उत्पत्ति १३:७ मध्ये आपण वाचतो की, अब्राहामाच्या सेवकांमध्ये आणि लोटाच्या सेवकांमध्ये भांडणे होऊ लागली. अब्राहाम आणि लोटाने मिसर देशाच्या प्रवासातून प्रचंड संपत्ती मिळवली होती आणि आता ती संपत्ती त्यांच्यात समस्या निर्माण करत होती. संपत्ती नेहमीच समस्या निर्माण करते. लोट आणि त्याच्या पत्नीने मिसर देशात जे पाहिले त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यांना अधिक पैसे कमवायचे होते. पण अब्राहाम असा माणूस होता जो कधीही कोणाशीही भांडत नव्हता. पण त्याचे सेवक भांडले .
“अब्राहामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी ह्यांची वस्ती होती.” हे शेवटचे वाक्य त्या वचनात का समाविष्ट केले आहे? कारण ते परराष्ट्रीय लोक ही भांडणे पाहत होती. हे आजच्या ख्रिस्ती जगातील परिस्थितीशी देखील खूप मिळते-जुळते आहे. परराष्ट्रीय लोक आपल्या सभोवती राहत असतात, आणि त्यांना काय दिसते ? ख्रिस्ती लोक एकमेकांशी भांडत आहेत. या ख्रिस्ती लोकांमध्ये आपल्याला आज अब्राहामासारखा ईश्वरीय माणूस सापडेल का? जो लोटाला (पैशावर प्रेम करणारा जगिक माणूस) बोलावेल आणि म्हणेल, “माझ्यातुझ्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत" (उत्पत्ति १३:८). ते दोघे एकमेकांचे भाऊ नव्हते. अब्राहाम काका होता; आणि लोट त्याचा पुतण्या होता. ७५ वर्षांच्या या वृद्ध माणसाने त्याच्या ३५ वर्षांच्या पुतण्याला किती दयाळूपणे वागवले ते पहा. "तो त्याला म्हणाला, आपण भाऊ आहोत!" एक धार्मिक माणूस नम्र असतो. तो ७५ वर्षांचा होता, पण तो त्याच्या तरुण पुतण्याकडे पाहून म्हणू शकत होता की, “आपण भाऊ आहोत. आपण दोघे समान आहोत. मी तुला प्रथम संधी देईन. तु तुझ्यासाठी आधी निवड कर.” यरुशलेम अशा माणसांनी बनले आहे. ख्रिस्ती जगाला अशा नेत्यांची गरज आहे- आणि ते सहजासहजी सापडणे कठीण आहे.
आज, आपल्याकडे असे अनेक नेते आहेत जे आपला अधिकार गाजवतात, जे असे म्हंटले असते की, "मी ७५ वर्षांचा आहे, मी तुझा काका आहे. मी तो आहे ज्याला देवाने बोलावले आहे, तुला नाही. तु फक्त माझ्यासोबत आला आहेस." पण अब्राहाम लोटाशी असे बोलला नाही. तो लोटाला म्हणाला, “जर तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. आणि जर तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन. तुला जे हवे आहे ते तू आधी निवड”. आणि लोट, जो लोभी माणूस होता, बाबेलच्या आत्म्याने, त्याने प्रथम हिसकावले. त्याने सदोमच्या सुंदर शेतांकडे पाहिले, तेथे पैसे कमविण्याची असलेली संधी आणि तेथे राहणारे श्रीमंत लोक पाहिले आणि म्हणाला, “मी तिथे जाईन आणि तिथे देवाची सेवाही करेन.”
अनेक ख्रिस्ती लोकांना आणि ख्रिस्ती नेत्यांना श्रीमंत देशांमध्ये स्थलांतरित व्हायला आवडते. परंतु जवळजवळ नेहमीच, ते आत्मिक रित्या गमावतात. जेव्हा अब्राहाम हा निर्णय घेत होता तेव्हा, तो आणि लोट काय करत आहेत हे पाहण्यासाठी परमेश्वर तेथे उतरला होता (जसे बाबेलमध्ये झाले). आणि अब्राहाम ज्या ईश्वरीय पद्धतीने वागला ते देवाने पाहिले. लोट त्याला सोडून गेल्यानंतर लगेचच, परमेश्वराने अब्राहामाला खूप महत्वाचे काहीतरी सांगितले (उत्पत्ति १३:१४).
