मत्तय ५:४२ मध्ये आपण वाचतो की, “जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको”. कधीकधी शास्त्रवचनांची तुलना शास्त्रवचनांशी केल्याने आपल्याला गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजतात, म्हणून हे वचन उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एका समांतर वचनाकडे पाहिले पाहिजे. येशूने लूक ६:३५ मध्ये म्हटले आहे, “काहीही परत मिळण्याची अपेक्षा न ठेवता उसने द्या.”
मला आठवते की एकदा एक भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला की, त्याने दुसऱ्या एका भावाला तीन हजार रुपये उसने दिले होते, ज्याने ते परत करण्याचे वचन दिले होते. बराच काळ लोटला तरी त्या भावाने त्याला ते पैसे परत केले नाही. मी त्या भावाला सांगितले की तू पवित्र शास्त्राचे उल्लंघन केले आहे, कारण पवित्र शास्त्र म्हणते की, “बदल्यात काहीही परत मिळणार नाही या अपेक्षेने उसने द्या.” जर तुम्ही काहीतरी परत मिळण्याच्या अपेक्षेने उसने देत असाल, तर त्यात तुमचे काय श्रेय आहे? पापी लोकसुद्धा तेवढीच रक्कम परत मिळवण्यासाठी पापी लोकांना उसने देतात (लूक ६:३४). पण जेव्हा तुम्ही एक विश्वासणारा म्हणून उसने देता, तेव्हा तुम्ही वेगळे असले पाहिजे - बदल्यात काहीही परत मिळण्याची अपेक्षा करू नका.
येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, तुम्ही फक्त तेवढीच रक्कम उसने म्हणून द्यावी, जी तुम्ही देणगी म्हणून देऊ शकाल. म्हणून, मी या भावाला सांगितले की, जेव्हा त्या भावाने तुझ्याकडे तीन हजार रुपये उसने मागितले, तेव्हा त्याने ते कदाचित द्यायला नको होते. त्याने म्हणायला हवे होते, “माफ कर, मी तुला तीन हजार रुपये देऊ शकत नाही, पण मी तुला ५०० देऊ शकेन.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जेवढी रक्कम तुम्हाला परत कधीच मिळाली नाही तरी चालेल याची तुम्हाला खात्री असेल, तेवढेच पैसे उसने म्हणून द्या. ती एक देणगी आहे असे समजा, आणि जर त्याने ते परत केले नाही, तर विषय संपला. पण जर तुम्ही तसे केले नाही, तर तुम्ही पवित्र शास्त्राचे उल्लंघन केले आहे. आपल्याला या गोष्टींमागील आत्म्याचा हेतू समजून घेणे आवश्यक आहे.
जेव्हा येशू म्हणाला, “जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो, त्याला पाठमोरा होऊ नको,” तेव्हा त्याचा अर्थ काय होता? जेव्हा मी एक तरुण ख्रिस्ती होतो, तेव्हा मी नौदल अधिकारी म्हणून खूप पैसे कमवत होतो (माझ्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त) आणि माझ्याकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसे होते. मंडळीत एक गरीब भाऊ होता, ज्याला हे माहीत होते आणि तो माझ्याकडे पैसे उसने मागायला यायचा. मी त्याला विचारले की त्याला किती पैसे हवे आहेत आणि तो ते पैसे एका महिन्यात परत देण्यास तयार झाला. पुढचा महिना आला आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तो अजूनही उसने घेतलेले पैसे परत करू शकत नाही आणि त्याने आणखी पैसे मागितले, म्हणून मी त्याला आणखी पैसे दिले. माझ्या मनात हे वचन होते, “जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो, त्याला पाठमोरा होऊ नको,” आणि मी त्याला महिनेच्या महिने पैसे देत राहिलो. मी शास्त्रवचनांचे पालन करत आहे असे समजून मी गप्प राहिलो. मी एक तरुण, नुकताच बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्ती होतो आणि मला जेवढे शास्त्रवचन माहीत होते त्याप्रमाणे मी शास्त्रवचनांनुसारच वागत होतो, पण काही काळानंतर ज्या व्यक्तीने हे पैसे घेतले होते, ती व्यक्ती विश्वासापासून भरकटली आणि दारू व इतर वाईट सवयींच्या आहारी गेली. जेव्हा मी ते ऐकले, तेव्हा मी त्याला पत्र लिहून कळवले की, जर त्याने ते पैसे दारू विकत घेण्यासाठी आणि सैतानाच्या राज्याला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरले असतील, तर त्याने ते पैसे मला परत करावेत, कारण हे पैसे देवाच्या राज्यासाठी वापरायचे होते. तो माझ्यावर खूप रागावला आणि म्हणाला की, मृत झालेले संप्रदाय सुद्धा माझ्यासारखे मागत नाही.
