लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात आनंदावर खूप जोर देण्यात आला आहे. "तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो."(फिलिप्पैकरांस पत्र १:४‭) आणि "प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा. (फिलिप्पैकरांस पत्र ४:४)

फिलिप्पैकरांस पत्र हे पौल तुरुंगात असताना लिहिले गेले. फिलिप्पैकरांस पत्र १:१३) पौलाने तुरूंगात असतानाही फिलिप्पैकरांना आनंदाविषयी बरेच काही लिहिले हे पाहणे आव्हानात्मक आहे. जेव्हा आपली सर्व परिस्थिती आरामदायक असते तेव्हा आनंदाविषयी उपदेश करणे ही एक गोष्ट आहे. जेव्हा आपली परिस्थिती कठीण असते तेव्हा आनंदाबद्दल लिहिणे ही फार वेगळी गोष्ट आहे. येथील पौलाचे शब्द आम्हांला शिकवतात की ख्रिस्ती लोकांना सर्व परिस्थितीत आनंद मिळविणे शक्य आहे. ते ख्रिस्ताचे मन आणि चित्तवृत्ती आहे.

वधस्तंभावर खिळण्याच्या आदल्या रात्री येशू प्रामुख्याने आनंदाविषयी बोलला (योहान १५ आणि १६). शेवटच्या भोजनाच्या वेळी, त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.… तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही…माझा आनंद तुमच्यामध्ये असावा.” काही तासांतच त्याच्यावर खोटा आरोप ठेवला जाणार होता आणि सार्वजनिकपणे त्याला वधस्तंभावर खिळले जाणार होते जसा काही तो गुन्हेगार आहे. तरीही तो आपला आनंद इतरांशी वाटत आणि त्यांना प्रोत्साहित करीत फिरत होता !!

हेच ख्रिस्ताचे मन व चित्तवृत्ती पौलाकडे होती. तुरुंगात तो आनंदाने भरलेला होता. हे पत्र लिहिण्याच्या वेळी पौल केवळ घरात नजरकैदेत होता ( प्रेषितांची कृत्ये २८: १६, ३०, ३१) की तो प्रत्यक्ष रोमी तुरुंगात होता हे आपल्याला माहिती नाही. त्या काळातील रोमी कारागृहात उंदीर, डास आणि सरपटणार्‍या कीटकांनी भरलेल्या गडद अंधारकोठड्या होत्या, तेथे कैद्यांना जमिनीवर झोपावे लागत होते आणि त्यांना फारच कमी अन्न दिले जात होते. या दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी पौल असला तरी त्या परिस्थिती नक्कीच सुखकर नव्हत्या. पण अशा परिस्थितीतही पौल पूर्णपणे आनंदात होता. सुवार्तेचा प्रचार केल्यामुळे त्याला तुरूंगात टाकण्यात आले होते. पण त्याच्या स्वत: च्या दु:खासाठी त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. त्याला कोणाकडूनही सहानुभूती नको होती. तो पूर्णपणे आनंदात होता.

जे ख्रिस्ती लोक आरामात राहतात आणि अगदी लहानसहान गैरसोयीबद्दल तक्रार करतात अशा लोकांसाठी पौलाचे उदाहरण वाखाणण्याजोगे आहे. अनेकदा आपण विश्वासणाऱ्यांना इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहतो कारण ते थोडीशी अडचण सहन करत असतात किंवा छोट्या छोट्या परिक्षांना तोंड देत असतात. पौल येथे त्याच्या दु:खाविषयी एक शब्दही बोलत नाही. तो म्हणतो "मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. (फिलिप्पैकरांस पत्र १: ३, ४). कदाचित पौलाने हे संपूर्ण रात्र डासांनी चावा घेतल्यानंतर; आणि पांघरण्यासाठी त्याच्याजवळ उबदार कपडे नसताना लिहिले असावे. त्याला त्याचा आनंद त्याच्या परिस्थितीतून नव्हे तर फिलिप्पै येथील विश्वासणाऱ्यांमध्ये त्याने पाहिलेल्या देवाच्या कृपेमुळे प्राप्त झाला.

