WFTW Body: 

मत्तय ५:१७ म्हणते, “मी नियमशास्त्र किवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी आलो आहे असे समजू नका ; मी ते रद्द करण्यासाठी नाही तर पूर्ण करण्यासाठी आलो आहे.” देवाच्या नियमशास्त्रामागील मूलभूत तत्व म्हणजे त्याचे जीवन. नियमशास्त्रात, त्याचे स्वरूप कसे होते हे मर्यादित स्वरूपात लिहिले आहे. मूर्तिपूजेचा अभाव आणि देवाला प्रथम स्थान देणे, आई – वडिलांचा सन्मान करणे, खून, व्यभिचार किंवा अशा कोणत्याही गोष्टीद्वारे इतरांना कधीही न दुखावने, इत्यादी, हे मनुष्यात देवाच्या जीवनाचे प्रकटीकरण होते आणि येशूने ते जीवन प्रकट केले. तो म्हणाला, “मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आलो नाही.” नियमशास्त्रामागील मूलभूत तत्व कधीही रद्द केले गेले नाही. काही लोक त्या वचनाचा गैरसमज असा करतात की आपण शब्बाथ देखील पाळला पाहिजे.

कलस्सैकरास पत्र २:१६ म्हणते, “ खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ दिवस पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका, कारण या सर्व गोष्टी छाया आहेत.” तुम्हाला हे लक्षात आले का की त्याने शब्बाथ पाळणे या चौथ्या आज्ञेचा समावेश केला आहे, ? तो म्हणतो की ते फक्त एक छाया आहे. ते ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले आहे . आजच्या भाषेत, तुम्ही म्हणू शकता की ते एका छायाचित्रासारखे आहे. ख्रिस्त येईपर्यंत तुम्हाला त्या छायाचित्राची गरज होती. जर मी माझ्या पत्नीसोबत प्रवास करत नसेन, तर मी तिचा फोटो माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो आणि तो पाहू शकतो, पण जर मी माझ्या पत्नीसोबत प्रवास करत असेल, तर मला तिचे छायाचित्र पाहण्याची काय गरज आहे? एखादा माणूस जो आपल्या पत्नीसोबत प्रवास करत असताना तो तिच्या छायाचित्राकडे पाहत राहतो तर त्या माणसात काहीतरी चुकीचे आहे !

नियमशास्त्र संपले आहे, कारण आता ख्रिस्त आला आहे. तो म्हणतो की ते फक्त एक छाया होती . ते ख्रिस्ताचे एक अचूक चित्र आहे - जुन्या करारातील अनेक गोष्टींनी ख्रिस्ताचे अचूक चित्रण केले आहे - परंतु ते फक्त एक छायाचित्र आहे. सत्य ख्रिस्तामध्ये आहे. येशू जेव्हा नियमशास्त्र पूर्ण करण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. शब्बाथ ख्रिस्तामध्ये पूर्ण झाला होता आणि आता तो आंतरिक शब्बाथ आहे जो प्रभु आपल्या हृदयात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. "माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन" (मत्तय ११:२८). जेव्हा आपण त्याचे जू आपल्यावर घेतो तेव्हा आपल्यात आंतरिक विश्रांती येते. काही लोक शब्बाथ पाळणे ही एकच आज्ञा आहे जी कधीही रद्द करू नये असे मानतात. नाही, आता नियमशास्त्राची पूर्णता आपल्या अंतःकरणातील पवित्र आत्म्याद्वारे होते.