आणि प्रभूने मला ते विसरून जाण्यास सांगितले. मी त्याला कधीच परत पत्र लिहिले नाही आणि मला ते पैसे कधीच परत मिळाले नाहीत. मी विचार केला, “प्रभू, मी काय चूक केली? मी तुझ्या शास्त्रवचनाचे पालन केले, ज्यात म्हटले आहे, ‘जो तुझ्याकडून उसने घेऊ इच्छितो, त्याला पाठमोरा होऊ नको.” आणि प्रभूने मला अशी एक गोष्ट शिकवली, ज्या गोष्टीची मला या ५० वर्षांमध्ये खूप मदत झाली. ती म्हणजे, तुम्ही शास्त्रवचनांची तुलना दुसऱ्या शास्त्रवचनांशी केली पाहिजे. प्रभूने मला दाखवून दिले की मी त्या पैशांचा वापर माझे स्वतःचे पैसे असल्यासारखा करत होतो. एका शास्त्रवचनात म्हटले आहे की जो मागतो त्याला मी उसने दिले पाहिजे, पण दुसरे एक शास्त्रवचन आहे जे सांगते की माझ्याजवळ जे काही आहे ते माझे नाही - पृथ्वीवरील सर्व काही प्रभूचे आहे. “पृथ्वी आणि तिजवर जे काही आहे ते परमेश्वराचे आहे” (१करिंथकरांस पत्र १०:२६). म्हणून, जेव्हा मला माझा पगार मिळतो, तेव्हा तो माझा नाही असे मी समजले पाहिजे; मी त्याचा त्याग केला पाहिजे. मी तो परमेश्वराला दिला पाहिजे. जरी मला महिन्याच्या पहिल्या तारखेला माझा पगार मिळत असला आणि तो माझ्या बँक खात्यात जमा होत असला, तरी मी हे म्हटले पाहिजे की ते माझे पैसे नाहीत; ते देवाचे पैसे आहेत.
त्यावेळी माझ्या मनात एक उदाहरण आले : जर एखाद्याने माझ्याजवळ ५००० रुपये ठेवण्यासाठी दिले जे मला त्याला परत करायचे आहेत, आणि त्याच वेळी दुसरी व्यक्ती माझ्याकडे येऊन म्हणाली की, त्याने ऐकले आहे की माझ्याकडे ५००० रुपये आहेत आणि त्याने माझ्याकडून त्यातील ३००० रुपये उसने मागितले, तर मी काय म्हणेन? मी म्हणेन, “माफ कर बंधू; ते माझे पैसे नाहीत, ते दुसऱ्या कोणाचे तरी आहेत. त्याने फक्त ते माझ्याकडे सांभाळून ठेवण्यास दिले आहे. मी त्याला त्याबद्दल विचारतो आणि जर त्याने मला ते तुला देण्याची परवानगी दिली, तर मी ते तुला देईन.” ते माझे पैसे नसल्यामुळे, ही परिस्थिती हाताळण्याचा हाच योग्य नैतिक मार्ग नाही का? जर मी माझ्या पगाराला परमेश्वराचे पैसे मानले असते, तर मी ते इतक्या सहजपणे वाटून टाकले नसते. जेव्हा तो भाऊ माझ्याकडून पैसे उसने घ्यायला आला होता, तेव्हा मी असे म्हणायला हावे होते की, “हो, ठीक आहे; गरजू व्यक्तीला उसने देणे योग्यच आहे, पण ज्याचे हे पैसे आहेत त्याला (या बाबतीत, प्रभूला) जाऊन मला विचारू दे. जर मी परमेश्वराला विचारले असते, ‘प्रभू, मी हे पैसे या व्यक्तीला देऊ का?” कदाचित प्रभूने मला हो किंवा नाही म्हटले असते.
देव बोलतो; तो जिवंत देव आहे. कदाचित पहिल्यांदा त्याने हो म्हटले असते आणि दुसऱ्यांदा त्याने कदाचित नाही म्हटले असते, पण मी ऐकण्यासाठी थांबलो नाही. मी नियमांचे शब्दशः अर्थाने पालन केले आणि बंधनात अडकलो, पण मला खूप आनंद आहे की मी माझ्या आयुष्यात खूप लवकर शास्त्रवचनांचे पालन कसे करावे याचा धडा शिकलो – “असे लिहिले आहे” आणि “असेही लिहिले आहे.” हे समजून घेण्यासाठी मला शास्त्रवचनांची शास्त्रवचनांशी सांगड घालण्याची गरज आहे. जसे येथे लिहिले आहे, त्याचप्रमाणे आज जो कोणी माझ्याकडे मागेल त्याला उसने देण्यास मी तयार आहे. पण मला हेही मान्य करायचे आहे की, माझ्याकडे जे काही आहे ते सर्व प्रभूचे आहे, म्हणून मी प्रभूला विचारल्याशिवाय ते देऊ शकत नाही आणि नंतर जेव्हा लोक माझ्याकडे पैसे मागायला आले, तेव्हा मी हेच केले. मी आता म्हणतो, “मी प्रभूला विचारतो; जर माझ्या आत्म्यात शांती असेल, तर मी ते तुम्हाला देईन.” आणि असेही प्रसंग आले आहेत की मी दिले आणि मला ते कधीच परत मिळाले नाही, आणि असेही प्रसंग आले आहेत की मी दिले नाही कारण प्रभूने मला देण्याचे स्वातंत्र्य दिले नव्हते, पण माझे हृदय इच्छुक होते.
येशूने या सर्व गोष्टी कोणत्या भावनेने सांगितल्या आहे, हे आपण कसे समजून घेतले पाहिजे याचे हे एक उदाहरण आहे. याचा अर्थ असा नाही की आपण लोकांना आपल्याशी पायपुसण्यासारखे वागू द्यावे. तत्त्व हे आहे की आपण कोणाचाही सूड घेऊ नये आणि ज्याने आपल्याला दुखावले आहे त्याची परतफेड करण्याची इच्छा बाळगू नये.