WFTW Body: 

95 वर्षांचा झाल्यावर व 65 वर्षे देवासोबत चालल्यावर प्रेषित योहानाने पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन पत्र लिहिण्याचे ठरविले. त्याच्या पत्राचे ध्येय ''सहभागिता'' होते (1 योहान 1:3). पौलाने बघितले की मंडळ्यांनी व पुढार्यांनी आपली पहिली प्रीती सोडली आहे (प्रकटीकरण 2:4) आणि आता ते नावापुरतेच जिवंत होते (ते ख्रिस्ती कार्यक्रम राबवीत होते) परंतु, खरे तर देवाच्या दृष्टीत ते मृत झाले होते (प्रकटीकरण 3:1). अशा मंडळ्या बघून योहानाला एका गोष्टीची खात्री झाली होती की ख्रिस्ती लोकांना पिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्यांच्या सहभागितेच्या आनंदाची गरज आहे.

भिन्न भिन्न प्रकारच्या कार्यात आनंद मिळू शकतो. काहींना खेळामध्ये, काहींना संगितामध्ये, काहींना त्यांच्या व्यवसायामध्ये आणि काहींना ख्रिस्ती कार्य करण्यात आनंद मिळू शकतो. परंतु संपूर्ण विश्वात जर शुद्ध आनंद शोधला तर तो केवळ पित्याच्या सहभागितेतच मिळतो (1योहान 1:4).

स्तोत्रकर्ता म्हणतो, ''तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे'' (स्तोत्र 16:11). ''जो आनंद त्याच्यापुढे होता'' म्हणजे येशूपुढे होता त्याप्रित्यर्थ येशूने वधस्तंभ सहन केला (इब्री 12:2). पित्यासोबतची सहभागिता येशूला सर्वात मोल्यवान वाटत होती. या तुलनेत येशूने विश्वातील कोणत्याही गोष्टीला महत्व दिले नाही. जेव्हा हरवलेल्या मानवजातीकरिता अनंत नरकाच्या यातना तो तीन तास सहन करणार होता तेव्हा ही सहभागिता वधस्तंभावर भंग होणार आहे हे येशूला माहीत होते (मत्तय 27:45). नंतर पिता त्याला त्यागणार आणि ज्या सहभागितेचा आनंद येशूने सार्वकाल घेतला होता ती सहभागिता तीन तासाकरिता वधस्तंभावर खंडीत होणार होती. ही सहभागिता खंडीत होणार म्हणून तो इतका बेचैन झाला होता की जेव्हा तो गेथशेमाने बागेत होता तेव्हा त्याच्या शरीरातून घामाद्वारे रक्ताचे मोठमोठे थेंब पडू लागले. ज्या प्याल्याकरिता तो प्रार्थना करीत होता की त्याच्यापासून काढून टाकल्या जावा तो हाच प्याला होता : पित्यासोबत सहभागिता तुटणे.

आपण हे बघू शकलो असतो किंवा त्याची पकड आपण घेतली असती तर किती बरे झाले असते! येशूला अनुसरण्याविषयी आपण किती सहजतेने बोलतो आणि गातो! येशूला अनुसरणे म्हणजे पित्यासोबतच्या सहभागितेला त्याने जे महत्व दिले ते आपणही देणे. तेव्हाच पाप हे आपल्याकरिता साधे पाप न राहता ते आपल्याला गंभीर स्वरूपाचे वाटेल, कारण ते पित्यासोबत असलेली आपली सहभागिता तोडते. इतरांवर जर आपण प्रीती करीत नाही तर पित्यासोबतची आपली सहभागिता तुटेल.

देव आपल्याला प्रकट करो की स्वर्गातील प्रेमळ पित्यासोबत अखंड सहभागिता म्हणजेच खरे ख्रिस्तीत्व होय.