देवाने प्रथम त्याला त्याच्या वडिलांपासून (मृत्यूद्वारे) वेगळे केले, आणि नंतर त्याने अब्राहामाला त्याच्या आणखी दुसऱ्या नातेवाईकापासून वेगळे केले (जो त्याच्या लोभामुळे त्याच्यासाठी अडथळा ठरला असता). परमेश्वर म्हणाला, "आता तू एकटा आहेस आणि आता मी तुला माझ्या इच्छेनुसार जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाऊ शकतो आणि मला तुला जे बनवायचे आहे ते बनवू शकतो. नेमके काय घडले ते मी पाहिले आहे." तुम्हाला माहिती आहे का की, देव लोकांमध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहार पाहतो? तो आपल्या वृत्तींवर लक्ष ठेवतो. तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमचा अधिकार सोडला आहे का? देव तुम्हाला म्हणतो की, "मी त्याची नोंद घेतली आहे."
मग देव अब्राहामाला म्हणाला, "फक्त येथे उभे राहा आणि उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. जो हा प्रदेश तुला दिसत आहे, तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी वचन देतो. तो लोटाच्या वंशजांचा होणार नाही. देवाने ४००० वर्षांपूर्वी अब्राहामाला असे म्हटले होते. ४००० वर्षांनंतर आज त्या भूमीकडे पहा आणि स्वतःला विचारा की तिथे कोण राहत आहे. अब्राहामाचे वंशज, लोटाचे वंशज नाहीत. देव त्याचे वचन पाळतो. हजारो वर्षे निघून गेली असतील, परंतु जर देवाने अब्राहामाला असे म्हंटले असेल, "हा सर्व देश तुझ्या संततीला मी कायमचा देईन." (उत्पत्ति १३:१५), तर ते अगदी तसेच होईल.
मग आपण अध्याय १४ मध्ये पाहतो की लोट कसा संकटात सापडला. देवाच्या इच्छेबाहेर गेल्यावर तुम्ही नेहमीच अडचणीत सापडाल. त्याला त्याच्या शत्रूंनी पकडले. अब्राहाम म्हणू शकला असता की, "त्याच्याबरोबर असेच घडायला हवे होते. त्या माणसाने माझ्याकडून काहीतरी हिसकावून घेतले होते". पण अब्राहामाने अशी प्रतिक्रिया दिली नाही. इथे पुन्हा एकदा अब्राहामाची परीक्षा होताना आपल्याला दिसते: जेव्हा अब्राहाम ऐकतो की त्याला फसवणारा माणूस अडचणीत आला आहे तेव्हा त्याची वृत्ती कशी असेल? जेव्हा तुम्हाला फसवणारा कोणी स्वतः अडचणीत येतो, तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही देवा बरोबर चालणारे आहात - किंवा नाही.
अब्राहामाची प्रतिक्रिया होती की, "मला जाऊन लोटाला मदत करू दे. लोटाने मला फसवले आहे हे खरे आहे. पण त्याने मला कश्यात फसवले? पृथ्वीवरील कचऱ्यासामान असलेल्या संपत्तीत? ते तर काहीच नाही आहे. माझ्याकडे स्वर्गीय संपत्ती आहे. मला लोटाबद्दल वाईट वाटते कारण तो पृथ्वीवरील गोष्टींच्या मागे लागला होता आणि आता तो संकटात सापडला आहे. मला जाऊन त्याला मदत करू दे." आणि अब्राहाम गेला आणि त्याने स्वतः लोटाला वाचवले. ही एका ईश्वरीय माणसाची वृत्ती आहे. फक्त असे लोकच येरुशलेम बांधू शकतात.