WFTW Body: 

गीतरत्न 1:5 मध्ये वधू म्हणते, "मी काळीसावळी पण सुरूप आहे. " तिला असे म्हणायचे होते की, जरी ती अनाकर्षक असली, तरी तिच्या वराने तिला निवडले होते. पवित्र शास्त्र म्हणते, की देवाने प्रामुख्याने जगातील दीन व मूर्ख यांना निवडले आहे, समर्थ, कुलीन व ज्ञानी यांना नव्हे (१ करिंथकरांस पत्र १:२६-२९). आपल्यापैकी काहींना कदाचित असे वाटेल, "मी इतर लोकांप्रमाणे सक्षम नाही. मी बुद्धिमान नाही. मला इतरांसारखे बोलता येत नाही. माझ्या क्षमता खूप मर्यादित आहेत". तरीही परमेश्वराने आपल्याला निवडले आहे! यरुशलेममध्ये अधिक सुंदर स्त्रिया होत्या. पण वराने या काळ्यासावळ्या वधूची निवड केली.

येशू असे करतो, कारण तो अंतःकरणातील गुणांचा शोध घेतो, रूप, दान किंवा क्षमता यांचा नाही. इथे आपण काही शिकले पाहिजे. आपल्या सर्व नैसर्गिक क्षमता, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि संपादन केलेल्या गोष्टी या देवासाठी खरोखरी काहीच मूल्याच्या नाहीत. तो जे शोधत आहे ते समर्पित हृदय आहे. जेव्हा परमेश्वर एखाद्याला आपला सेवक म्हणून नेमू पहातो तेव्हा तो त्यात याच गोष्टीचा शोध घेतो.

वधूला माहीत होते की, जरी ती काळीसावळी असली, तरी आपल्या वराच्या नजरेत ती सुंदर आहे. अनेक विवाहित स्त्रियांना त्रास होतो कारण त्यांना असे वाटत नाही की त्यांच्या पतीने खरोखरच त्यांचा स्वीकार केला आहे आणि ते त्यांच्या सोबतीत आनंद घेतात. मला माझ्या पत्नीच्या सोबतीत आनंद आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व पतीसुद्धा असेच कराल. आपल्या पत्नीला हे माहित असणे हे खूप महत्वाचे आहे की आपण तिच्यासोबत आनंदित आहात. त्याचप्रमाणे, अनेक विश्वासणाऱ्यांना हे लक्षात येत नाही की, परमेश्वर त्यांच्यात आनंदित होतो. सफन्या ३:१७ म्हणते, " परमेश्वर तुझा देव, तुझ्या ठायी आहे; तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल." देवाला आपण त्याची मुले आहोत याचा खूप आनंद होतो. तुम्हांला ते माहीत आहे का? माणसाच्या दृष्टीने आपण कुरूप असू शकतो, पण देवाच्या नजरेत आपण सुंदर आहोत. हे आपण स्पष्टपणे समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

"गोऱ्या, सुंदर, नगरातील मुलींनो, माझ्याकडे तुच्छतेने पाहू नका" (गीतरत्न १:६ लिविंग बायबल). ती एक असंस्कृत, खेड्यातील मुलगी होती आणि यरूशलेमच्या सुसंस्कृत, शहरी मुलींनी तिच्याकडे तुच्छतेने पाहिले. पण वराने सर्व हुशार, मोहक, शहरातील मुलींकडे दुर्लक्ष करून त्या खेडयाच्या मुलीची निवड केली. परमेश्वराने आपल्याला अशाचे प्रकारे निवडले आहे. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती करा! इतर विश्वासणारे तुमच्याकडे तुच्छतेने पाहत आहेत का? निराश होऊ नका, कारण तुम्ही तुमच्या प्रभूसाठी मौल्यवान आहात! यहेज्केल १६ हा एक सुंदर अध्याय आहे ज्यामध्ये; आपण घाणेरडे, सडलेले आणि दुर्लक्षित असताना, रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत असताना देवाने आपल्याला कसे उचलले याचे वर्णन केले आहे.

गीतरत्न ५:१६ मध्ये वधूने आपल्या वराचे वर्णन असे केले आहे: " तो सर्वस्वी मनोहर आहे. माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!" तुम्ही असे म्हणू शकता का, की येशू केवळ तुमचा तारणहारच नाही, तर तुमचा 'मित्र' देखील आहे? येशूला तुमचा सर्वांत जवळचा आणि सर्वांत प्रिय मित्र होऊ द्या.