लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

मत्तय 13:1-52 मध्ये आपण येशूने सांगितलेले सात दाखले वाचतो. त्यांना स्वर्गाच्या राज्याचे दाखले म्हटले जाते. पहिला दाखला पेरणाऱ्याचा दाखला होता. या अध्यायात लक्षात घ्या की येशू स्वर्गाच्या राज्याच्या बाह्य अभिव्यक्तीविषयी बोलला - जगातील लोक ज्या प्रकारे “मंडळी" कडे पाहतात. म्हणूनच त्याने म्हटले की स्वर्गाच्या राज्यात अंतःकरणातील जमीन चांगली व वाईट असणारे लोक आहेत.

येशू असेही म्हणाला की स्वर्गाचे राज्य हे शेतासारखे होते जेथे गहू व निदणही आढळले. त्याने नंतर हे स्पष्ट केले की हे शेत जग होते, मंडळी नव्हे (मत्तय 13:38). काही ख्रिस्ती लोक या दाखल्याचा चुकीचा अर्थ लावून म्हणतात की “येशू म्हणाला गहू व निदण दोन्ही मंडळीमध्ये वाढू दिली पाहिजेत, म्हणून आपण ते वेगळे करू नये. म्हणून आपण परिवर्तन न झालेल्या लोकांना आणि परिवर्तन झालेल्या लोकांना मंडळीमध्ये राहण्याची परवानगी दिली पाहिजे. ते असे म्हणतात कारण त्यांनी शास्त्रवचने नीट वाचली नाहीत. शेत हे जग आहे - आणि येथे देव विश्वासणारे आणि अविश्वासणारे यांना एकत्र वाढू देतो - परंतू मंडळीमध्ये नव्हे. स्थानिक मंडळीमध्ये, आपण हे सुनिश्चित केले पाहिजे (जितपत मानवी दृष्टीला समजते तितपत) केवळ ज्यांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आहे आणि ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ज्यांचा नवा जन्म झाला आहे, त्यांनाच सदस्य बनण्याची परवानगी आहे. इतर लोकांचे उपस्थित राहण्यासाठी आणि संदेश ऐकण्यासाठी स्वागत आहे. परंतु त्यांना हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांचा नवा जन्म होईपर्यंत ते स्थानिक मंडळी - ख्रिस्ताचे शरीर याचा भाग होऊ शकत नाहीत.

मत्तय 13:31-32 हा मोहरीच्या दाण्याविषयी एक दृष्टांत आहे जे साधारणत: फक्त एक लहान वनस्पती होण्यासाठी वाढते. परंतु या प्रकरणात, ते अनैसर्गिकरित्या वाढले आणि एक प्रचंड झाड बनले. देव स्थानिक मंडळी कशा प्रकारे वाढणे इच्छित नाही याचा हा एक दाखला आहे. देवाचा असा हेतू आहे की प्रत्येक स्थानिक मंडळी ही एकमेकांना ओळखणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आणि परिसरातील इतरांना त्याचे जीवन प्रकट करणाऱ्या भावाबहिणींच्या लहान गटासारखी(मोहरीच्या एका लहान वनस्पतीसारखी) असावी. परंतु प्रतिभाशाली उपदेशकांनी देवाच्या योजनेच्या विपरीत, खूप मोठ्या मंडळी (मोठ्या झाडांसारख्या) तयार केल्या आहेत - जिथे लोक फुटबॉलचे सामने आणि चित्रपट पाहण्याप्रमाणे केवळ उपदेश ऐकण्यासाठी येतात. येशू म्हणाला की जीवनाचा मार्ग फारच थोड्या लोकांना सापडेल (मत्तय 7:13,14). पण चतुर उपदेशक पवित्रतेचे निकष कमी करून पश्चात्ताप करण्याविषयी, आत्मत्याग करण्याविषयी आणि स्वतःचा वधस्तंभ उचलण्याविषयीचा सर्व उपदेश टाळून सहजपणे मोठ्या संख्येने लोक जमा करू शकतात. अशा प्रकारे, एखाद्याला अशा लोकांची गर्दी मिळू शकते ज्यांना ख्रिस्ताचे शिष्य होण्यात अजिबात नव्हे परंतु केवळ रविवारी चांगले उपदेश ऐकण्यातच रस आहे. जेव्हा आपण या प्रकारे आपल्या मंडळीचा आकार वाढवाल तेव्हा येशू या दृष्टांतात बोलला त्याप्रमाणे घडते: हवेतले पक्षी (जे येशूने पूर्वीच्या दाखल्यात सांगितले होते जे त्या दुष्टाचे प्रतिनिधीत्व करतात - मत्तय 13:4-19) येऊन झाडाच्या फांदीवर बसतात. परंतु, जर तुम्ही फक्त शिष्य बनवण्याचा प्रयत्न केला असता तर तुमची मंडळी आकाराने लहान राहिली असती परंतु ती शुद्ध आणि सैतानाच्या प्रभावांपासून आणि अशा प्रकारच्या प्रभावांमुळे उद्भवणार्‍या समस्यांपासून मुक्त झाली असती!

मत्तय 13:33 मध्ये, येशू स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे असे सांगतो. स्थानिक मंडळीमध्ये भ्रष्टाचार कसा पसरेल याबद्दलची ही एक भविष्यवाणी आहे.येशू पुन्हा पुन्हा, मंडळीला सामोरे जावे लागणाऱ्या धोक्‍यांविषयी बजावून सांगतो - वाईट जमीन, निदण, मंडळीमध्ये बसलेली भुते आणि खमीर. ख्रिस्ती पुढाऱ्यांनी या दाखल्यांकडे लक्ष दिले असते, तर ते त्यांच्या मंडळ्यांना आध्यात्मिक मृत्यूपासून वाचवू शकले असते - आणि त्यांनी शिष्यत्वावर जोर दिला असता.

मत्तय 13:44 मध्ये येशू म्हणाला की स्वर्गाचे राज्य मनुष्याला, एका शेतात सापडणाऱ्या ठेवीसारखे आहे. त्या माणसाने आपल्याकडे असलेले सर्व काही विकले आणि ते शेत विकत घेतले. येशूचे शिष्य होण्यासाठी आपल्यासाठी मौल्यवान असलेल्या सर्व गोष्टी सोडून देण्यास तयार असलेल्या व्यक्तीचे हे चित्र आहे- आणि अशा प्रकारे त्याने देवाचे राज्य ताब्यात घ्यावे.

येशू अशा एका मनुष्याविषयी देखील बोलला ज्याने आपल्याकडे असलेले सर्व काही विकून अतिमौलवान मोती विकत घेतला, त्याने पुन्हा त्याच सत्यावर भर दिला (मत्तय 13:45). दोन्ही घटनांकडे लक्ष द्या, ‘त्याच्याकडे असलेले सर्व काही.’ येशू म्हणाला, “तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही (लूक 14:33). शिष्य होण्याचा आणि देवाचे राज्य मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

मत्तय 13:47-50 मध्ये, येशू पृथ्वीवरील देवाच्या राज्याच्या बाह्य अभिव्यक्तीविषयी बोलला ज्यात दोन प्रकारचे मासे आहेत - चांगले आणि वाईट. परंतु काळाच्या शेवटी, देवदूत येतील आणि नीतिमानांना दुष्टांपासून वेगळे करतील.