लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

या पृथ्वीवर आजवर झालेली सर्वात मोठी लढाई जगाच्या कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात लिहिली गेली नाही. जेव्हा येशूने आपल्या मृत्यूद्वारे कालवरीवर या जगाचा अधिपती सैतानाचा पराभव केला तेव्हा हे घडले होते.

आपल्या संपूर्ण जीवनात आपण कधीही विसरू नये असे वचन म्हणजे इब्री २:१४,१५. मला खात्री आहे की हे वचन तुम्हांला कळावे हे सैतानाला आवडणार नाही. स्वत:च्या पराभवाबद्दल किंवा अपयशाबद्दल ऐकायला कोणालाही आवडत नाही आणि सैतानही त्याला अपवाद नाही. येथे वचन आहे: "ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही(येशू) त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने(त्याच्या वधस्तंभावरील मरणाने) शून्यवत करावे.आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे." येशू मरण पावला तेव्हा त्याने सैतानाला शून्यवत केले. का? जेणेकरून आपण सैतानापासून आणि आयुष्यभर त्याने आपल्यावर ठेवलेल्या भीतीच्या बंधनातून कायमचे मुक्त होऊ शकू.जगातील लोकांना अनेक प्रकारची भीती असते - आजारपणाची भीती, गरिबीची भीती, अपयशाची भीती, लोकांची भीती, भविष्याची भीती इत्यादी, सर्व भीतींपैकी सर्वात मोठी भीती मात्र मृत्यूची भीती आहे. इतर प्रत्येक भीती मृत्यूच्या भीतीपेक्षा कमी आहे. मृत्यूच्या भीतीमुळे मृत्यूनंतर काय होईल याची भीती निर्माण होते. पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे शिकवते की जे पापात राहतात ते शेवटी नरकात जातील - अशी जागा जी देवाने पश्चात्ताप न करणाऱ्यांसाठी राखून ठेवली आहे. सैतानही या पृथ्वीवर ज्यांची त्याने फसवणूक केली आणि त्यांना पापात पाडले, त्यांच्याबरोबर अग्नीच्या सरोवरात अनंत काळ घालवेल. येशू, आपल्या पापाची शिक्षा स्वतःवर घेऊन त्या सार्वकालिक नरकापासून आपल्याला वाचवण्यासाठी पृथ्वीवर आला. सैतानाची आमच्यावरील सत्ताही त्याने नष्ट केली जेणेकरून तो पुन्हा कधीही आपल्याला उपद्रव देणार नाही.

तुम्ही सर्वांनी आयुष्यभर हे एक सत्य लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे: सैतानाच्या विरोधात देव नेहमीच तुमच्या बाजूने राहील. हे इतके वैभवशाली सत्य आहे ज्याने मला इतके प्रोत्साहन आणि सांत्वन आणि विजय मिळवून दिला आहे, की मी सर्वत्र जाऊन जगातील प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला याबद्दल सांगावे अशी माझी इच्छा आहे. पवित्र शास्त्र म्हणते, "देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल." (याकोब ४:७). येशूचे नाव असे आहे की ज्या नावाने सैतान नेहमीच पळून जाईल. बहुतेक ख्रिस्ती लोकांच्या मनात जे चित्र आहे की सैतान त्यांचा पाठलाग करत आहे आणि त्याच्याकडून आपला जीव वाचवत ते पळत आहेत. पण हे पवित्र शास्त्र जे शिकवते त्याच्या अगदी उलट आहे. तुम्हांला काय वाटते? सैतानाला येशूची भीती वाटत होती की नाही? आपल्या सर्वांना माहीत आहे की सैतान आमच्या तारणहारासमोर उभे राहण्यास घाबरला होता. येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि त्याच्यासमोरून अंधाराच्या अधिपतीला नाहीसे व्हावे लागले.

