला आनंद होईल. जर तीन लाख लोकांचा एक समुदाय ख्रिस्ताचे अनुसरण करू इच्छित असेल, तर मला आनंद होईल. पण तीन लाख लोक पृथ्वीवर ख्रिस्ताचे अनुसरण न करता फक्त स्वर्गात जाऊ इच्छित असतील, तर मला आनंद होणार नाही. माझ्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, बहुतेक मंडळीमध्ये बसलेल्या लोकांना पृथ्वीवर ख्रिस्ताचे अनुसरण न करता स्वर्गात जायचे असते. ती येशू ख्रिस्ताची खरी मंडळी नाही. ती अशी मंडळी आहे ज्याच्यावर नरकाचे दरवाजे निश्चितपणे विजय मिळवतील आणि जिथे उपदेशकांनी दरवाजा इतका रुंद केला आहे की असंख्य लोक कोणतीही किंमत न मोजता आत येऊ शकतील. दरवाजा इतका रुंद आहे की तुम्ही पैशावर प्रेम करू शकता आणि कल्पना करू शकता की तुम्ही देवावरही प्रेम करता. त्यांनी दरवाजा रुंद केला आहे, आणि त्या मंडळीत आपण येशूचे शिष्य बनवत आहोत, अशी ते स्वतःची फसवणूक करत आहेत.

आपण हे अगदी स्पष्टपणे पाहिले पाहिजे की, डोंगरावरील प्रवचनाच्या शेवटी येशूने स्पष्ट केले आहे की, जीवनाकडे नेणारा हा दरवाजा खूप लहान आणि हा मार्ग खूप अरुंद आहे. तो मार्ग प्रत्यक्षात शोधून काढणारे खूपच थोडे आहेत.

यानंतर लगेचच तो म्हणतो, “खोट्या संदेष्ट्यांपासून सावध राहा” (मत्तय ७:१५). या वचनाच्या संदर्भात हे खोटे संदेष्टे कोण आहेत, हे आपण पाहणे आवश्यक आहे. हे खोटे संदेष्टे ते आहेत का, जे मंडळीमध्ये येतात पण दुसऱ्याच धर्माबद्दल बोलतात आणि दुसऱ्याच धर्माच्या पवित्र ग्रंथातून शिकवू लागतात? नाही. खोटे संदेष्टे ते आहेत, जे “मेंढरांच्या वेशात येतात.” मेंढरांचा वेश म्हणजे येशू ख्रिस्ताचा सेवक आणि ख्रिस्ताचे मेंढर असल्याचा देखावा करणे. ते मेंढरांच्या वेशात येतात. ते मेंढरांसारखे दिसतात. ते हातात पवित्र शास्त्र घेऊन येतात, पण त्यांनी मार्ग रुंद केलेला असतो. ते पवित्र शास्त्रातील आज्ञांचे स्पष्टीकरण देऊन म्हणतात, “ही आज्ञा आवश्यक नाही,” किंवा “याचा नेमका अर्थ असा नाही…” या लोकांनी पवित्र शास्त्रातील अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. जर ते फिलिप्पैकरांस पत्र ४:४, “प्रभूमध्ये सदैव आनंद करा,” यासारख्या वचनावर आले, तर ते म्हणतात, “याचा अर्थ चोवीस तास आनंद करा असे नव्हे. याचा अर्थ सर्वसाधारणपणे किंवा बहुतेक वेळा आनंद करा असा आहे”. फिलिप्पैकरांस पत्र ४:६ मध्ये जेव्हा म्हटले आहे की, "कशाचीही चिंता करू नका," तेव्हा ते म्हणतात, "याचा अर्थ 'कशाचीही नाही' असा नाही. याचा अर्थ सर्वसाधारणपणे असा आहे की, तुम्ही चिंता करणे टाळावे."१थेस्सलनीकरांस पत्र ५:१८ मध्ये जेव्हा म्हटले आहे की, "आपण प्रत्येक गोष्टीत आभार मानावेत, कारण ख्रिस्त येशूमध्ये हीच देवाची इच्छा आहे," तेव्हा ते म्हणतात, "याचा अर्थ खरोखरच प्रत्येक गोष्टीत करा असा नाही."

अंतिम दिवशी जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तासमोर उभे राहाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की देवाने जे म्हटले, त्याचा नेमका तोच अर्थ होता. ख्रिस्ताने जे म्हटले, त्याचा नेमका तोच अर्थ होता. जर तुम्ही पवित्र शास्त्रामधील या शब्दांवर विश्वास ठेवत नसाल, तर तुम्ही प्रामाणिकपणे ते शब्द खोडून टाका किंवा पवित्र शास्त्रामधील ती पाने फाडून टाका.

जर तुम्ही पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असे म्हणता, पण त्याचे पालन करत नाही, तर तुम्ही अप्रामाणिक आणि ढोंगी आहात. देव या ढोंगीपणाचा न्याय करणार आहे. देवाला प्रामाणिक व्यक्ती आवडते. माझा विश्वास आहे की देव अनेक नास्तिकांवर ढोंगी ख्रिस्ती लोकांपेक्षा जास्त प्रेम करतो, कारण ते प्रामाणिक असतात. ते देव आहे यावर विश्वास ठेवत नाहीत. जणू काही देव अस्तित्वातच नाही, अशाप्रकारे ते वागतात. जगातला व्यापारी म्हणतो की पैशाशिवाय दुसरा देव नाही. तो पैशाची पूजा करतो आणि तो प्रामाणिक असतो. पण ख्रिस्ती लोक, जे म्हणतात की येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे आणि पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे, जर ते त्या ऐहिक लोकांसारखे जगत असतील, तर ते ढोंगी आहेत. लक्षात ठेवा की जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर होता, तेव्हा त्याने इतर कोणापेक्षाही जास्त ढोंगी लोकांचा निषेध केला. व्यभिचारिणी वाचली. वधस्तंभावरचा चोर वाचला. खुनी वाचला. पण ढोंगी लोक नरकात गेले.