लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

नवीन करार शिकवितो की एखाद्या माणसाचे तारण होण्यासाठी त्याने प्रथम पश्चात्ताप करणे गरजेचे आहे. पश्चात्ताप म्हणजे आपल्या जीवनातल्या जुन्या मार्गापासून वळणे. काही वाईट सवयी, जसे की मद्यपान आणि जुगार इत्यादींचा त्याग करणे यांपेक्षा कितीतरी जास्त त्याचा अर्थ आहे. आमची जुनी जीवनशैली ही स्व-केंद्रित जीवन होय; आणि पश्चात्ताप म्हणजे असे म्हणणे की "प्रभू, मी स्वकेंद्रित राहून थकलो आहे आणि आता मी तुझ्याकडे वळू इच्छितो आणि तुझ्यावरच केंद्रित होऊ इच्छितो."

येशू आम्हांला पापांपासून वाचवण्यासाठी आला. दुसऱ्या शब्दांत, तो आपल्याला स्वकेंद्रितपणापासून वाचवण्यासाठी आला आहे. नवीन करारामध्ये पाप या शब्दाऐवजी "स्व-केंद्रितपणा" हा शब्द ठेवा आणि बर्‍याच परिच्छेदांमध्ये काय अर्थ प्राप्त होतो ते तुम्हाला दिसेल. "पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही." हे "स्वकेंद्रितपणा तुमच्यावर सत्ता चालवणार नाही" असे होईल (रोमकरांस पत्र ६:१४). देवाची त्याच्या लोकांसाठी हीच इच्छा आहे. आणि तरीही आपण आपल्या जीवनाचे परीक्षण केले तर आपल्याला आढळेल की आपल्या अगदी पवित्र इच्छांमध्येही स्वकेंद्रितपणा आहे. पवित्र आत्म्याने आम्हांला भरण्यास देवाला विनंती करणे हीदेखील एक स्व-केंद्रित इच्छा असू शकते, जर आपल्याला हे सामर्थ्य एक महान उपदेशक, किंवा एक महान आरोग्यदाता इत्यादी होण्यासाठी पाहिजे असेल. तर ती इच्छा जगात महान व्हायच्या इच्छेइतकीच स्व-केंद्रित आहे. सर्वांत पवित्र ठिकाणीदेखील पाप कसे प्रवेश करते ते आपण पाहता ना?

म्हणूनच येशूने, आपण आत्म्याने भरले जावे यासाठीही नाही तर देवाचे नाव पवित्र मानले जावे यासाठी सर्वांत आधी प्रार्थना करण्यास शिकवले. फक्त खरा आध्यात्मिक असणारा मनुष्यच प्रामाणिकपणे ही प्रार्थना करू शकतो. पुन्हा पुन्हा ही प्रार्थना तर नक्कीच कोणीही म्हणू शकेल. एखादा पोपट देखील हे करेल. परंतु ह्याचा खरा अर्थ उमजण्यासाठी, पूर्ण अंतकरणाने, देवावर निष्ठा असणे गरजेचे असेल, जिथे तो आपल्या जीवनात प्रथम आहे, जिथे आपण त्याच्यावर केन्द्रित आहोत आणि जिथे आपण त्याच्यापेक्षा अधिक त्याच्या आशीर्वादांची अपेक्षा करत नाही. जर त्याने आपल्याला त्याची दाने दिली तर चांगलेच; आणि जर त्याने आम्हाला कोणतीही दाने दिली नाहीत तरी ते आपल्यासाठी ठीकच आहे, कारण आपण खुद्द देवाची इच्छा धरतो त्याच्या दानांची नव्हे. देवाने इस्राएली लोकांना त्याच्यावर अंतकरणापासून प्रीति करण्यास आणि त्यांच्या शेजार्‍यावर स्वत: सारखी प्रीति करण्यास का शिकवले? केवळ त्यांच्या स्वकेंद्रितपणापासून त्यांची सुटका करण्यासाठी.

इंग्रजी भाषेत असलेल्या JOY(आनंद) या शब्दाला असे लिहिले जाऊ शकते की , "J-Jesus first प्रथमस्थानी येशू ,O - others next नंतर इतर आणि Y -yourself last शेवटी आपण. मग तुम्हांला आनंद मिळू शकेल." देव सदैव आनंदपूर्ण असतो. स्वर्गात कोणतेही दु:ख किंवा चिंता नाही कारण सर्व काही देवकेंद्रित आहे. देवदूत नेहमी आनंदात असतात, कारण ते देवावर केंद्रित असतात. आपल्यात आनंद, शांती आणि इतर बरेच आध्यात्मिक सद्गुण नसल्याचे कारण म्हणजे आम्हाला आपले योग्य केंद्र सापडलेले नाही. आमचा कल स्वत:च्या कामांसाठी देवाला वापरण्याकडे असतो. आणि प्रार्थना देखील अशीच होते, "प्रभू , कृपया माझा व्यवसाय यशस्वी होऊ दे......माझ्या नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी मला मदत कर.....कृपया मला एक चांगले घर मिळू दे....." इ.; देव आपला सेवक व्हावा अशी आपली इच्छा असते, आपल्या पृथ्वीवरील जीवनाच्या सुखसोयीसाठी - अलाउद्दीन आणि त्याच्या दिव्याच्या कथेतल्या जीन सारखे.

अशा प्रकारच्या देवाकडे बरेचसे विश्वासणारे प्रार्थना करतात - जो या जगात स्वतःच्या प्रगतीसाठी आणि फायद्यासाठी एक साधन आहे. ऑलिम्पिकमधील १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकण्यासाठी किंवा व्यवसायातील सौद्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यास मदत करणारा देव हा नवीन कराराचा देव नाही. आपल्या प्रार्थनांवरून आपण किती स्वकेंद्रित आहोत हे प्रकट होते.

पवित्र शास्त्र म्हणते, “परमेश्वरामध्ये आनंद कर; म्हणजे तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.” (स्तोत्रसंहिता ३७: ४). प्रभूमध्ये आनंद करणे म्हणजे देवाला आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवणे. आणि म्हणूनच फक्त देव-केंद्रित व्यक्तीलाच त्याच्या हृदयाच्या सर्व इच्छा प्राप्त होऊ शकतात. "जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. (म्हणजेच जे त्यांचे डोके वर ठेवून चालतात अशा लोकांना - ज्यांच्या आयुष्यावर देवाचा ताबा आहे)" (स्तोत्रसंहिता ८४:११). "नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते." - आणि नीतिमान मनुष्य देव-केंद्रित असतो (याकोब ५:१६). उलटपक्षी, स्वार्थी माणसाची उत्कट प्रार्थना, जरी त्याने रात्रभर प्रार्थना केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आपली जीवन जगण्याची पद्धत आपण केलेल्या प्रार्थनेला किंमत मिळवून देते.

म्हणूनच आपल्या जीवनातील पहिल्या तीन आकांक्षा अशा असाव्यात: "पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." आमच्याकडे इतर बर्‍याच विनंत्या असतील जसे की, "माझी पाठदुखीचे बरे कर, राहण्यासाठी चांगले घर शोधण्यास मला मदत कर, माझ्या मुलाला नोकरी मिळण्यास मदत कर" इ. या सर्व चांगल्या विनंत्या आहेत. परंतु जर आपण असे म्हणू शकता की "पित्या, जरी तू या विनंत्या पूर्ण केल्या नाहीत तरी, माझी प्राथमिक इच्छा आहे की तुझ्या नावाचे गौरव व्हावे" - तर आपण एक आध्यात्मिक मनुष्य आहात.