लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

लूक १:३४,३५ मध्ये आपण वाचतो की जेव्हा गॅब्रिएल मरियेकडे आला तेव्हा तिने त्याला स्वाभाविकपणे विचारले, “हे कसे होईल? मी कुमारी आहे. कुमारीला मूल कसे होईल?” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील.” पवित्र आत्मा आपल्याकडे नेहमी देवाचे सामर्थ्य आणतो (प्रेषितांची कृत्ये १: ८ आणि १०:३८ पहा). ज्याप्रमाणे देवाचा आत्मा मरियेवर तिच्यात येशूला घडवण्यासाठी आला, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा मुख्यतः आपल्यात ख्रिस्त घडवण्यासाठी आपल्यावर येतो. आपल्या जीवनात आणि प्रभूसाठी आपण करत असलेल्या सेवेमध्ये पवित्र आत्म्याचे कार्य समजून घेण्यासाठीचा तो स्पष्ट संकेत आहे. जसे की मरियेच्या उदरात त्या शरीराची वाढ होण्यास वेळ लागला, तसे ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रकट होण्यासाठी देखील वेळ लागेल.

लूक १:३७ मध्ये आपल्याला एक सुंदर वचन दिसते की, “देवाला काहीच अशक्य होणार नाही.” (“देव जे बोलतो त्याचा कोणताही शब्द सामर्थ्यहीन असणार नाही.”) जर देव एखादा शब्द बोलला असेल तर तुम्ही खात्री बाळगू शकता की त्यामध्ये सामर्थ्य आहे. जेव्हा देव म्हणाला, “प्रकाश होवो”, तेव्हा काहीतरी घडलं. आपण हे संपूर्ण उत्पत्ति १ मध्ये पाहतो. देवाकडून आलेला कोणताही शब्द सामर्थ्यहीन नाही. म्हणूनच आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करणे आणि त्याच्या अभिवचनांवर दावा करणे महत्वाचे आहे. येथे एक सामर्थ्यशाली वचन दिले आहे: "पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही." (रोमकरांस पत्र ६:१४). जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या आयुष्यात हे खरे होईल कारण देवाचे कोणताही शब्द सामर्थ्यहीन असू शकत नाहीत.

देवाची इच्छा आहे की सर्व काही त्याच्यासाठी शक्य आहे यावर आपण विश्वास ठेवावा. म्हणूनच त्याने जुन्या आणि नवीन करारांच्या सुरूवातीस हे सांगितले (उत्पत्ति १८:१४ आणि लूक १:३७ पहा). जेव्हा आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरूवात करतो तेव्हा आपला पवित्र शास्त्रावरील विश्वास हा देवाचे वचन म्हणून अंधविश्वास असू शकतो. पण तो अंधविश्वास म्हणूनच राहू नये. जर आपण शास्त्राच्या अभिवचनांवर दावा केला तर आपण आपल्या जीवनात हे सिद्ध करू शकतो की देवाला काहीही अशक्य नाही. मग पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे हा आमचा विश्वास एक सिद्ध विश्वास होईल कारण आपण देवाचा एक शब्दही सामर्थ्यहीन नाही ही गोष्ट चाखली असेल आणि अनुभवली असेल. येशूने जुन्या करारावर कधीच संशय घेतला नाही. सर्व टीकाकार आणि धर्मज्ञांनी जे सांगितले त्याची तो पर्वा करत नव्हता. त्याने विश्वास ठेवला आणि त्याने सामर्थ्य अनुभवले. आज सैतान बर्‍याच लोकांना अशा साध्या श्रद्धेपासून भरकटत नेत आहे. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याऐवजी आणि सामर्थ्याचा अनुभव घेण्याऐवजी ते त्यांच्या हुशारीचा उपयोग करतात आणि पवित्र शास्त्राचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात आणि एकदाही देवाच्या सामर्थ्याचा अनुभव न घेता त्यांचे संपूर्ण जीवन वाया घालवितात. तुम्हाला कसे जगायचे आहे? आपण शास्त्राचे विश्लेषण करू इच्छित आहात की त्याद्वारे देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ इच्छिता? निवड तुमची आहे.

मरीया देवाच्या वचनाधीन झाली आणि म्हणाली, “आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” (लूक १:३८). मी मरियेचा एक मोठा प्रशंसक आहे (जरी मी रोमन कॅथलिक नसलो तरी) कारण ती खरोखरच एक देवभीरू स्त्री होती. देव संपूर्ण इस्राएलमध्ये अशी एक तरुणी पाहत होता, जी खरोखरच देवभीरु असेल. आणि त्याला मरीया सापडली, जी त्यावेळी बहुतेक फक्त १८ वर्षांची होती. लूक १: ४६-५५ वाचा आणि ती किती प्रगल्भ आहे आणि पवित्र शास्त्रातील तिचे स्तोत्र परमेश्वराप्रतीच्या भयादराने किती ओतप्रोत भरलेले आहे ते पहा. एखादी व्यक्ती जर देवभीरू असेल तर १८ वर्षांच्या वयातच तो किती प्रगल्भ होऊ शकतो हे नवल आहे. देव लोकांची निवड करण्यात चूक करीत नाही. मरियेला माहित होते की जेव्हा ती गर्भवती आहे हे त्यांना माहित होईल तेव्हा नासरेथमधील प्रत्येकजण तिच्याविषयी निंदनीय कथा पसरवेल. हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. आणि तिच्या शरीरातून येशूचे शरीर बाहेर यावे यासाठी ती निंदा सहन करण्यासाठी तयार होती. आता ते आपल्या जीवनात लागू करा. आपण आपल्या गावात ख्रिस्ताचे शरीर तयार करू इच्छिता? तुम्हाला त्याबद्दल सन्मान हवा आहे की आपण “ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना” भोगण्यास तयार आहात? जे लोक देवाच्या कामात सन्मान मिळवू पाहतात त्यांना देव पाठिंबा देत नाही. अशा व्यक्ती ख्रिस्ताचे शरीर नव्हे तर केवळ मंडळी बनवतात. ख्रिस्ताचे शरीर बनवण्यामुळे नेहमीच निंदा, गैरसमज, वळवळणाऱ्या जिभा आणि अफवा अशा गोष्टी होतील - जसे मरियेला नासरेथमध्ये सामोरे जावे लागले. पण त्या सर्वांची तिने पर्वा केली नाही. तिने तरीही ख्रिस्ताचे शरीर बाहेर आणले. आणि आजही तसेच आहे. ख्रिस्ताचे शरीर बाहेर येईल जिथे लोक “ख्रिस्ती धर्मजगतातील संप्रदायाच्या छावणीच्या बाहेर जाऊन त्याची निंदा सहन करण्यास” तयार आहेत.