WFTW Body: 

देवाचे यज्ञ हे एक भग्न आणि अनुतप्त हृदय आहे, ज्या हृदयाला स्वत:च्या शून्यतेची व असहायतेची जाणीव आहे (स्तोत्र ५१:१७). हाबेलाकडे हेच होते आणि जे काईनाकडे नव्हते. आणि म्हणूनच असे लिहिले आहे की, "परमेश्वराला हाबेलाबद्दल आदर होता, आणि (म्हणून) त्याच्या अर्पणाबद्दल ...... पण परमेश्वराला काईनाबद्दल आदर नव्हता आणि (म्हणून) त्याच्या अर्पणाबद्दलही त्याला आदर नव्हता (उत्पत्ती ४:४,५).

विश्वास म्हणजे आत्म्याचे देवावरचे असहाय्य अवलंबित्व आहे आणि "विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला."(इब्री ११:४).त्यामुळे हाबेलाची अर्पणे देवाला मान्य होती.

हाबेल आणि काईन यांच्यात ज्या गोष्टीमुळे फरक पडला, तो म्हणजे हाबेलाने रक्त अर्पण केले आणि काईनाने तसे केले नाही, या शिक्षणात मोठी फसवणूक झाली आहे. अशा शिकवणुकींचा असा वापर केला जातो, की येशूचे रक्त देवासमोर सादर करण्याने मनुष्य देवाला मान्य होतो. जणू काही माणसाचा जगण्याचा मार्ग आणि त्याच्या हृदयाची अवस्था (ते भग्न असो वा नसो, मग त्यात विश्वास असो वा नसो) याने काही फरक पडत नाही. तो फक्त येशूच्या रक्ताची याचना करतो, जणू काही ती जादूची किल्ली आहे आणि तो देव त्याला स्वीकारतो. हे खोटे असून त्यातून अनेकांची फसवणूक होत आहे.

येशूच्या रक्तावर कोणीही आणि सर्वजण दावा करू शकत नाही. शास्त्रवचनात असे म्हटलेले नाही की, येशूचे रक्त कोणालाही व सर्वांना त्यांच्या पापांपासून मुक्त करू शकते. नाही. हा शास्त्रवचनांतील एक धूर्तपणे केलेला विपर्यास आहे. शास्त्रवचनात असे म्हटले आहे, की येशूचे रक्त त्या सर्वांना शुद्ध करेल जे "देव प्रकाशात आहे तसे प्रकाशात चालतात" (१ योहान १:७).देवाच्या प्रकाशात चालण्याकरता, हाबेलाप्रमाणे, आपले हृदय भग्न व अनुतप्त असले पाहिजे. तरच एखाद्याचे अर्पण देवाला मान्य होऊ शकते.

जर एखाद्या मनुष्याने असे म्हटले की, येशूच्या रक्तावर त्याचा भरवसा आहे, पण त्याच्यात गर्विष्ठ व उद्धट मनोवृत्ती आहे, तर देव त्याचा प्रतिकार करील व त्याचा विरोध करील (१ पेत्र ५:५), जसा त्याने काईनाला केला. केवळ नम्र मनुष्यच देवाकडून कृपा प्राप्त करतो (याकोब ४:६).

आपली उपासना, प्रार्थना आणि सेवा यांचे अर्पण केवळ तेव्हाच देव मान्य करतो, जेव्हा ते विश्वासाच्या भग्न आणि अनुतप्त हृदयातून (जे देवावर नम्रपणे अवलंबून राहणारे आहे) आले असेल. आपल्या अस्खलित बोलण्याकडे किंवा आपल्या सेवेच्या कार्यक्षमतेकडे देव पाहत नाही, तर आपल्या अंतःकरणाची मनोवृत्ती पाहतो. उत्पत्ती ४ मधील या घटनेतून आपण शिकू शकणारा हा पहिला धडा आहे.

काईन व हाबेल यांच्या काळापासून आणि काळाच्या शेवटापर्यंत, देवाचे यज्ञ नेहमीच एक भग्न व अनुतप्त मनोवृत्ती राहिले आहेत. तो बदलत नाही. त्याचे नियम तसेच आहेत.

काईनाने कोकरू आणून त्याचे रक्त सांडले असते तरीसुद्धा देवाने काईनाचा स्वीकार केला नसता, कारण त्याचे अंतःकरण गर्विष्ठ व चढेल होते.

अंतःकरणाची नम्रता ही तारणाची पहिली पायरी आहे. मग आपण प्रकाशात येऊ शकतो आणि आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करण्यासाठी येशूचे रक्त मागू शकतो.

पौलासारखे विजयाच्या आरोळीसाठी केवळ नम्र मनुष्यच ओरडू शकतो, "देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?" (रोम ८:३१). कारण देव केवळ नम्रांच्या बाजूने आहे. गर्विष्ठ असे म्हणू शकत नाही, कारण देव त्यांच्याविरुद्ध आहे. काईनाप्रमाणे ज्याच्या मनात स्वतःविषयी उच्च विचार आहेत, तो देखील काइनाप्रमाणे येशूच्या रक्तावर दावा करत राहिला तर त्याचा शेवट काईनासारखाच होईल. "फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल." (गलती ६:७).आणि तो नियम पक्षपात न करता सार्वत्रिकरीत्या लागू होतो.