“जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल” (मत्तय ५:४). “सांत्वन” (comfort) या शब्दाचा अर्थ “बळकट करणे” असा होतो. त्याच्या (इंग्रजीत comfort या शब्दाच्या) अगदी मध्यभागी “f-o-r-t” (किल्ला) हा छोटासा शब्द आहे. “किल्ला” हा एका विशाल लष्करी संरक्षित क्षेत्राचे चित्र आहे - एक किल्ला, जो मजबूत आहे. “जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल”. जगातील लोक सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी शोक करतात. बहुतेक लोक काही वैयक्तिक नुकसान झाल्यामुळे शोक करतात. एकतर त्यांनी पैसे गमावल्यावर, किंवा त्यांनी एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावल्यावर, किंवा त्यांनी त्यांची प्रतिष्ठा गमावल्यावर, किंवा त्यांनी या पृथ्वीवरील काहीतरी गमावल्यावर, जसे की त्यांचा आत्मसन्मान, त्यांचे पद, त्यांची नोकरी किंवा असे काहीतरी गमावल्यावर ते शोक करतात. पण येशू अशा शोकाबद्दल बोलत नाही आहे. शोक म्हणजे कोणीतरी मला दुखावले म्हणून शोक करणे नाही, किंवा माझ्या स्वतःच्या दुःखासाठी रडणे नाही.
येशू कधीही स्वतःच्या दुःखांसाठी रडला नाही, पण तो इतरांसाठी रडला. आपण वाचतो की तो येरुशलेमसाठी रडला (लूक १९:४१) आणि लाजरच्या कबरेजवळ तो रडला (योहान ११:३५). परंतु लोकांनी त्याला सैतान म्हटले किंवा त्याच्यावर थुंकले तरीही तो कधीही लोकांनी त्याला दिलेल्या वागणुकीबद्दल रडला नाही. तो कधीही स्वतःसाठी रडला नाही. इतकेच नाही तर, तो वधस्तंभ उचलून वधस्तंभाकडे जाण्याच्या वाटेवर अडखळत असताना, आपण लूक २३:२७ मध्ये वाचतो की तो वधस्तंभ वाहून नेत असताना लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालत होता. जेव्हा काही स्त्रियांनी त्याची चाबकाने मारहाण होतांना पाहिली तेव्हा त्या शोक करत होत्या आणि मोठ्याने रडत होत्या, जेव्हा तो जड वधस्तंभ वाहून नेत होता तेव्हा त्याच्या डोक्यावरून आणि पाठीवरून रक्त वाहत होते, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट होता. तेव्हा येशूने मागे वळून त्यांना काय म्हटले ते तुम्हाला माहित आहे का? "यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडणे थांबवा! मी ठीक आहे; हो, माझी पाठ जखमी झाली आहे, माझ्या डोक्यावर काट्यांचा मुकुट आहे आणि मी एक जड वधस्तंभ घेऊन चालत आहे. काही क्षणातच मला मारले जाणार आहे, पण मी पूर्णपणे ठीक आहे कारण मी देवाच्या इच्छेच्या केंद्रस्थानी आहे" (लूक २३:२८)!
जेव्हा तुम्ही सर्वात जास्त दुःख सहन करत असता तेव्हा तुम्ही अशी वृत्ती बाळगू शकता का? "माझ्यासाठी रडू नका, मी ठीक आहे, पण जर तुम्हाला रडायचे असेल तर स्वतःसाठी आणि तुमच्या मुलांसाठी रडा - त्यांची आध्यात्मिक स्थिती पहा." मोठे झगे घातलेले आणि खूप रुबाबदार दिसणारे ते परूशी आहेत. पण त्यांची आध्यात्मिक स्थिती पहा. त्या दिवशी काय होईल ज्या दिवशी ख्रिस्त परत येईल आणि ते पर्वतांना म्हणतील, "आमच्यावर पडा आणि आम्हाला झाकून टाका" (लूक २३:३०). येशूची ही वृत्ती आहे. गाण्यात म्हटल्याप्रमाणे त्याच्या स्वतःच्या दुःखांसाठी त्याच्याकडे अश्रू नव्हते, पण माझ्या दुःखांसाठी रक्ताचे थेंब होते.