अनेक वर्षांपूर्वी दृष्टांताद्वारे प्रभुने त्याला फिलिप्पैला जाण्यासाठी मार्गदर्शन केले (प्रेषितांची कृत्ये १६: ९-१२). त्याने त्या दृष्टान्ताचे पालन केले आणि तेथे जाऊन लोकांना परमेश्वराकडे आणले आणि फिलिप्पैमध्येही त्याला तुरुंगवासात टाकण्यात आले. तेथील तुरुंगाधिकारी कदाचित फिलिप्पैमधील मंडळीत एक वडील असेल आणि तो लोकांना म्हणाला असेल, “मी या माणसाला तुरूंगात हर्ष करताना पाहिले आहे” पौलाला त्याचा आनंद परमेश्वरासाठी उपयुक्त असे जीवन व्यतीत करण्यातून प्राप्त झाला. जेव्हा आपण आपल्या आयुष्याच्या शेवटास जावू तेव्हा आपल्याला आनंद देणारी गोष्ट ही असेल की जेव्हा देवाने आम्हाला आरोग्य व शक्ती दिली त्या दिवसांत आम्ही आपले जीवन परमेश्वराची सेवा करण्यास दिले, त्याच्या राज्यासाठी लोकांना एकत्र केले आणि त्याच्या मंडळीची उभारणी केली. आता याचा विचार करा, जेणेकरून जेव्हा आपण पौलाप्रमाणे आपल्या जीवनाच्या शेवटास याल, तेव्हा त्याने आपल्या जीवनाच्या बाबतीत ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आपण देवाचे आभार मानू शकता.

फिलिप्पैकरांस पत्र ४: ४ मध्ये पवित्र आत्मा आपल्याला आग्रह करतो की, “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा” - कधीकधी किंवा बहुतेक वेळा नव्हे तर सर्व वेळी. या वचनाने बरेच वर्षांपूर्वी मला आव्हान दिले होते. माझ्या आयुष्यात हे वचन खरे नव्हते हे मी कबूल केले; आणि मग मी माझ्या आयुष्यात ते खरे व्हावे असे परमेश्वराला मागितले. आपण फक्त कधीकधी, किंवा बर्‍याच वेळा की सर्व वेळ निरोगी राहू इच्छिता? आपल्या सर्वांना सर्व वेळ निरोगी रहाण्याची इच्छा असते. तर आपण कधीकधी, बहुतेक वेळा, की सर्व वेळी आनंद मिळवू इच्छिता? तुम्ही म्हणाल, “हे शक्य आहे का?” देवाच्या कृपेने हे शक्य आहे. हे जर अशक्य आहे असे त्याला माहित असते तर देवाने आपल्याला अशी आज्ञा दिली नसती. जर आपल्या आयुष्यात अद्याप हे सत्य नसेल तर आपण प्रामाणिक राहू आणि परमेश्वराला तसे सांगू. त्याला आपल्याला पवित्र आत्म्याने भरण्यास सांगा आणि जगातील सर्व काही ख्रिस्ताशिवाय कचरा आहे हे शिकवण्यास सांगा. मग आपण सर्व वेळ आनंद कराल. विश्वासणाऱ्यांमध्ये वादविवाद, तक्रारी करणे आणि गाऱ्हाणे करणे हे आहे कारण त्यांनी जगामधील प्रत्येक गोष्टीकडे ख्रिस्ताशिवाय कचरा म्हणून पाहिले नाही - तर मग नेहमी आनंद करणे हे खरंच अशक्य आहे! हे शब्द लिहिताना पौल रोममधील तुरूंगातील कुजलेल्या अंधारकोठडीत कैदी होता. जर अशा परिस्थितीतही तो आनंदी राहू शकला तर मग आपण का नाही?