रोमकरास पत्र ८:४ मध्ये, ते असे स्पष्ट केले आहे: “ जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियंमशास्त्राने लावून दिलेले आचरण आता पूर्ण झाले आहे.” अशा प्रकारे नियमशास्त्र पूर्ण होते. आपल्याला शास्त्राची तुलना शास्त्राशी करावी लागेल. नियमशास्त्र नाहीसे होणार नाही. येशू नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आला नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी आला होता आणि ते आपल्यामध्येही पूर्ण झाले पाहिजे. ते आपल्यामध्ये कसे पूर्ण होईल ? जेव्हा आपण देहस्वभावाप्रमाणे न चालता, पवित्र आत्म्याप्रमाणे चालतो तेव्हा नियमशास्त्राची नीतिमान आवश्यकता आपल्यामध्ये पूर्ण होते (रोमकरास पत्र ८:४). हे शब्बाथ किंवा इतर आज्ञा पाळण्याने पूर्ण होत नाही.

मत्तय ५:२० मध्ये, येशू आपल्याला नियमशास्त्र किती प्रमाणात पूर्ण करायचे आहे याचे वर्णन करतो: " शास्त्री आणि परूशी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही." येशू ख्रिस्त नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला होता, आपल्या जीवनातही ते पूर्ण करण्यासाठी आला, देवाचे नियमशास्त्र आपल्या हृदयात पूर्ण झाले पाहिजे. जुन्या करारात, त्यांनी ते बाह्यतः विविध प्रकारे पूर्ण केले - त्यांनी "प्याला बाहेरून" स्वच्छ ठेवला . परंतु देवाला आता प्याल्याच्या आतल्या भागात रस आहे. आपल्याला पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश बनायचे आहे आणि ते जीवन आतून पवित्र आत्म्यापासून, यायला हवे.

फिलिप्पैकरास पत्र २:१२, १३ म्हणते, " भीत व कापत आपले तारण साधून घ्या, कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सतसंकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे".

या वचनासंबंधी काही मुद्दे येथे आहेत:

(i) तारण (भूतकाळात) हे सर्वप्रथम देवाच्या क्रोधापासून आणि न्यायापासून मिळणारे तारण आहे. हे तारण देवाकडून एक मोफत देणगी आहे आणि आपण ते कधीही काम करून मिळवू शकत नाही. येशूने ते आपल्यासाठी वधस्तंभावर "पूर्ण" केले आहे. परंतु तारण म्हणजे (वर्तमान काळात) आदामाच्या स्वभावापासून (देहापासून) आणि आपल्या पापी, जगिक वर्तनापासून (आवाजाचा स्वर, चिडचिड, अशुद्धता, भौतिकवाद इ.) वाचणे हे आहे . वरील वचनात सांगितलेले हे तारण आहे. आपल्या तारणाचे तीन काळ आहेत:

आपण पापाच्या दंडापासून वाचलो आहोत.

आपण पापाच्या शक्तीपासून वाचत आहोत.

एके दिवशी, जेव्हा ख्रिस्त परत येईल तेव्हा आपण पापाच्या उपस्थितीपासून वाचू.

(ii) जेव्हा जेव्हा देवाचे वचन आपल्यामध्ये देवाच्या कार्याबद्दल बोलते तेव्हा ते नेहमीच पवित्र आत्म्याच्या सेवेचा संदर्भ देते. आणि त्याचे प्राथमिक कार्य आपल्याला शुद्ध करणे (पाप आणि जगापासून वेगळे करणे) आणि आपल्याला पवित्र करणे हे आहे. म्हणून देव आपल्यामध्ये जे "कार्य" करतो, ते "कार्य" आपण करत ठेवले पाहिजे . जेव्हा देव आपल्याशी बोलतो, आपल्यातील काही वृत्ती, विचार किंवा वर्तन दाखवतो, ज्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे , ते म्हणजे देव "आपल्यामध्ये कार्य करतो". जेव्हा आपण ती सुधारणा स्वीकारतो आणि "तो दाखवत असलेल्या देहाच्या किंवा आत्म्याच्या त्या विशिष्ट अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करतो" (२ करिंथकर ७:१ पहा) - आपल्या जीवनातील त्या विशिष्ट सवयीपासून स्वतःला शुद्ध करतो - तेव्हा आपण "आपल्या तारणाचे काम करत असतो".