येशूचा खरा शिष्य शोक करतो, कारण तो ख्रिस्तासारखा नाही; तो शोक करतो जेव्हा तो पाप करतो आणि जेव्हा तो घसरतो. तो, लोक त्याच्याशी कसे वागतात याबद्दल शोक करत नाही. तो असा विश्वास करतो की या पृथ्वीवर तो ख्रिस्तासाठी अपमानित होण्यासाठी नियुक्त केलेला आहे. परंतु जेव्हा जेव्हा तो पापाद्वारे किंवा अपयशाने प्रभूचा अपमान करतो तेव्हा तो शोक करतो. जेव्हा तो अध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर जातो तेव्हा तो इतरांच्या पापांसाठी, इतरांच्या अपयशासाठी देखील शोक करतो, जसा येशू येरुशलेमसाठी रडला. ह्या शोकाबद्दल येशू बोलला आहे. "जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांना बळ मिळेल." कदाचित आपल्यापैकी काहींना बळ मिळत नाही याचे कारण आपण आपल्या पापांसाठी शोक करत नाही.
इतरांच्या पापांसाठी शोक करणे यापेक्षाही उच्च पातळी आहे. प्रेषित पौल त्या उच्च पातळीपर्यंत पोहोचला होता. तो वाईट रीतीने अपयशी ठरलेल्या करिंथकरांना म्हणतो, "मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील(नम्र करेल)” (२ करिंथ १२:२१). देवाने पौलाला नम्र का करावे? तो इतका सरळ जीवन जगला होता आणि त्याला स्वतःविरुद्ध कोणतेही पाप असण्याची जाणीव नव्हती. पण तो म्हणतो, “तुम्हापैकी ज्यांनी भूतकाळात पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल”. तो त्यांच्या मंडळीमध्ये असलेल्या काही गोष्टींची यादी करतो (वचन २०): मत्सर, क्रोध, राग, चहाड्या कानगोष्टी, अहंकार, अशांतता, अव्यवस्था इत्यादी….. जेव्हा त्याने स्वतःला देवाचे लोक म्हणवणाऱ्या लोकांमधील सर्व पापांचा विचार केला तेव्हा तो रडला, कारण तो त्यांचा आध्यात्मिक पिता होता. हे तसेच आहे, जसे एखाद्या जगिक पित्याचा मुलगा खूप आजारी असेल तर तो रडेल. जर वडील आध्यात्मिक मनाचे असतील तर त्यांचा मुलगा ड्रग्ज किंवा वाईट सवयींमध्ये भरकटत असेल तर याबद्दल त्यांना खूप दुःख होईल.
पौल करिंथकरांसाठी आध्यात्मिक पिता होता आणि प्रत्येक खरा ख्रिस्ती मेंढपाळ किंवा पाळक त्याच्या कळपाचा अध्यात्मिक पिता असावा. अध्यात्मिक पित्याचे एक लक्षण म्हणजे तो केवळ कळपाची टिका करणार नाही, तर तो जसा पौल करिंथकरांसाठी रडला होता तसा तो देखील त्यांच्यासाठी रडेल. असाच माणूस अध्यात्मिक नेता होण्यास (नेतृत्व करण्यास) योग्य आहे. यशया ४९:१० (यशया ४९ हा अध्यात्मिक नेतृत्वावरील एक उत्तम अध्याय आहे) मध्ये म्हटले आहे, "जो लोकांवर दया करतो तोच त्यांना मार्गदर्शन करेल."
अध्यात्मिक नेता होण्यास कोण योग्य आहे? तोच जो लोकांवर दया करतो. आणि म्हणूनच मत्तय ५:४ मधील "शोक" म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या पापासाठी, ख्रिस्तासारखे नसल्याबद्दल आणि इतरांसाठी शोक करणे. जर आपण असे केले तर आपण बळकट होऊ आणि जर आपण या मार्गाने गेलो तर आपल्याला इतर लोकांनाही बळकट करण्याची शक्ती मिळेल.