आपण २ राजे २:२० मधून शिकतो की देव एका नवीन पात्राच्या शोधात आहे.
देव सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी नवीन पद्धतींचा शोध घेत नाही, किंवा तो या जगात नवीन संस्था शोधत नाही. परमेश्वर मिठाने भरलेल्या नवीन पात्रांच्या शोधात आहे ज्याद्वारे तो आपले उद्देश पूर्ण करू शकेल. देव स्वतः या जगात सुवार्ता प्रसार करणार नाही. देवाची इच्छा असती, तर या जगाला सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी तो स्वर्गातून गर्जना करू शकला असता. पण तो त्याचा मार्ग नाही. त्याला ते मीठ मानवी पात्रात टाकायचे आहे आणि नंतर ते जमिनीवर ओतायचे आहे.
अलीशाने ते मीठ आपल्या हातात घेऊन बाहेर ओतले असते. पण त्याने तसे केले नाही. त्याने एक नवीन पात्र घेतले, त्यात मीठ भरले आणि मग ते मीठ पाण्यावर ओतले. जमीन आणि पाणी एकाच वेळी बरे झाले. देव करो, की आपण धन्याच्या उपयोगाकरता योग्य असलेली पात्रे बनण्यास तयार होऊ, या जगातील सर्व गोष्टींपासून रिकामे होऊ आणि ख्रिस्ताने भरलेले असू.
एक गोष्ट तुमच्या लक्षात यावी अशी माझी इच्छा आहे: पात्रात मीठ भरल्यानंतर अलीशाने ते मीठ पात्रात राहू दिले नाही - त्याने ते ओतले.
देव तुमचे आणि माझे जीवन भरतो, केवळ अशासाठी की, आपल्याला इतरांच्या सेवेत ओतण्यात यावे. आपल्याला पवित्र आत्म्याने भरून टाकावे आणि आपल्याला एखादा किंवा दुसरा आध्यात्मिक आशीर्वाद द्यावा अशी आपण बऱ्याच काळापासून देवाकडे याचना करत असू. पण कदाचित, आपण या गोष्टी फार स्वार्थी कारणाने मागत आलो असू. देव आपल्याला त्याच्या स्वर्गीय मिठाने भरून टाकणार नाही, ज्यामुळे कदाचित आपण किती आध्यात्मिक आहोत हे इतरांना दाखवत फिरू.
आपण यशया ५३:१२ मध्ये प्रभू येशूबद्दल वाचतो की, त्याने आपला जीव मरणापर्यंत ओतून दिला. यामुळे आज तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होऊ शकते. आपणही इतरांच्या सेवेत ओतले जाण्यासाठी तयार असले पाहिजे. नाहीतर जमीन कधीच बरी होणार नाही. आपण पाण्याने भरलेली पाण्याची टाकी होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपण अशा वाहिन्या बनावे अशी त्याची इच्छा आहे, ज्याद्वारे जिवंत पाण्याच्या नद्या इतरांकडे वाहू शकतात. देव अशा प्रकारची पात्रे शोधत आहे - जे ओतले जाण्यास तयार आहेत.
परमेश्वराचे डोळे संपूर्ण पृथ्वीभर, अशा प्रकारच्या पात्रांचा शोध घेत इकडे-तिकडे धावतात. तुम्ही सुशिक्षित नसलात तरी हरकत नाही. २ इतिहास ७:१४ मधील शिक्षणाविषयी आपण काहीही वाचत नाही. आयुष्यातला एकही दिवस तुम्ही कधी शाळेत गेला नसाल तरी हरकत नाही. तुम्ही संपूर्ण जगातला सर्वात गरीब माणूस असलात, किंवा सर्वात मूर्ख असलात तरी काही फरक पडत नाही. देव या गोष्टींचा मुळीच शोध घेत नाही. तो पवित्र शास्त्राचे-ज्ञान किंवा पवित्र शास्त्राच्या शाळांमधून पदविका शोधत नाही. तो दुसरे काहीतरी शोधत आहे.
तो म्हणतो: "माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माझ्या लोकांनी जर नम्र होऊन प्रार्थना केली, आणि माझे मुख शोधले व आपला दुष्ट मार्ग सोडला, तर मी त्या देशाला बरे करण्यासाठी त्यांचा उपयोग करीन."
तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही. देव पक्षपात करत नाही. जर तुम्ही या अटी पूर्ण करण्यास तयार असाल आणि इतरांसाठी ओतले जाण्यास तयार असाल, तर मग तुम्ही कोणीही असलात तरी देव तुमचा उपयोग करील.