लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

जर तुम्ही सतत असे समजत राहिलात की देवाने तुम्हांला स्वीकारण्याइतपत तुम्ही चांगले नाही, तर आयुष्य जगणे तुमच्यासाठी अतिशय कष्टमय होईल. याप्रकारे आपण कधीही कण्हू नये, तर त्याऐवजी देवाचे आभार मानावेत की तुम्ही जसे आहात तसेच त्याने तुम्हांला स्विकारले आहे - ख्रिस्तामध्ये.

जेव्हा जेव्हा तुम्ही देवाने आपल्याला ज्या सर्व गोष्टींतून नेले त्याबद्दल विचार करता तेव्हा प्रत्येक वेळी परमेश्वराचे आभार माना आणि स्तुती करा. तक्रार करणे आणि कुरकुर करण्याबद्दलचे सर्व विचार गलिच्छ, लैंगिक विचारांच्या समान लेखले पाहिजेत - ते पूर्णपणे टाळण्यासाठी.

जर तुमची 'निर्मूलन प्रणाली' योग्यरित्या कार्य करत असेल तर बाहेरून येणारी कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही दूषित करू शकत नाही (मार्क 7:18-23). आपल्याला बर्‍याच बाह्य गोष्टींकडे अंध आणि बहिऱ्या व्यक्तीप्रमाणे दुर्लक्ष करण्याची सवय विकसित करावी लागेल (यशया 42:19,20) आपण जे सर्व काही पाहतो आणि ऐकतो त्याचे आपण प्रथम वर्गीकरण केले पाहिजे. त्यातील बर्‍याच गोष्टी ताबडतोब आपल्या मनातून काढून टाकल्या पाहिजेत - उदाहरणार्थ, इतरांनी आपल्याला पोहोचवलेली इजा, भविष्याबद्दलचे चिंताग्रस्त विचार इत्यादी. यानंतरच आपण सर्व परिस्थितीत विसाव्यात राहाण्यास सक्षम असाल आणि परमेश्वराची स्तुती कराल.

येशू आम्हांला प्रशंसा व आनंदाचा आत्मा देण्यासाठी आला आहे (यशया 61:1-3) त्याने स्वत: कालवरीवर जाण्यापूर्वी एक स्तोत्र गायले (मत्तय 26:30). आणि आता तो मंडळीमध्ये प्रमुख गायक आहे (इब्री लोकांस पत्र 2:12).

जेव्हा आपण देवाची स्तुती करतो, तेव्हा आपण आपल्या अंत:करणात त्याच्यासाठी राजासन उभे करतो (स्तोत्र 22: 3) आमच्या विश्वासाचा पुरावा हा आहे की आम्ही त्याची स्तुती गातो (स्तोत्र 106:12). अशा प्रकारे आपण हे सिद्ध करता की आपला असा विश्वास आहे की देव विश्वाच्या राजासनावर बसला आहे आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या ठळक परवानगीने घडत आहेत. ("परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे" - ईयोब 23:10).

पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या सार्वभौमत्वाबद्दल सर्वांत परिपूर्ण विधान नबुखदनेस्सराने, देवाने त्याला शिस्त लावल्यानंतर केले होते. तो म्हणाला, "भूतलावरील सर्व रहिवासी त्यास शुन्यवत आहेत. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, कोणीही त्यास थांबवू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की “तू हे का केले?" (दानीएल 4: 35). नबुखदनेस्सर तेव्हाच असे म्हणाला जेव्हा त्याची "बुद्धिमत्ता परत मिळाली" (दानीएल 4:36) आणि प्रत्येक सूज्ञ विश्वासणारा यावरच विश्वास ठेवेल. देवाची अशी इच्छा आहे की आपल्यातही हाच विश्वास असावा. असे विश्वासणारे प्रत्येक वेळी आणि प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती करतील.

जेव्हा मुख्य याजक व शास्त्री यांनी अशी तक्रार केली की बालके मंदिरात मोठ्याने स्तुतीच्या घोषणा देत गोंगाट करत आहेत, तेव्हा येशू म्हणाला की स्तुती खरोखरच केवळ बालकांकडूनच केली जाऊ शकते (मत्तय 21:16, स्तोत्र 8:2 उद्धृत करत - "बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.") हे आपल्याला शिकवते की आपली स्तुती देवाला मान्य होण्यासाठी आपण वापरत असलेले शब्द नव्हे तर नम्रता आणि अंतःकरणाची शुद्धता ही महत्वाची आहेत (कारण बाळांमध्ये याच गोष्टी असतात).

मुले कधी कुरकुर करीत नाहीत किंवा तक्रारही करत नाहीत - आणि ही आणखी एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपली स्तुती देवाला मान्य होते. जेव्हा आपल्या आयुष्यात सकाळी, दुपारी किंवा रात्री, आठवड्याचे सातही दिवस, वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात कुरकुर किंवा तक्रारीचा लवलेशही नसेल, तेव्हाच आपली स्तुती फक्त रविवारच्या दिवशी केला जाणारा विधी नसून, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असेल आणि देव अशा स्तुतीने आनंदित होतो - जरी आपण सूरात गाऊ शकलो नाही तरीही !!