लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

करिंथकरांस दुसरे पत्र १०:५ मध्ये प्रेषित पौल "आपल्या वैचारिक जीवनात असलेल्या तटबंदी" बद्दल बोलतो. आपल्या देहातील वासनांनी गलिच्छ विचार-पद्धती आणि स्वार्थी विचार-पद्धती बनवल्या आहेत, जे मजबूत किल्ल्यांसारखे आहेत. त्या दिवसा आपल्याला आपल्या वासनांना तृप्त करून स्वार्थी जीवन जगायला लावतात. आणि रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा या किल्ल्यांतून घाणेरडे विचार स्वप्नांच्या रूपात उमटतात. आपण सदैव असेच जगावे अशी देवाची इच्छा आहे काय? नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्तांकित करावा. देवाने आपल्याला दिलेली आध्यात्मिक शस्त्रे वापरून आम्ही या किल्ल्यांचा नाश करू शकतो. त्या महान शस्त्रांपैकी एक म्हणजे देवाचे वचन जे या किल्ल्यांचा नाश करण्यासाठी शक्तिशाली आहे (करिंथकरांस दुसरे पत्र १०: ४). अशाप्रकारे आपण “प्रत्येक विचार ख्रिस्तांकित” करू शकतो.

आपण जितकी आपली मने परमेश्वराच्या वचनाने अधिकाधिक भरत जातो, तसे आपल्याला आढळून येईल की हे किल्ले एकेक करून पाडले जातात - आणि या किल्ल्यातील सैनिक (विचार) नष्ट होतात. एक तरुण माणूस म्हणून मीदेखील तुमच्या सर्वांप्रमाणेच घाणेरड्या विचारांशी संघर्ष केला आहे. माझ्या तरुणपणी मला हा उपाय मिळाला. मी देवाचे वचन वाचले, मनन केले आणि मी देवाच्या वचनाने माझे मन भरले. आपले मन गलिच्छ पाण्याने भरलेल्या वाडग्यासारखे आहे, कारण आपण आपल्या परिवर्तन न झालेल्या दिवसांत त्यात बरीच घाण आणि कचरा टाकला आहे. परंतु आपण त्या वाडग्यात एक सुरई शुद्ध पाणी ओतले तर हळूहळू ते पाणी ओसंडून विरल होते. अशा प्रकारे वाडग्यातले पाणी अधिकाधिक स्वच्छ होते. यास बराच काळ लागतो. परंतु देवाचे वचन आपल्या मनामध्ये ओतले तर आपली मने हळू हळू काही वर्षांत शुद्ध होऊ शकतात. परंतु जर आम्ही त्या वाडग्यात वरचेवर थोडी घाण टाकत राहिलो,तर सफाईच्या प्रक्रियेला विलंब होतो. आमचे विचार आम्ही ख्रिस्तांकित करण्यासाठी देवाकडे त्याची कृपा मागू शकतो.

करिंथकरांस दुसरे पत्र ११:२,३ मध्ये पौल करिंथच्या त्या ख्रिस्ती लोकांना “कोकऱ्याच्या लग्नाच्या” दिवशी शुद्ध कुमारिका म्हणून प्रभुला कसे सादर करावेसे वाटते याबद्दल सांगतो. आणि म्हणूनच त्यांनी वाटेत इतर कोणाच्याही प्रेमात पडू नये याबद्दल तो ईर्ष्यावान होता. अब्राहमचा सेवक अलिएजरच्या गोष्टीचा विचार करा, ज्याने रिबेकाला इसहाकासमोर सादर करण्यासाठी लांब प्रवासातून (उर ते कनान पर्यंत सुमारे १५०० किलोमीटर) नेले. त्या प्रवासात जर कोणी देखणा तरुण येऊन रिबेकाचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करीत असता तर अलियेजरने रिबेकाला असे बजावून सांगितले असते, “या माणसांकडे आकर्षित होऊ नको. मला इसहाकाकडे तुला शुद्ध कुमारी म्हणून सादर करावयाचे आहे.” पौलाला त्याच प्रकारे करिंथमधील मंडळी जतन करण्याची इच्छा होती. ही पवित्र ईर्ष्या आहे जी प्रत्येक सेवकाकडे त्याच्या कळपासाठी असली पाहिजे. त्याने त्यांना सांगितले पाहिजे, “तुम्ही येशूसाठी आरक्षित आहात.पैसा, अवैध लैंगिक संबंध किंवा ऐहिक सन्मानाने आकर्षित होऊ नका. हे आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुम्ही त्यांच्या हल्ल्यांचा प्रतिकार केला पाहिजे आणि स्वत: ला शुद्ध राखले पाहिजे.” मग पौल पुढे म्हणतो, “तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे."

कुणी भ्रांत चित्ताचा केव्हा होतो अथवा भरकटतो? जेव्हा ते खोट्या शिक्षणावर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतात किंवा जेव्हा ते एखाद्या पंथात सामील होतात तेव्हाच काय? करिंथकरांस दुसरे पत्र ११:३ नुसार, ज्या क्षणी आपण ख्रिस्तावरील आपली निष्ठा गमावतो त्या क्षणी आपण भरकटतो. ख्रिस्ताची निष्ठा गमावलेला प्रत्येक विश्वासू आधीच भरकटलेला आहे.

येशूच्या कळपाचे मेंढपाळ म्हणून आपले कार्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या निष्ठेत मेंढरे राखणे होय. ख्रिस्ती जीवनातील ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. सैतान सतत विश्वासणाऱ्यांना येशूवर प्रेम करण्यापासून भरकटलेल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतो. जर आपण ख्रिस्ताबद्दलचे आपले एकनिष्ठ प्रेम गमावले असेल तर सुवार्तेचा उपदेश करण्यात किंवा शिकविण्यात किंवा प्रभूसाठी इतर कोणत्याही सेवेत गुंतून राहण्याचा काही उपयोग नाही. हीच परमेश्वराची तक्रार इफिससमधील दूत आणि मंडळीविरुद्ध होती (प्रकटीकरण २:४).