मी तुम्हां तरुणांना सांगू इच्छितो की, तुमच्या आयुष्यात कधीही जर तुम्ही अडचणीत असाल किंवा एखाद्या पार करता येणार नाही अशा समस्येला तोंड देत असाल, जेव्हा तुम्ही अशा गोष्टीचा सामना करत असाल ज्यासाठी मानवी उत्तर दिसत नाही, तेव्हा प्रभू येशूच्या नावाचा धावा करा. त्याला म्हणा, "प्रभू येशू, तू सैतानाच्या विरोधात माझ्या बाजूने आहेस. मला आता मदत कर". आणि मग सैतानाकडे वळून त्याला सांगा, "येशूच्या नावात मी तुला अडवतो, सैताना". मी तुम्हांला सांगू इच्छितो की सैतान ताबडतोब तुमच्यापासून पळून जाईल, कारण येशूने त्याला वधस्तंभावर पराभूत केले. जेव्हा तुम्ही देवाच्या प्रकाशात चालत असता आणि येशूच्या नावाने त्याचा प्रतिकार करता तेव्हा सैतान तुमच्याविरुद्ध शक्तीहीन असतो.

साहजिकच सैतानाच्या पराभवाबद्दल आपल्याला माहिती असावी अशी त्याची इच्छा नाही आणि म्हणूनच त्याने आपल्याला त्याबद्दल इतके दिवस ऐकण्यापासून रोखले आहे. म्हणूनच त्याने बहुतेक प्रचारकांना त्याच्या पराभवाबद्दल प्रचार करण्यापासून रोखले आहे.

प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचा वधस्तंभावर एकदाच आणि कायमचा पराभव केला हे तुम्हा सर्वांना स्पष्टपणे कळावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हांला पुन्हा कधीही सैतानाला घाबरण्याची गरज नाही. तो तुम्हांला त्रास देऊ शकत नाही. तो तुमचे वाईट करू शकत नाही. तो कदाचित तुम्हांला मोहात पाडेल. तो कदाचित तुमच्यावर हल्ला करेल. पण जर तुम्ही स्वत:ला नम्र केले, देवाच्या अधीन झालात आणि नेहमीच त्याच्या प्रकाशात चालत राहिलात तर ख्रिस्तात देवाची कृपा तुम्हांला त्याच्यावर नेहमीच विजय मिळवून देईल. प्रकाशात प्रचंड सामर्थ्य आहे. अंधाराचा अधिपती सैतान, प्रकाशाच्या राज्यात कधीच प्रवेश करू शकत नाही. जर सैतानाची सत्ता अनेक विश्वासणाऱ्या लोकांवर असेल तर याचे कारण की ते अंधारात चालतात, कोणत्यातरी गुप्त पापात जगतात, इतरांना क्षमा करत नाहीत, किंवा एखाद्याचा हेवा करतात किंवा त्यांच्या आयुष्यात काही स्वार्थी महत्त्वाकांक्षा जोपासत असतात वगैरे.मग सैतानाला त्यांच्यावर सामर्थ्य मिळते. नाहीतर तो त्यांना स्पर्शही करू शकत नाही.

आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितले आहे की एक दिवस येशू परत येऊन सैतानाला अगाधकुपात बांधून ठेवेल आणि मग येशू या पृथ्वीवर एक हजार वर्षे राज्य करेल. त्या कालावधीनंतर सैतानाला थोड्या काळासाठी सोडण्यात येईल, सर्वांना हे दाखवण्यासाठी की, दीर्घ कारावासानंतरही तो बदललेला नाही. त्यानंतर तो बाहेर जाऊन पृथ्वीवरील लोकांना एकदा शेवटच्या वेळी फसवेल. आणि मग असे दिसून येईल की, हजार वर्षे प्रभू येशूचे शांतीचे राज्य पाहूनदेखील आदामाचा वंशही बदलला नाही. मग सैतानाचा न्याय करण्यासाठी देव खाली येईल आणि त्याला सर्वकालासाठी अग्नीच्या सरोवरात टाकेल. आणि जे लोक पापामध्ये राहिले , ज्यांनी सैतानासमोर गुडघे टेकले आणि देवाच्या वचनाचे पालन करण्याऐवजी सैतानाचे पालन केले ते सर्व सैतानाला त्या अग्नीच्या सरोवरात सामील होतील.

म्हणूनच सैतानाच्या पराभवाच्या या शुभवर्तमानाचा प्रचार आपण करतो. या वेळी विश्वासणाऱ्या लोकांना ऐकण्याची गरज असलेले हे कदाचित सर्वात महत्त्वाचे सत्य आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही शुद्धतेत चालत नसाल तर सैतानावर तुमचे कोणतेही सामर्थ्य नसेल.