लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

येशू, योहान १६:३३ मध्ये म्हणाला, "जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” त्याने कधीही आश्वासन दिले नाही की आपण क्लेशांतून सुटू - मग ते लहान असो की मोठे. परंतु त्याने असे जरूर म्हटले की तो जसा जिंकला तसे आपणही जिंकू. आपल्याला क्लेशातून वाचवण्यापेक्षा त्याला आपल्या जिंकवण्यामध्ये अधिक रस आहे, कारण आपल्या सुखसोईपेक्षा आपल्या चारित्र्यात त्याला जास्त रस आहे. येशूने असेही कधी सांगितले नाही की महासंकटाच्या काळापासून सुटका म्हणजे आपल्या विश्वासूपणाचे पारितोषिक होय, जसे काहीजण शिकवतात. उलटपक्षी, त्याने म्हटले की ज्यांनी त्याचे अनुसरण करण्यास प्रत्येक गोष्ट सोडली आहे त्यांना जे त्याचे अनुसरण करत नाही अशा लोकांपेक्षा अधिक क्लेश भोगावे लागतील (मार्क १०:३०). जेव्हा त्याने आपल्या शिष्यांकरिता आपल्या पित्याकडे प्रार्थना केली तेव्हा तो म्हणाला, "तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो." (योहान१७:१५) येशूच्या शिष्यांना या काळात क्लेश होत आहेत फक्त या कारणाकरता त्यांना जगातून काढून घ्यावे अशी त्याची इच्छा नव्हती.

तिसर्‍या शतकात जेव्हा ख्रिस्ती लोकांना छप्पर नसलेल्या रोमी प्रेक्षागृहात सिंहांपुढे फेकले जात होते आणि रोमी साम्राज्याच्या वेगवेगळ्या भागातील खांबावर जाळले जात होते, तेव्हा प्रभूने त्यांना अशा क्लेशांतून सोडवले नाही. ज्या देवाने सिंहाचे तोंड बंद केले आणि दानिएलाच्या दिवसात अग्नीची धगधगणारी भट्टी सामर्थ्यहीन केली, त्याने येशूच्या या शिष्यांसाठी असे चमत्कार केले नाही - कारण हे नवीन कराराचे ख्रिस्ती होते, जे मृत्यूद्वारे देवाचे गौरव करणार होते. येशू ह्या त्यांच्या गुरुप्रमाणे, त्यांनी देवदूतांच्या बारा सैन्याला येण्यास व त्यांना त्यांच्या शत्रूंपासून वाचविण्याची अपेक्षा केली नाही. स्वर्गातून, देवाने त्याच्या पुत्राची वधू सिंहांनी फाडून तुकडे केलेली आणि जळून राख झालेली पाहिली; आणि त्यांच्या साक्षीने त्याचे गौरव झाले - कारण त्यांनी "कोकरा जेथे जेथे गेला तेथे तेथे" त्याचे अनुसरण केले, अगदी हिंसक शारीरिक मृत्यूपर्यंत (प्रकटीकरण १४:४). एकच वचन जे प्रभूने त्यांना सांगितले, "मरेपर्यंत तू विश्वासू राहा आणि मी तुला जीवनाचा मुकुट देईन" (प्रकटीकरण २:१०). आजही, जेव्हा अनेक देशांत त्याच्या नावामुळे येशूच्या शिष्यांचा अतोनात छळ केला जात आहे, तेव्हा प्रभू त्यांना पृथ्वीवरून काढून घेत नाही. आणि तो आपल्याला महासंकटाच्या काळाच्याआधी वर उचलून घेईल असेही नाही. तो हयापेक्षा काहीतरी अधिक चांगले करेल. महासंकटामध्येही तो आपल्याला विजयी करेल.

येशूला आपल्याला क्लेशातून वाचवण्यापेक्षा वाईटापासून वाचविण्यात अधिक रस आहे. तो आपल्याला क्लेशातून जाऊ देतो कारण त्याला हे माहित आहे की त्यामुळेच आपण आध्यात्मिकरित्या मजबूत होऊ शकतो.

असा संदेश विलासी ख्रिस्ती लोकांसाठी चमत्कारिक असा आहे जे दर रविवारी आपल्या मंडळीत बैठकांवर बसून कानाची खाज जिरवणार्‍या उपदेशकांकडून आपले लाड करून घेतात. परंतु प्रेषितांनी सुरुवातीच्या मंडळ्यांना हा संदेश दिला. "आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी (प्रेषित पौल आणि बर्णबा ) त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’' (प्रेषितांची कृत्ये १४:२२).

आम्ही आता घरात आणि कामावर ज्या छोट्या छोट्या परिक्षांना तोंड देतो आहोत, ते फक्त येणाऱ्या दिवसांत येणाऱ्या मोठ्या परिक्षांची तयारी आहे. म्हणूनच आपण आता विश्वासू असणे आवश्यक आहे. कारण देव म्हणतो, “तू पायी चालणार्‍यांबरोबर धावताना थकलास तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? "(यिर्मया १२:५). प्रकटीकरण अध्याय १:९- १० मध्ये योहान स्वतःला “येशूमधील क्लेशाचा भागीदार” म्हणून संबोधतो. येशूच्या प्रत्येक खर्‍याखुर्‍या शिष्याला जोपर्यंत तो या जगात आहे तोपर्यंत "येशूमध्ये असलेल्या क्लेशात" सामील होण्यासाठी तयार असले पाहिजे. आरामात जगताना योहानाला हे प्रकटीकरण झाले नाही. पात्म येथे क्लेश अनुभवताना त्याने हे प्राप्त केले, कारण तो "देवाचे वचन आणि येशूच्या साक्ष" यांकरिता विश्वासू होता (प्रकटीकरण १:९). शेवटच्या महासंकटाच्या काळात ख्रिस्तविरोधकाकडून संतांना होणार्‍या छळाबद्दल लिहिण्यासाठी त्याला स्वतःलाही त्या अनुभवातून जावे लागले. जे संकटात सापडले आहेत अशांना सेवा देण्याआधी देव आपल्याला सर्वप्रथम परीक्षा व क्लेशातून जाऊ देतो. धीर हा एक सद्गुण आहे ज्यावर संपूर्ण नव्या करारात भर देण्यात आला आहे. येशू स्वत: म्हणाला "तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल." (मत्तय२४: ९,१३).