WFTW Body: 

आध्यात्मिक गर्व हा एक मोठा धोका आहे ज्याचा आपल्या सर्वांना नेहमीच सामना करावा लागतो - आणि विशेषत: जेव्हा परमेश्वर आपल्या श्रमांना आशीर्वादित करतो. आपण "कोणी विशेष " बनलो आहोत अशी कल्पना करणे खूप सोपे आहे जेव्हाआपण नेहमीच "कोणीही नाही " असे असतो,. मग देव स्वतः आपल्याला विरोध करील आणि आपल्याविरुद्ध लढेल - कारण देव सर्व गर्विष्ठ लोकांचा, मग ते कोणीही असोत, विरोध करतो. जेव्हा आपल्याला दान मिळते, किंवा जेव्हा आपल्या वैयक्तिक जीवनात आणि कौटुंबिक जीवनात गोष्टी चांगल्या प्रकारे पार पडत असतील , किंवा जेव्हा आपल्या मंडळीची वाढ होत असते किंवा जेव्हा आपण भौतिकदृष्ट्या श्रीमंत होतो, तेव्हा गर्वाने फुगणे खूप सोपे असते. इतर कोणत्याही पापापेक्षा आपल्या आध्यात्मिक गर्विष्ठपणावर आणि स्वार्थीपणावर प्रकाश पडणे गरजेचे आहे. या क्षेत्रांमध्ये स्वत:ला फसवणे आपल्यासाठी खूप सोपे आहे. आपण खरोखरच खूप गर्विष्ठ आणि आत्मकेंद्री असताना आपण अशी कल्पना करू शकतो की आपण खूप नम्र आणि निःस्वार्थी आहोत. सैतान एक मोठा फसवणारा आहे.

आध्यात्मिक गर्विष्ठपणाचे काही पुरावे येथे दिले आहेत जे आपल्याला आपली खरी स्थिती पाहण्यास सक्षम बनवू शकतात: दुखावले जाणे, रागावणे, लैंगिकदृष्ट्या अशुद्ध विचार-पद्धती, चूक कबूल करण्यास तयार नसणे, माफी मागण्यास विलंब करणे, मंडळीमधील आपल्या सहविश्वासणाऱ्या बांधवांसोबत सहभागिता पुन्हा स्थापन करण्यास विलंब करणे इत्यादि .

एक गर्विष्ठ पुढारी आपल्या मंडळीमध्ये हुकूमशहाप्रमाणे वागेल आणि एखाद्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (CEO)आपली कंपनी चालवल्याप्रमाणे ती चालवेल. असा माणूस कधीही एक शरीर म्हणून मंडळीची उभारणी करू शकणार नाही.

आध्यात्मिक गर्व हा शरीर आणि मुखाच्या दुर्गंधीसारखा असतो. आपल्या स्वत:ला त्याचा वास येत नाही परंतु इतरांना त्याचा वास येऊ शकतो. जसे की, मंडळीमधील एखादा वडील जेव्हा आपल्या सेवाकार्याविषयी बढाई मारेल तेव्हा त्याच्यापासून उत्सर्जित होणाऱ्या दुर्गंधीयुक्त आध्यात्मिक गर्विष्ठपणाची त्याला जाणीव होत नाही. परंतु सुभक्ताला त्याच्यातील आध्यात्मिक गर्व लगेच जाणवेल.

एखाद्या पुढाऱ्याची गर्विष्ठ मनोवृत्ती त्याच्या मंडळीला बाबेलची मंडळी बनवेल, जशी मनोवृत्ती आपण नबुखदनेस्सराची पाहिली (दानीएल ४:३०), देवाने त्याला नम्र केले आणि ताबडतोब त्याला नाकारले.

आध्यात्मिक गर्विष्ठपणामुळे वयाने मोठे असणारे बंधू आणि स्वतः देवाने ज्यांना साक्ष दिली आहे त्यांच्याबद्दल आदराचा अभाव निर्माण होईल. असा पुढारी आपल्या मंडळीमधील इतरांनी त्याच्या अधीन व्हावे अशी अपेक्षा करेल, पण देवाने त्याच्यावर ठेवलेल्या कोणत्याही आध्यात्मिक अधिकाराच्या अधीन राहण्यास तो तयार नसेल.शेवटल्या दिवसांत ख्रिस्ती लोकांमध्ये या आदराच्या अभावाचे प्राबल्य वाढत जाईल. आजकाल अनेक मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये - ते ज्या प्रकारे मोठ्या, सुभक्त बंधूशी बोलतात - हे आपण आपल्या सभोवताली पाहतो.

दियत्रेफसाचे उदाहरण (३ योहान १:९) आणि योहानाने लिहिलेल्या मंडळीच्या पाच मागे फिरलेल्या वडिलांची उदाहरणे (प्रकटीकरण २ व ३) आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहेत. आपण आधी पाहिल्याप्रमाणे, जर त्या पुढाऱ्यांनी स्वत:चा न्याय केला असता, तर देवाने स्वत:च त्यांना त्यांचा दोष दाखवून दिला असता. तेव्हा प्रेषित योहानाद्वारे त्याला त्यांचा दोष दाखवावा लागला नसता.

जेव्हा आपण स्वतःचा न्याय करणे थांबवतो, तेव्हा आपण जणू काही तज्ञ आहोत अशा प्रकारे उपदेश करण्यास सुरवात करू. आणि परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहणार नाही. यास्तव, आपण दररोज स्वतःचा न्याय केला पाहिजे आणि नेहमी स्वतःबद्दल आणि आपल्या सेवाकार्याबद्दल नम्रभावाने विचार केला पाहिजे. देव आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या श्रमांबद्दल साक्ष देत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण सतत स्वतःला तपासले पाहिजे (गलती ६:४). तसे नसेल तर काहीतरी गंभीर चूक आहे.

मी सर्व पुढाऱ्यांना तीनपदरी बोध करीन:
१. नेहमी तुमचे मुख धुळीत लपवून देवाचे उपासक व्हा.
२. तुम्ही फक्त एक सामान्य बंधू आहात हे नेहमी लक्षात ठेवा.
३. तुम्ही परमेश्वरावर खूप प्रेम करता अशी कल्पना करण्याऐवजी परमेश्वराच्या तुमच्यावरील प्रीतीचे नेहमी चिंतन करा.

"आत्म्याने दीन " बनणे म्हणजे "स्वतःला क्षुल्लक मानणे" (मत्तय ५:३ - ऍम्प्लिफाइड बायबल) आणि वैयक्तिक, आध्यात्मिक गरजांच्या सतत जाणीवेने जगणे होय.