लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

पवित्र आत्म्याचे सेवाकार्य देवत्वामधील सर्व सेवाकार्यांपैकी सर्वात जास्त दृष्टीआड झालेले आहे. आपल्या कामाची ओळख किंवा श्रेय मिळावे ही इच्छा न बाळगता तो शांतपणे , अदृश्य मार्गाने प्रोत्साहित करतो आणि मदत करतो. लोक केवळ पिता व येशूची स्तुती करतात आणि तो चित्रातून पूर्णपणे बाहेर राहतो यात तो समाधानी आहे. किती सुंदर सेवा आहे ही .

मग अशा आत्म्याने भरलेले असणे म्हणजे काय? याचा अर्थ असा असला पाहिजे की आपण त्याच्यासारखे असावे, त्याच्यासारखे सेवाकार्य असण्यात समाधानी असावे - शांत, अदृश्य, स्वतःला कोणतेही श्रेय न मिळता इतरांना श्रेय मिळण्यात समाधान. आपण खरोखरच या आत्म्याने भरलेले आहोत का?

आज "पवित्र आत्म्याने भरलेले" असल्याचा दावा करणारे बरेच जण ख्रिस्ती व्यासपीठावर स्वत: साठी मुख्य जागा शोधतात, आपल्या दानांचा वापर करून स्वत:ची जाहिरात करतात आणि स्वत: साठी पैशांचा शोध घेतात. हे पवित्र आत्म्याच्या कार्याखेरीज इतर दुसरे काही आहे . हे सर्व दुसऱ्या कोणत्यातरी आत्म्याचे काम आहे जो पवित्र आत्म्याची नक्कल करतो आणि मंडळीमधील अशा बनावटीचा आणि फसवणुकीचा पर्दाफाश करणे हे आपले कर्तव्य आहे.

पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा झाल्याची ओळख काय आहे? येशूने प्रेषितांची कृत्ये १:८ मध्ये हे अगदी स्पष्ट केले की ते सामर्थ्य आहे. पवित्र आत्म्याने भरण्याचा पुरावा म्हणजे अन्य भाषा असे त्याने कधीही एका शब्दानेही सांगितले नाही. प्रेषितांनीही याबद्दल एक शब्दही सांगितला नाही. तुम्ही त्या वाट पाहणाऱ्या शिष्यांकडे जाऊन त्यांना विचारले असते, "पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा कधी झाला आहे हे तुम्हांला कसे कळेल?" - ते अन्य भाषेत बोलतील असे त्यांनी म्हटले नसते. येशूने त्यांना सामर्थ्य मिळेल असे सांगितले होते, असे त्यांनी म्हटले असते. तुम्ही विचारू शकता की "मला हे सामर्थ्य मिळाले आहे हे मला कसे कळेल?" देव आपल्याला याची खात्री देऊ शकतो, ज्याप्रमाणे त्याने आम्हांला खात्री दिली आहे की आमच्या पापांची क्षमा केली गेली आहे. आपल्या पापांची क्षमा करण्यात आली आहे, ही साक्ष देणारा पवित्र आत्मा देखील आपण पवित्र आत्मा परिधान केला आहे ही साक्ष देईल.या दोन्ही महत्त्वाच्या बाबींसाठी देवाला खात्री देण्यास सांगा. त्यामुळे ते सामर्थ्याची वाट पाहत होते. पण जेव्हा त्यांना सामर्थ्य मिळाले तेव्हा त्यांना अज्ञात भाषांमध्ये (अन्य भाषेत) बोलण्याचे दानही मिळाले .

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीत सामर्थ्य असावे, ही देवाची नक्कीच इच्छा आहे. सामर्थ्य असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक जहाल सुवार्तिक व्हाल. ख्रिस्ताच्या शरीरात स्वत:चे सेवाकार्य पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात असेल. मानवी शरीराचा विचार करा. आपल्या मानवी शरीराचा अवयव होण्यासाठी त्या भागातून रक्त वाहत असले पाहिजे. कृत्रिम हात शरीराचा अवयव असू शकत नाही कारण त्यातून रक्त वाहत नाही. त्याच प्रकारे, ख्रिस्ताच्या रक्ताने एखाद्याला शुद्ध केले असेल तरच ती व्यक्ती ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग असू शकते. पण जरी एखाद्या हातामध्ये रक्त वाहत असले, तरीही तो पंगू असू शकतो - आणि म्हणूनच निरुपयोगी अवयव असू शकतो. पक्षाघात बरा झाला आणि हाताला शक्ती मिळाली तर तो जीभ बनेल का? नाही! तो एक शक्तिशाली हात बनेल. त्याच प्रकारे, जर अर्धांगवायू झालेल्या जिभेला शक्ती मिळाली, तर ती हात बनणार नाही. ती एक शक्तिशाली जीभ बनेल. म्हणून जर देवाने तुम्हांला आई म्हणून पाचारण केले असेल आणि तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेल्या असाल, तर तुम्ही सुवार्तिक होणार नाही; तुम्ही एक सामर्थ्यवान , आत्म्याने भरलेली आई बनाल.

प्रत्येकाच्या मस्तकावर बसणाऱ्या अग्नीच्या जिभांवरून असे दिसून येते की, नवीन कराराच्या युगात देव वापरणार असलेल्या आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जीभ - पवित्र आत्म्याने पेटलेली जीभ आणि सतत त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेली. हा देखील अन्य भाषेच्या दानांच्या प्रतिकात्मतेचा एक भाग आहे. केवळ तुम्ही धर्मोपदेशक असाल तर नव्हे, तर दररोज लोकांशी केलेल्या सामान्य संभाषणातही देवाला आपल्या जिभेचा उपयोग इतरांना आशीर्वाद देण्यासाठी करायचा आहे. पण त्यासाठी तुम्ही पवित्र आत्म्याला दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सात दिवस तुमच्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू दिले पाहिजे.